मोदी-शाहंची सभा, चव्हाणांना बदनामीची भीती… नांदेड भाजपला जड का जातंय?

मोदी-शाहंची सभा, चव्हाणांना बदनामीची भीती… नांदेड भाजपला जड का जातंय?

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सभा आणि त्यानंतरही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना लागून राहिलेली बदनामीची भीती… नांदेडमध्ये (Nanded) दिसणार हे चित्र पाहून मतदारसंघ भाजपला (BJP) जड जातोय का? असा सवाल सध्या विचारला जातोय. सर्वसामान्यपणे मोदी आणि शहा हे एकाच मतदारसंघात सभा घेत नाहीत. महाराष्ट्रात तरी यापूर्वी हा योग जुळून आला नव्हता. तो योग आता नांदेडमध्ये जुळून येणार आहे. त्याचवेळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांना त्यांच्या बदनामीची भीती लागून राहिली आहे. “माझी बदनामी होऊ द्यायची नसेल तर भाजपच्या उमेदवाराला लीड द्या” अशी अशोक चव्हाणांनी केलेली आर्जव हा मतदारसंघातील चर्चेचा विषय ठरला आहे. (Why is BJP not confident of victory in Nanded Lok Sabha Constituency)

याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड भाजपला जड का वाटत आहे? पाहुया

काँग्रेसी मतदारांचा चव्हाणांवरील राग :

नांदेडचा मतदारसंघ भाजपला जड वाटतोय त्याचे महत्वाचे कारण म्हणजे काँग्रेसी मतदारांचा चव्हाणांवरील राग. नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेससाठी इथे सुपिक जमीन तयार केली होती. अशोक चव्हाणांपासून अनेकांना या जमिनीचा लाभ झाला. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांना काँग्रेसचा राज्यातील मोठा चेहरा म्हणून ओळखले जात होते. पण तरीही त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. त्याचा राग नांदेडच्या जनतेच्या मनात असल्याचे सांगितले जाते. काँग्रेसच्या मतदारांना चव्हाणांचे पक्षांतर फारसे रुचले नसल्याचे चित्र आहे.

माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट, तुमच्याकडे काय आहे? विखेंचा विरोधकांवर घणाघात

पक्षसंघटना चव्हाणांसोबत गेली नाही :

अशोक चव्हाण आल्याने आपल्याला फायदा होईल सा भाजपला कयास होता. मात्र काही माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी वगळता चव्हाणांपाठोपाठ भाजपमध्ये कोणीही गेले नाही. माधवराव पाटील जवळकर, मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर हे जिल्ह्यातील तिन्ही आमदार काँग्रेससोबतच राहिले. याशिवाय पक्षसंघटनेतीलही एखादा मोठा नेता चव्हाणांसोबत गेलेला नाही. नायगावचे माजी आमदार आणि सध्याच्या उमेदवार असलेले वसंतराव चव्हाण हेही काँग्रेससोबतच राहिले. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यानंतरही काँग्रेस पक्षाची नांदेडमधील स्थिती मजबूत मानली जात आहे.

अॅन्टी इन्कंबन्सी :

भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2019 मध्ये चिखलीकर 40 हजारांच्या मतांनी निवडून आले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या फॅक्टरने काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा पराभव झाल्याचे बोलले गेले. आता चिखलीकर यांच्यासोबत चव्हाण आहेत. मात्र त्यांना अॅन्टी इन्कंबन्सी सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रचाराच्या पुढच्या काही दिवसांत मतदारांची ही नाराजी दूर करण्याचे मोठे काम भाजपला करावे लागणार आहे.

Pravin Tarde: मित्रासाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट; म्हणाला, “चौकातल्या पोराला फिल्मफेअर…”

वसंतराव चव्हाणांसारखा तगडा उमेदवार :

प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला तिकीट दिले आहे. चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली आणि आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते मानले जातात. ते आणि त्यांचे घराणे पूर्वी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते. पवारांनी त्यांना 2002 साली विधान परिषदेवर नियुक्त केले होते. 2009 मध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोरी करून विजयी झाले. 2014 मध्ये त्यांनी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ काँग्रेसशी जुळली आहे. नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.

अमित देशमुखांनी वैयक्तिक घातलेले वैयक्तक लक्ष :

मराठवाड्यात अमित देशमुख विरुद्ध अशोक चव्हाण असा सुप्त संघर्ष मागील काही वर्षांपासून सुरु होता. अशात चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर मराठवाड्यात देशमुख यांना खुले मैदान मिळाले आहे. आता देशमुख यांनी नांदेड, लातूर या दोन्ही मतदारसंघांमध्ये वैयक्तिक लक्ष घातले आहे. अगदी उमेदवार निवडीपासून ते प्रचाराचे नियोजन, प्रत्यक्ष प्रचार यामध्ये देशमुख यांचा सहभाग आहे. त्यामुळे काँग्रेसच्या संघटनेला चव्हाणांनंतरही नांदेडमध्ये नेतृत्वाची कमतरता जाणवलेली नाही.

याच सगळ्यामुळे भाजपला नांदेडमध्ये जास्त कष्ट घ्यावे लागत आहे. तर चव्हाण यांनाही विजयाचा कॉन्फिडन्स येताना दिसत नाही. आता येत्या काही दिवसात वातावरण कोणाच्या बाजूने फिरणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube