राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर दिल्लीत फेरबदल, सोनिया दुहान यांच्याकडे मोठी जबाबदारी
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार यांनी कारवाईला सुरुवात केली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर दिल्लीतील एसआर कोहली यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता नवी दिल्ली कार्यालयाच्या प्रभारीपदी सोनिया दुहान यांची नियुक्ती केली आहे. हरियाणाच्या असलेल्या दुहान या शरद पवारांच्या जवळच्या मानल्या जातात.
अजित पवार यांना बंडात साथ दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या शिफारशीवरुन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ही कारवाई केली आहे. एका पत्राच्या माध्यमातून सुळे यांनी ही शिफारस केली होती. पटेल आणि तटकरे हे काल अजित पवार यांच्या शपथविधीवेळी राजभवनात उपस्थित होते. यावेळी तटकरे यांच्या कन्या आणि आमदार आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्यासोबत पत्रकार परिषदेलाही उपस्थित होते.
वळसेंना मंत्री करताच आमदार मोहितेंचा हल्लाबोल… अजितदादा गटात धुमशान सुरू
दरम्यान, सुप्रिया सुळे यांचे पत्र प्राप्त होताच शरद पवार यांनी तातडीने पटेल आणि तटकरे यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा केली. ट्विट करुन पवार यांनी याबाबत माहिती दिली. “मी, राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याद्वारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे पक्षविरोधी कारवायांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे” अशी माहिती पवार यांनी दिली होती.
अजित पवार सत्तेत येताच शिंदेंच्या अडचणी वाढल्या, मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांनी दिल्लीतील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यालयातून कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचा फोटो काढून फेकून दिला होता. यावेळी सोनिया म्हणाल्या की, प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या इतर सर्व नेत्यांच्या फोटो फ्रेम्स आम्ही हटवल्या आहेत कारण ते आता राष्ट्रवादी कुटुंबाचा भाग नाहीत.