Download App

‘यूपी’तील फोडाफोडी भाजपाच्या अंगलट; राज्यसभेचं गणित लोकसभेला जुळलंच नाही

राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पार्टीत फोडाफोडी करून भाजपात घेतलेल्या आठ आमदारांचा लोकसभेत काहीच फायदा झाला नाही.

Image Credit: Letsupp

Uttar Pradesh Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीआधी भाजपने उत्तर प्रदेशात मोठा खेळ केला (Uttar Pradesh) होता. समाजवादी पार्टीत फोडाफोडी करत आठ आमदारांना आपल्या पक्षात सामील करून घेतले होते. राज्यसभा निवडणुकीच्या काळात समाजवादी पार्टीत बंडखोरी करत भाजप उमेदवाराला मत देणाऱ्या या आमदारांबाबत भाजप नेत्यांना असा कयास होता की मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या जागा पुन्हा मिळवता येतील. पण घडलं नेमकं उलटंच. या आठ आमदारांपैकी एकही आमदाराने एकही मतदारसंघ जिंकून दिला नाही.

ज्यांना राजकारणात धुरंधर म्हणून संबोधलं गेलं त्या नेत्यांनी त्यांच्याच बालेकिल्ल्यात सपाटून मार खाल्ला. अखिलेश यादव यांच्या कोअर टीममध्ये सहभागी असलेले मनोज पांडे यांचे भाजपात जाणे समाजवादी पार्टीसाठी मोठा झटका मानला जात होता. इतकच काय तर स्वतः अमित शाह त्यांच्या घरी गेले होते. पण मनोज पांडे यांनी समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली तसा त्यांचा राजकारणातील दबदबाही संपुष्टात आला.

मनोज पांडे यांचा दबदबा असणाऱ्या रायबरेली आणि उंचाहार विधानसभा मतदारसंघात भाजप मागील निवडणुकीतील मतांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झाला आहे. या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात समाजवादी पार्टीच्या राकेश पांडे, राकेश प्रताप सिंह, अभय सिंह, मनोज पांडे, विनोद चतुर्वेदी, पूजा पाल आणि आशुतोष मौर्य या आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने मतदान केले होते. अमेठी येथील महाराजी देवी सुद्धा या बंडखोरांमध्ये होत्या.

चंद्राबाबू नायडूंना चार, तर नितीशकुमारांना दोन मंत्रिपदे ! ‘ही’ खास व्यक्तीही मंत्रिमंडळात

समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे उंचाहार भागातील आहेत. रायबरेली आणि अमेठी मतदारसंघात मनोज पांडे यांचा चांगला प्रभाव असल्याचे मानले जाते. असे असतानाही त्यांचा प्रभाव कुठेच जाणवला नाही. मागील वेळी जिंकलेली अमेठीची जागाही भाजपने यंदा गमावली. अशाच पद्धतीने अमेठी मतदारसंघातील गौरीगंजचे आमदार राकेश प्रताप सिंह सुद्धा स्मृती इराणी यांना विजयी करू शकले नाहीत. अमेठीतील सपा आमदार महाराजी देवी यांनीही स्मृती इराणी यांच्यासाठी काम केले पण या कशाचाच फायदा स्मृती इराणी यांना मिळाला नाही.

जलालाबाद येथील समाजवादी पार्टीचे आमदार राकेश पांडे यांनाही भाजपने सोबत घेतले. तसेच त्यांचा मुलगा रितेश पांडे याला निवडणुकीत तिकीट सुद्धा दिले. परंतु त्यांचा पराभव झाला. भाजपने आंबेडकरनगर आणि अयोध्या जागेसाठी गोसाईगंज येथील आमदार अभय सिंह यांना सोबत घेतले. त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही पुरवण्यात आली. परंतु तरीही या दोन्ही मतदारसंघात भाजप उमेदवारांचा पराभव झाला.

समाजवादी पार्टीचे आमदार विनोद चतुर्वेदी कालपी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. हा मतदारसंघ जालौन लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जालौन साधण्यासाठीच भाजपने चतुर्वेदी यांना आपल्या सोबत घेतले होते. परंतु विनोद चतुर्वेदीही भाजपसाठी काही करू शकले नाहीत. या मतदारसंघात मोदी सरकारमधील मंत्री प्रताप सिंह पराभूत झाले.

इंडिया आघाडीने टाकला होता मोठा डाव… नितीश कुमारांना दिली पंतप्रधानपदाची ऑफर

पूजा पाल या कौशांबीतील चाल मतदारसंघाच्या आमदार आहेत. कौशांबी आणि इलाहाबाद मतदारसंघातील गणिते पाहूनच भाजपने त्यांना आपल्या सोबत घेतलं होतं. परंतु या दोन्ही मतदारसंघात भाजपाचा दारुण पराभव झाला. बिसौली मतदारसंघाचे आमदार आशुतोष मौर्य यांचाही भाजपला काहीच फायदा झाला नाही. बदायुं मतदारसंघात समाजवादी पार्टीचे दिग्गज नेते शिवपाल यादव यांचे पुत्र आदित्य यादव यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला.

आझमगड, बलिया आणि आसपासच्या परिसरातील ठाकूर समाजातील मतदारांवर प्रभाव असणारे यशवंत सिंह, नारद राय आणि राम इकबाल सिंह यांचाही भाजपला काहीच फायदा झाला नाही. सन 2022 मध्ये यशवंत सिंह यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या काळातच त्यांना पुन्हा सोबत घेण्यात आले होते. यानंतरही बालिया, आझमगड आणि घोसी या तीनही मतदारसंघात भाजपचे उमेदवार पराभूत झाले.

मुलायम सिंह यांचे निकटवर्तीय राहिलेले मातब्बर नेते आणि माजी मंत्री राजकिशोर सिंह आणि त्यांचे भाऊ ब्रज किशोर सिंह यांना भाजपात घेण्यात आले. बस्ती लोकसभा मतदारसंघात राजकिशोर सिंह यांचा दबदबा आहे असे मानले जाते. मात्र येथील उमेदवार हरीश द्विवेदी यांना त्यांचा काहीच फायदा झाला नाही. या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे राम प्रसाद चौधरी यांनी दणदणीत विजय मिळवला.

follow us

वेब स्टोरीज