भ्रष्टाचाराच्या पैशातून तिजोरी भरणं हे कॉंग्रेसचं काम, त्यांनी ‘महादेव’ नावंही सोडलं नाही; PM मोदीचं टीकास्त्र

  • Written By: Published:
भ्रष्टाचाराच्या पैशातून तिजोरी भरणं हे कॉंग्रेसचं काम, त्यांनी ‘महादेव’ नावंही सोडलं नाही; PM मोदीचं टीकास्त्र

PM Narendra Modi on Bhupesh Bhaghel : महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Bhaghel) यांना ५०८ कोटी रुपये देण्यात आल्याचा खळबळजनक दावा ईडीने केला. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ईडीने हा दावा केल्यानं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. ईडीच्या दाव्यानंतर भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस आणि बघेल यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, आज दुर्ग येथील एका सभेला संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) बघेल सरकारवर टीकास्त्र डागलं. भ्रष्टाचाराच्या पैशातून तिजोरी भरणं हे कॉंग्रेसचं काम आहे, अशी टीका त्यांनी केली.

दोन राज्यात काँग्रेसची बाजी, तर राजस्थानमध्ये पराभव; काय सांगतो ओपिनियन पोलचा कौल? 

छत्तीसगडमधील सभेत बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, छत्तीसगडची निर्मिती भाजपने केली. भाजपचं छत्तीसगडचा विकास करेल. पण, भ्रष्टाचारातून तिजोरी भरण्याला काँग्रेसचं प्राधान्य आहे. काँग्रेस सरकार तुम्हाला लुटण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांनी महादेव नावंही सोडलं नाही. दोन दिवसांपूर्वी रायपूरमध्ये पैशांचा मोठा साठा सापडला आहे. हे पैसा जुगार आणि सट्टेबाजांचे असल्याचं लोक म्हणतात.

ते म्हणाले, काँग्रेसचे नेते या पैशानं आपली घरं भरत आहेत. दुबईत बसलेल्या लोकांशी यांचा काय संबंध? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी छत्तीसगडच्या जनतेला द्यावं. काँग्रेस मोदींना रात्रंदिवस शिव्या घालतात. आता छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांनाही शिव्याशाप देण्यास सुरुवात केली आहे. पण, मोदी शिव्यांना घाबरत नाहीत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी लोकांनी मला दिल्लीला पाठवले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले, ज्यांनी छत्तीसगडला लुटले त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्याकडून एक-एक पैशाचा हिशेब घेतला जाईल. छत्तीसगडच्या भ्रष्ट सरकारने एकामागून एक घोटाळे केले आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर घोटाळेबाजांची चौकशी करून त्यांना तुरुंगात पाठवले जाईल, असा इशारा पंतप्रधानांनी दिला आहे.

दरम्यान, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी लढत होणार आहे. अशातच अंमलबजावणी संचालनालयाने बेटिंग अॅप ‘महादेव’च्या प्रवर्तकांनी आतापर्यंत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना 508 कोटी रुपये दिले असा दावा केला. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

बघेल यांचा खुलासा-
दरम्यान, ईडीच्या आरोपानंतर बघेल यांनी यावर खुलासा करताना ईडीचा दावा फेटाळून लावला आहे. बघेल यांनी X वर एक पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिलं की, भाजपला छत्तीसगडमध्ये ईडी, आयटी, डीआरआय संस्थांच्या मदतीने निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीपूर्वी माझी प्रतिमा डागाळण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे. महादेव अॅपची चौकशी करण्याच्या नावाखाली ईडीने आधी माझ्या जवळच्या लोकांना बदनामी करण्यासाठी त्यांच्या घरांवर छापे टाकले आणि आता अज्ञात व्यक्तीच्या वक्तव्याच्या आधारे माझ्याकडून ५०८ कोटी रुपये वसूल करण्याचा प्रयत्न केला, असं बघेल म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube