भाजप बहुमताचा आसपासही नाही… तरी तावडेंनी सगल तिसऱ्या वर्षी चंदीगडचे मैदान कसे मारले?
2021 ची चंदीगड महापालिकेची निवडणूक. आम आदमी पक्षाने सर्वाधिक 14 जागा जिंकल्या. त्यापाठोपाठ भाजपने 12 आणि काँग्रेसने आठ जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाच्या वाट्याला एक जागा आली. आता सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा नैसर्गिक क्लेम आम आदमी पक्षाचा असेल असे तुम्हाला वाटत असेल तर थोडे थांबा. इथे बहुमत नसतानाही यंदा सलग तिसऱ्या वर्षी महापौरपदावर भाजपने बाजी मारलीय, नुकत्याच पार पडलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मनोज सोनकर यांनी दणदणीत विजयी मिळविला आहे. त्यांनी आम आदमी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुलदीप कुमार यांचा चार मतांनी पराभव केला. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र येत बहुमताचा आकडा तयार केला होता. मात्र त्यानंतरही भाजपने बाजी कशी मारली असा सवाल विचारला जात आहे.
भाजपने नेमके हे गणित कसे सोडविले, मागील दोन्ही वर्षी काय केले होते, पाहुयात.
स्वतंत्र भारतातील पहिले पूर्वनियोजित आणि उत्तर भारतातील सर्वात सुंदर शहर चंदीगड. पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांची राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश असल्याने या शहराला राजकीय दृष्याही मोठे महत्व आहे. सहाजिकच इथली महानगरपालिका आणि महापौरपदही अत्यंत महत्वाचे समजले जाते. हेच महत्वाचे महापौरपद भाजपने मागील आठ वर्षांपासून आपल्या ताब्यात ठेवले आहे. यातील आधीचे पाच वर्ष पूर्ण बहुमत होते. त्यामुळे त्यावर चर्चा नको. पण पूर्ण बहुमत नसताना एवढ्या मोठ्या महापालिकेचे महापौरपदी सतत तीन वर्षे आपला उमेदवार उभा करणे तो निवडून आणणे आणि टिकवून ठेवणे तसे अवघडच!
भाजपसाठी हीच अवघड कामगिरी सातत्याने पार पाडली ती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी. 2019 च्या निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर ज्या तावडेंचे राजकारण संपले संपले असे वाटत होते त्या तावडेंनी मागच्या तीन ते चार वर्षांमध्ये भाजपला हिमाचल प्रदेशपासून राजस्थान, बिहार आणि चंदीगड अशा बऱ्याच अवघड मोहिमा फत्ते करुन दिल्या आहेत.
मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल; आंबेडकरांचा खळबळजनक दावा
ऑक्टोबर 2021 मध्ये तावडे यांची चंदीगडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. डिसेंबर 2021 मध्ये निवडणुका पार पडल्या. यात भाजप दोन नंबरला राहिला. पण महापौरपदावर सलग तिसऱ्या वर्षी बाजी मारली आहे. पहिल्या वर्षीच्या महापौरदाच्या निवडणुकीत भाजपला 14 मते मिळाली तर आपला 13. अवघ्या एका मताने भाजपने मैदान मारले. निवडणूक होताच आम आदमी पक्षाच्या एका आणि काँग्रेसच्या एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसच्या सात आणि शिरोमणी अकाली दलाच्या एका अशा आठ नगरसेवकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. सहाजिकच भाजपचा विजय सोपा झाला.
दुसऱ्या वर्षी काँग्रेसच्या एका नगरसेवकाने आम आदमी पक्षात प्रवेश केला. इथे आता भाजपचेही 14 नगरसेवक झाले अन् आम आदमी पक्षाचेही चौदाच. यावेळीही काँग्रेसचे सहा आणि शिरोमणी अकाली दलाचा एक असे सात नगरसेवक तटस्थ राहिले. दोन्ही पक्षाला समसमान मते असताना इथे कामाला आला एक नियम. चंदीगड महापालिकेच्या नियमानुसार तिथल्या खासदारांनाही महापौरपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असतो. चंदीगडला भाजपच्या किरण खेर खासदार आहेत. खेर यांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केले अन् पुन्हा एकदा भाजपने एका मताने बाजी मारली.
आता यंदा तिसऱ्या वर्षी काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण यंदा आम आदमी पक्षाच्या एका नगरसेवकाने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आपचे पुन्हा 13 नगरसेवक झाले होते. तर काँग्रेसचे सात. या दोन्ही पक्षांनी यंदा इंडिया आघाडी म्हणून एकत्र येत ही निवडणूक लढविण्याचे ठरविले आणि बहुमताचा आकडाही तयार केला. आता काहीही झाले तरी यंदा भाजपला पाणी पाजायचेच अशी तयारी केली. भाजपसमोर मोठे आव्हान होते. अशावेळी भाजपने मनोज सोनकर यांना मैदानात उतरविले. तर आम आदमी पक्षाने कुलदीप कुमार यांना संधी दिली.
‘भाजप आमदाराला रोखा’; रोहित पवारांची टोलेबाजी करत अजितदादांकडे विनवणी
आम आदमी पक्षाच्या 13 आणि काँग्रेसच्या सात अशा 20 नगरसेवकांनी कुमार यांना मतदान केले. सहाजिकच निकाल आम आदमी पक्षाच्या बाजूने लागेल अशी जवळपास सर्वांनाच खात्री होती. पण या दोन्ही पक्षांचे गणित निकालानंतर चुकले. या दोन्ही पक्षांची आठ मते बाद ठरली. भाजपला स्वतःची 14, किरण खेर यांचे एक आणि शिरोमणी अकाली दलाचे एक अशी 16 मते मिळाली. आठ मते बाद ठरल्याने बहुमताचा आकडाही खाली घसरला अन् 16 मते घेतलेले भाजपचे सोनकर महापौरपदी विराजमान झाली.
या निवडणुकीनंतर आपने उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. दिवसाढवळ्या भाजपने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. आता या आरोपांचे पुढे काय होईल, न्यायालयात काय निकाल लागेल हे बघितले जाईल. पण सध्या तरी भाजपने मैदाना मारले आहे, हेच खरे.