Download App

अभिनयात हीट पण, पॉलिटिक्स फ्लॉप; निवडणुकीच्या रिंगणातील अभिनेत्यांची पाटी कोरीच…

अनेक सेलिब्रिटी मंडळी आणि अभिनेत्यांनी राजकारणात एन्ट्री घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात राजकीय पक्षांनी या अभिनेत्यांना तिकीट दिलं आहे.

Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. राजकीय पक्षांकडून जोरदार (Lok Sabha Election 2024) प्रचार सुरू आहे. फोडाफोडीचे राजकारण आणि नेतेमंडळींचं इनकमिंगही सुरू आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळी आणि अभिनेत्यांनी राजकारणात एन्ट्री घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात राजकीय पक्षांनी या अभिनेत्यांना तिकीट दिलं आहे. सिनेमा आणि टीव्हीवरील अभिनेत्यांनी नेहमीच राजकीय पक्षांना आकर्षित केले आहे.

भाजपने सर्वाधिक सेलिब्रिटी मंडळींना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आतापर्यंत जितक्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे त्यात एकूण 9 बॉलीवूड आणि टीव्ही सेलेब्सचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर टीएमसी आहे. या पक्षाने सहा अभिनेत्यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसने गुरुग्राम मतदारसंघातून ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांना उमेदवारी दिली आहे.

Lok Sabha 2024 : काँग्रेसचा मोठा डाव! लडाखमधून भाजपविरोधात तगडा उमेदवार

आता या मंडळींनी राजकारणाची इनिंग सुरू केली असली तरी प्रत्यक्षात ते जनतेची किती प्रमाणात सेवा करतात असा प्रश्न उपस्थित होतो. फिल्मी दुनियेत व्यस्त असलेले हे कलाकार संसदेत लोकांचे प्रश्न किती तडफेने मांडतात? किती वेळा सरकारला प्रश्न विचारतात? याची उत्तरे काही अहवालातून समोर आली आहेत.

सनी देओलची पाटी कोरीच..

मागील लोकसभेतील अभिनेते खासदारांच्या कामगिरीवर नजर टाकली तर निराशाच हाती येते. बॉलिवूडचा डॅशिंग अभिनेता सनी देओलची कामगिरी अतिशय खराब राहिली. सनी देओलने त्याच्या पाच वर्षांच्या खासदारकीच्या काळात संसदेत फक्त चार प्रश्न विचारले. इतकेच नाही तर ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत मतदान करण्याची गरजही सनी देओलला वाटली नाही.

काँग्रेस खासदार आणि प्रसिद्ध गायक सादिक यांनी सुद्धा फक्त दोन प्रश्न विचारण्याचे कष्ट घेतले. पाच वर्षांच्या काळात ते एखाद दुसऱ्या वेळीच लोकसभेत दिसले. मोठ्या पडद्यावर आपल्या खास शैलीतील शब्दफेकीने लोकप्रिय झालेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचेही रेकॉर्ड काही विशेष राहिले नाही. सिन्हा यांनी सुद्धा त्यांच्या खासदारकीच्या काळात मौन राहणेच पसंत केले. एकही प्रश्न त्यांनी विचारला नाही. संसदेतील विविध मुद्द्यांवरील चर्चेतही त्यांनी कधीच भाग घेतला नाही.

महिला खासदारांची कामगिरी शून्य

मथुरा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असलेल्या अभिनेत्री हेमा मालिनी सुद्धा लोकसभेत फार दिसल्या नाहीत. यमुना नदी प्रदूषित होत राहिली पण हेमा मालिनी यांनी संसदेत चकार शब्दही काढला नाही. संसदेतील चर्चेतही त्यांनी कधीच भाग घेतला नाही.

ठरलं तर..! रायबरेलीतून राहुल गांधी लोकसभेच्या रिंगणात; अमेठीतही उमेदवार ठरला

खासदार किरण खेर यांना भाजपने यंदा तिकीट दिले नाही. जरी त्यांना तिकीट दिले असते तरी काही फरक पडला नसता. कारण खासदार म्हणून त्यांची कामगिरी विशेष राहिली नाही. मागील पाच वर्षांत संसदेतील एकही चर्चेत खेर यांनी भाग घेतला नाही प्रश्न विचारणे तर खूप दूर राहिले. भाजपाचेच हंसराज हंस यांनी 2020 नंतर फक्त चार प्रश्न विचारण्याचे कष्ट घेतले. पश्चिम बंगालमधील दोन प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहां आणि मिमी चक्रवर्ती यांनी देखील लोकसभेत काहीच करून दाखवले नाही. लोकसभेत त्याची गैरहजेरीच जास्त होती. या दोघींची हजेरी फक्त 25 टक्क्यांच्या आसपास राहिली.

रवी किशन, मनोज तिवारी, लॉकेट चटर्जींची कामगिरी सरस

यामध्ये काही चांगली कामगिरी करणारे खासदारही आहेत. लॉकेट चटर्जी यांनी मागील पाच वर्षांच्या काळात 43 चर्चासत्रात भाग घेतला आणि 295 प्रश्न सुद्धा विचारले. सात चर्चासत्रांमध्ये त्यांची हजेरी 100 टक्के राहिली. चटर्जी यांचं प्रगतीपुस्तक याबाबतीत उजवं ठरलं आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बाबतीत अभिनेते खासदार रवी किशन यांची कामगिरी चांगली राहिली. रवी किशन यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळात एकूण 480 प्रश्न विचारले. मनोज तिवारी सुद्धा वेळोवेळी संसदेत हजार राहिले, चर्चेत भाग घेतला आणि मतदारसंघातील जनतेचे प्रश्न संसदेत मांडण्याचं कामही त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं.

या अभिनेत्यांना मिळालं लोकसभेचं तिकीट

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावत हिला भाजपने तिकीट दिले आहे. मेरठमधून अरुण गोवील, उत्तर पूर्व दिल्लीमधून मनोज तिवारी, गोरखपूरमधून रवी किशन, अमेठीमधून स्मृती इराणी, मथुरामधून हेमा मालिनी, आझमगडमधून दिनेश यादव उर्फ निरहुआ, हुगळीमधून लॉकेट चटर्जी, त्रिशुरमधून सुरेश गोपी यांना भाजपने तर आसनसोल मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा, जादवपूरमधून सायोनी घोष, मेदिनीपुरमधून जून मोलिया, घाटलमधून दीपक अधिकारी, बीरभूममधून शताब्दी रॉय, हुगळीमधून रचना बॅनर्जी यांना तृणमूल काँग्रेसने तिकीट दिले आहे.

follow us