मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना धमकी देत 400 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आणखी एका तरुणाला अटक केली आहे. राजवीर खंत (21) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्यानेच सर्वात आधी shadabchan@mailfence.com हा ईमेल आयडी वापरून शादाब खान नावाने ईमेल पाठवला होता आणि 20 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती, त्यानंतर प्रतिसाद न दिल्याने ही रक्कम 400 कोटी रुपयांपर्यंत वाढवत नेली होती. शिवाय हे पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राजवीर मूळचा गुजरातमधील गांधीनगरचा रहिवासी असून तो कंप्यूटर सायन्सचा विद्यार्थी आहे. खंतने ईमेल पाठवण्यासाठी व्हीपीएन मास्किंगचा वापर केला होता, त्यामुळेच त्याच्या व्हीपीएन नेटवर्कचे मूळ स्थान बेल्जियममध्ये येत होते. त्याने डार्क वेब नेटवर्कचाही वापर केल्याचे समोर आले असून धमकी देण्यापूर्वी त्याने दोन महिन्यापेक्षा अधिक दिवस 650 पेक्षा जास्त वेबसाईटचा अभ्यास केला होता. (Mumbai Police has arrested another youth in the case of threatening industrialist Mukesh Ambani and demanding Rs 400 crore ransom)
याच सगळ्यामुळे राजवीर खंत थेट तपास अधिकाऱ्यांना वारंवार आव्हान देत होता. पोलिस आपवल्याला शोधू शकत नाहीत, आपला माग काढू शकत नाहीत असे तो म्हणत होता. तसेच अटक करु शकत असल्यास करु शकता, असेही खुले आव्हान त्याने धमकी देताना दिले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, खंतने भारतातील आणखी एका सर्वात श्रीमंत व्यक्तीला ईमेल पाठवून 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. पण यावेळी त्याने सोडलेल्या डिजिटल फूटप्रिंटच्या मदतीने त्याचा मागोवा घेण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या प्रकरणात मुंबई पोलिसांनी काल (4 नोव्हेंबर) पहिली अटक केली होती. गणेश रमेश वानपर्धी (19) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो कॉमर्सचा तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. सुरुवातीला आलेल्या धमकीच्या बातम्या वाचून त्याने उत्साहाच्या भरात आणखी एक धमकीचा मेल पाठवला होता. खोडसाळपणाने केलेल्या मेलमध्ये त्याने अंबनी यांच्याकडे 500 कोटींची मागणी केली होती. दरम्यान, पोलिसांनी या दोघांनाही अटक केली असून दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.