Odisha Elections 2024 : ओडिशाच्या निवडणुकीत यंदा मुख्य लढत बीजेपी आणि बीजेडी (Odisha Elections 2024) यांच्यात आहे. राज्यात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचं एकहाती नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात या निवडणुकीतही बीजेडी (बिजू जनता दल) मजबूत दिसत आहे. तर दुसरीकडे भाजपला राज्यात नवीन पटनायक यांना पर्यायी नेता मिळालेला नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भाजपने मागील दहा वर्षांच्या काळात स्वतःला मजबूत केले आणि आज राज्यात बीजेडीला टक्कर देत आहे. या दहा वर्षांच्या काळात भापजने कशा पद्धतीने राज्यात आपला दबदबा कसा निर्माण केला याचा आढावा घेऊ या..
सन 1998 मध्ये बीजू जनता दलाने भाजप बरोबर आघाडी करत पहिली निवडणूक लढवली होती. यानंतर दहा वर्षांनी 2009 मध्ये दोन्ही पक्ष वेगळे झाले आणि बीजेडीने स्वबळावर निवडणुका लढवल्या. बीजेडीच्या या खेळीने भाजपला जबर दणका बसला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा भाजपला विशेष काही करता आले नाही पण 2019 मध्ये मात्र भाजपने बाजी उलटवली. या निवडणुकीत दोन्ही पक्षांतील वोट शेअर आणि सीट शेअरमधील अंतर बरेच कमी झाले.
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचं खंबीर नेतृत्व असतानाही भाजपने असं काय केलं की ज्यामुळे राज्यात पक्षाचा जनाधार वाढला. याचं उत्तर काँग्रेसच्या खराब कामगिरीत दडलं आहे. खरं म्हणजे भाजपने काँग्रेसची व्होट बँक फोडण्यात यश मिळवलं. 2009 मधील निवडणुकीत ओडिशात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील मतांची टक्केवारी 32.7 टक्के आणि 16.9 टक्के अशी होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हा आकडा 13.8 टक्के आणि 38.4 टक्के असा झाला.
भाजपतील वाद उफाळला! ४ जूननंतर करेक्ट कार्यक्रम; कपिल पाटलांच्या निशाण्यावर कथोरे का आले?
या आकडेवारीवर नजर टाकली तर असे लक्षात येते की 2009 मध्ये काँग्रेसने राज्यात ज्या 6 जागा जिंकल्या होत्या त्यातील 5 जागा 2014 च्या निवडणुकीत बीजेडीने जिंकल्या आणि एक जागा भाजपला मिळाली. तसेच 2009 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या 27 जागा जिंकल्या होत्या त्यातील 18 जागा 2014 मधील निवडणुकीत बीजेडीकडे गेल्या आणि दोन जागा भाजपने जिंकल्या.
2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्या 23 जागा जिंकल्या यातीलच 18 जागा आधी बीजेडीने जिंकल्या होत्या. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे 2019 च्या आधी बीजेडीने काँग्रेसची व्होटबँक आपल्याकडे वळवली होती. आता यातील एक मोठा हिस्सा भाजप आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरला आहे.
आताच्या निवडणुकीत बीजेडी बरोबर युती करण्याची भाजप नेत्यांची इच्छा होती. यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांत अनेक बैठका झाल्या होत्या. मात्र ही युती काही अस्तित्वात आली नाही. आता दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात मैदानात आहेत. अशात भाजपसमोरील आव्हाने वाढली आहेत. भाजप यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर अवलंबून आहे तर दुसरीकडे त्यांना मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या आव्हानाचा सामनाही करावा लागत आहे.
पटनायक यांच्या लोकप्रियतेत भाजप आपल्या उडिया अस्मितेच्या मुद्द्याला हवा देत आहे. यामध्ये मूळचे तामिळनाडू येथील माजी नोकरशाह व्ही.के. पांडीयन यांना निशाण्यावर घेतले आहे. नवीन पटनायक यांनी राजकारणात घराणेशाही निर्माण केली नाही. म्हणून पांडीयन यांनाच पटनायक यांचा उत्तराधिकारी मानले जात आहे. भाजपने पांडीयन यांच्यावर ओडिशाचा वारसा, संस्कृती आणि भाषेचा सन्मान ठेवत नाहीत असा आरोप केला आहे. आता या मोहिमेचा फायदा भाजपला किती मिळेल याचं उत्तर 4 जूनला मिळेल.
रणनिती की माघार? बिहारच्या निवडणकीत ‘काँग्रेस’चं राजकारण ‘आरजेडी’च्या हातात…
या निवडणुकीत बीजेडीचा आणखी एक प्लस पॉइंट आहे तो म्हणजे महिला बचतगट. राज्यातील स्वयंसहायता गटात 70 लाख सदस्य आहेत. मागील दोन दशकांपासून या मतदारांचा बीजेडीलाच पाठिंबा राहिल्याचे दिसत आहे. पक्षाच्या प्रचार सभा आणि रॅलींमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असते. मिशन शक्ती व्यतिरिक्त सत्ताधारी बिजू जनता दलाने महिलांना पंचायत राज संस्था आणि शहरी पालिकांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले आहे. आपल्या एकूण लोकसभा जागांपैकी 33 टक्के जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित केल्या आहेत. 2024 मधील विधानसभा निवडणुकीत पक्षाने एकूण 35 महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे. मागील पाच वर्षांपूर्वी ही संख्या 19 होती.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला 23 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला फक्त 9 जागा मिळाल्या होत्या. सत्ताधारी बीजेडीला 113 जागा मिळाल्या होत्या. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपला 8 जागा मिळाल्या होत्या. बीजेडीला 12 तर काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती.