Union Cabinet Expansion : महाराष्ट्रात भाजपाला नवा मित्रपक्ष मिळाल्यानंतर दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानावर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली. पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुमारे 4 तास चालली. यामध्ये गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर, जी किशन रेड्डी यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
अजित पवार यांच्यासह खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रावादीकडून तटकरे आणि पटेल यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा होती परंतु आता महाराष्ट्राचे राजकारण बदलल्याने या विस्ताराला महत्व आले आहे.
या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, “मंत्रिपरिषदेसोबत एक फलदायी बैठक झाली, या बैठकीत आम्ही विविध धोरणांशी संबंधित मुद्द्यांवर विचार विनिमय केला.” राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे त्यांच्या पक्षातील अनेक आमदारांसह भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या रणनीतीकारांच्या अनेक बंद खोलीत बैठका झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची वाढवली आहे.
राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर दिल्लीत फेरबदल, सोनिया दुहान यांच्याकडे मोठी जबाबदारी
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे संभाव्य दावेदार म्हणून पाहिले जात आहे. पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे मानले जात होते, पण त्यांना सोडून त्यांनी अजित पवारांशी हातमिळवणी केली. महाराष्ट्रात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात आणण्याची शक्यताही दिल्लीत जोर धरू लागली आहे.