मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. येत्या 19 फेब्रुवारीला त्यांचा आणि त्यांचा मुलगा, खासदार नकुल नाथ यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत तब्बल 12 आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. (Veteran Congress leader Kamal Nath and his son, MP Nakul Nath are set to join the BJP)
मात्र स्वतः कमलनाथ यांनी या सगळ्या चर्चांवर एकाच ओळीत उत्तर दिले आहे. पत्रकारांनी कमलनाथ यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, असे काही घडले तर मी तुम्हाला आधी कळवीन. या दरम्यान, त्यांनी कुठेही या चर्चांना फुलस्टॉप दिला नाही. यासोबत छिंदवाडा येथील त्यांचा नियोजित कार्यक्रम रद्द करून अचानक दिल्ली दौरा जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या अधिवेशनानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे कमलनाथ यांच्याबाबत सुरू असलेल्या या चर्चांवर काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले, मी काल रात्रीच कमलनाथ यांच्याशी बोललो होतो. ते छिंदवाडामध्ये आहेत. नेहरू-गांधी घराण्यापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या व्यक्तीने इंदिराजींच्या कुटुंबाला सोडून जाण्याची अपेक्षा कशी करू शकतो? आपण ही अपेक्षाही करू नये, असेही त्यांनी सांगितले.
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते म्हणाले की, इंदिरा गांधीजींनी कमलनाथ यांना आपला तिसरा मुलगा मानले होते. आम्ही प्रत्येक परिस्थितीत काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून उभे राहु. प्रत्येक भूमिकेत ते निर्भयपणे आपले काम करत आले आहेत. जेव्हा सिंधियाजींनी काँग्रेस सरकार पाडले होते, तेव्हाही काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता कमलनाथजींच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे या बातम्या निराधार आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काही महिन्यांपूर्वी निवडणूक लढवली ती व्यक्ती काँग्रेस सोडू शकते, याची कल्पनाही आपण स्वप्नातही करू शकत नाही.
77 वर्षीय कमलनाथ हे मागील सहा दशकांपासून काँग्रेससोबत आहेत. ते तब्बल नऊवेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. याशिवाय जवळपास 16 वर्षे केंद्रात विविध खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये मध्य प्रदेशचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुराही देण्यात आली होती. मात्र ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
काही दिवसांपूर्वी पार पडलेली मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लढवली होती. मात्र यात काँग्रेसचा मोठा पराभव झाला. भाजपने दोन तृतीयांश जागा जिंकत सत्ता स्थापन केली. त्यावेळी या पराभवाचे खापर कमलनाथ यांच्यावर फोडत त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आाला होता. तेव्हापासूनच ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र ते पक्ष सोडतील असा अंदाज कोणत्याही काँग्रेस नेत्याने व्यक्त केला नव्हता.