नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (1 फेब्रुवारी) सुरु होत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे अधिवेशनाला एक वेगळे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. या अधिवेशनात अर्थसंकल्पाऐवजी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडण्यात येणार आहे. याशिवाय या अधिवेशनात समान नागरी कायदा येणार असल्याचेही बोलले जात आहे. सोबत आणखी कोण-कोणती महत्वाची विधेयके आणि महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. (Shiv Sena has demanded that a motion to congratulate Prime Minister Narendra Modi in the Lok Sabha)
मात्र याव्यतिरीक्त या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचाही ठराव येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचा प्रश्न सोडविला, प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापनाही केली. त्यामुळे या अधिवेशनात लोकसभेत मोदीजींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल शेवाळे यांनी केली आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शेवाळे यांनी ही मागणी केली. यासोबतच समान नागरी संहितेबाबत केंद्राने पूर्ण तयारी केली आहे. समान नागरी कायदा आणून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करावे, वन नेशन वन इलेक्शनची अंमलबजावणी लवकर व्हावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर आता या मंदिराच्या उभारणीचे श्रेय भाजपसह मित्रपक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.