Karnataka Politics : काँग्रेसचं सरकार पडणार, 50 आमदार भाजपाच्या संपर्कात; माजी मंत्र्याच्या दाव्याने खळबळ
Karnataka Politics : दक्षिण भारतातील एकमेव राज्यातील सत्ता हस्तगत करत काँग्रेसने (Congress) भाजपाला दक्षिणेतून हद्दपार केले. कर्नाटकात काँग्रेसचे (Karnataka Politics) सरकार येऊन आता सहा महिने होत आले आहेत तरीदेखील भाजपाच्या ऑपरेशन लोटसची भीती काँग्रेस नेत्यांच्या मनातून गेलेली नाही. आता पुन्हा भाजपाच्या राजकीय खेळीची चिंता काँग्रेस नेत्यांना सतावू लागली आहे. काँग्रेसचे 50 आमदार भाजप हायकमांडच्या संपर्कात असून काँग्रेसचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा भाजपाचे माजी मंत्री मुरुगेश निराणी (Murugesh Nirani) यांनी केल्याने कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
विजापूर येथे मुरुगेश यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये सध्या गटबाजी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने अनेक नाराज असून आता हे लोक भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काँग्रेसचे सरकार कधीही पडेल. पाच वर्षांपर्यंत सरकार टिकणार नाही.
आमदार आपल्याच सरकारवर नाराज
दरम्यान, कर्नाटकात याआधी चार महिन्यांपूर्वी एक राजकीय नाट्य घडले होते. राज्यातील 11 आमदारांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एकूण 20 मंत्री आपली कामे नीट करत नाहीत, असा आरोप करत आमदारांनी खळबळ उडवून दिली होती. काँग्रेसच्या 11 आमदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून कामात येणाऱ्या अडचणींची माहिती दिली होती. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ते बीआर पाटील यांच्या लेटरहेडवर लिहिले गेले होते. गुलबर्गा जिल्ह्यातील काँग्रेस आमदार बी.आर. पाटील आणि इतर 10 जणांनी पत्रात म्हंटले होते की, आम्ही लोकांच्या विश्वासानुसार काम करू शकत नाही. 20 हून अधिक मंत्री आमच्या मतदारसंघातील कामाबद्दल प्रतिसाद देत नाहीत. मंत्री लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत. ते सहकार्य करत नसल्याने कामे पूर्ण होणार नाहीत.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिले होते स्पष्टीकरण
सीएम सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी राज्य काँग्रेसमध्ये असंतोष असल्याच्या बातम्या आणि अफवांचे खंडन केले होते. व्हायरल झालेल्या पत्रात एकही अधिकारी आमदारांचे ऐकत नसल्याचा आरोप होता. या पत्राबाबत सीएम सिद्धरामय्या म्हणाले होते की, याबाबत तुम्हाला कुणी सांगितले? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला होता. तर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनीही स्पष्ट केले होते की, आम्ही सर्व मंत्र्यांना सर्व आमदारांना सोबत घेण्यास सांगितले आहे, जे हरले त्यांच्याशी बोला. त्यांचीही कामे करा, असं सांगितलं होतं. प्रत्येकजण आपापली कामे करत आहे. पत्रात जे लिहिलं, तसं काहीही नाही. या फक्त अफवा पसरवल्या जात आहेत.
राम मंदिरासाठी लढला, भगवा फडकावला अन् आता थेट तुरुंगात; शिवसेनेच्या माजी आमदाराला अटक