Download App

पुत्रमोह फारच कठीण! फक्त मुलांच्याच प्रचारात अडकले माजी CM अन् स्टार प्रचारक

Lok Sabha Elections 2024 : सर्वसामान्य अगदी गरीबातला गरीब व्यक्ती असो किंवा एखादा उद्योजक आणि गर्भश्रीमंत राजकारणी. पुत्रमोह कुणाला चुकलाय. मुलांच्या चांगल्या करिअरसाठी जसे आईवडील परिश्रम घेतात तसंच राजकारणातही घडतं. मुलगा किंवा मुलगी निवडणुकीच्या रिंगणात असतील तर मग विचारायलाच नको. मग पक्ष काय अन् बाकीच्या उमेदवारांचं काय जे त्यांच्या भरवशावर आहेत या कशाचाच विचार होत नाही. असाच काहीसा प्रकार राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत होत आहे. या राज्यातील तीन दिग्गज राजकारणी तेही माजी मु्ख्यमंत्री त्यात पक्षाचे स्टार प्रचारक पण मुलांच्या प्रचारात इतके अडकलेत की मतदारसंघ सोडून कुठेच फिरकले नाहीत.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह लोकसभेच्या रिंगणात आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहेलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत आणि मध्य प्रदेशचे माजी मु्ख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ हे तिन्ही माजी सीएम पुत्र निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. त्यांच्यासाठी ही स्टार प्रचारक मंडळी त्यांच्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते राज्यात येऊन प्रचार करत आहेत. परंतु, या नेत्यांना त्याचे काहीच वाटत नाही. या नेत्यांनी मतदारसंघांच्या बाहेर कोणत्याही उमेदवाराचा अजून तरी प्रचार केलेला नाही.

Chandrababu Naidu : माजी मुख्यमंत्र्यांकडे 810 कोटींची संपत्ती, गेल्या पाच वर्षात 41 टक्क्यांनी वाढ

देशात सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. काल पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. आणखी सहा टप्पे बाकी आहेत. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. नेते मंडळी, स्टार प्रचारक जाहीर सभा मेळावे आणि रॅलीच्या माध्यमातून उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यासाठी पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. या स्टार प्रचारकांच्या यादीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षांच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसनेही आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अन्य मोठ्या नेत्यांचा समावेश केला आहे. हे नेते देशभरात प्रचार सभा घेऊन उमेदवारांचा प्रचार करत आहेत.

तर दुसरीकडे असेही काही नेते आहेत जे पुत्रमोहात पुरते अडकले असून त्यांना अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा विसर पडला आहे. यामध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. आता राजस्थानचेच उदाहरण घेऊ.

या राज्यात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत निवडणुक रिंगणात आहे. तसेच भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचा मुलगा दुष्यंत देखील उमेदवारी करत आहे. राज्याचे हे दोन्ही माजी मुख्यमंत्री आपापल्या मुलांसाठी प्रचारात उतरले आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ सुद्धा नशीब आजमावत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी कमलनाथ यांनी छिंदवाडा मतदारसंघात अनेक प्रचार मेळावे घेतले आहेत.

मोदी-शाहंची सभा, चव्हाणांना बदनामीची भीती… नांदेड भाजपला जड का जातंय?

राजस्थानातील झालावाड लोकसभा मतदारसंघातून वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह मैदानात आहेत. निवडणुकीत मुलाच्या विजयासाठी वसुंधरा राजे मतदारसंघात तळ ठोकून आहेत. त्यांनी आपले सगळे लक्ष या मतदारसंघावर केंद्रित केले आहे. तसं पाहिलं तर त्या पक्षाच्या स्टार प्रचारक सुद्धा आहेत. परंतु अन्य मतदारसंघात त्यांचा प्रचार काहीच नाही असेच म्हणावे लागेल. राजस्थान भाजपकडून राजे यांच्या प्रचाराचा कोणताच कार्यक्रम जारी केला जात नाही.

पक्षाच्या स्टार प्रचारक असतानाही वसुंधरा राजे यांचा झालावाड बाहेर प्रचाराचा कार्यक्रम अजून तरी जाहीर झालेला नाही. वसुंधरा राजे सध्या मुलाच्या प्रचारासाठी मतदारसंघातील गावागावात दौरे करत असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सभा राजस्थानात झाल्या आहेत. पण वसुंधरा राजे एकही उमेदवाराच्या प्रचारासाठी व्यासपीठावर दिसलेल्या नाहीत.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत जालोर सिरोही मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत त्यांनी जोधपूर मतदारसंघातून नशीब आजमावले होते. मात्र या निवडणुकीत गजेंद्र सिंह शेखावत यांनी त्यांचा दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला होता. आता वैभव गेहलोत जालोर मतदरसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी अशोक गेहलोत या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. वैभव गेहलोत यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांची येथे एक सभा झाली आहे.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी कमलनाथ यांनी मतदारसंघात जोरदार प्रचार केला. त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यही प्रचारात व्यस्त होते. कमलनाथ यांनी प्रचारात चांगलाच घाम गाळला. त्यांनी या मतदारसंघात 300 पेक्षा जास्त लहान मोठ्या प्रचार सभा घेतल्या.

नकुलनाथ यांच्या विरोधात भाजपने विवेक बंटी साहू यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी भाजपनेही कोणतीच कसर बाकी ठेवलेली नाही. तरी देखील इतिहास पाहिला तर या मतदारसंघावर कमलनाथ याची घट्ट पकड आहे. मागील 12 लोकसभा निवडणुकीत तब्बल 11 वेळा कमलनाथ आणि त्यांच्या परिवारातील सदस्यच विजयी झाले आहेत. 1997 मध्ये फक्त एकदाच कमलनाथ यांचा पराभव झाला होता. त्यावेळच्या पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी त्यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान झाले आहे.

follow us