Amol Kolhe on Vilas Lande : पुढील वर्षात लोकसभा (Lok Sabha) निवडणुका होणार आहेत. त्यामुळं आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली. अनेक मतदार संघावर नेते आणि पक्ष आपला दावा सांगत आहेत. अशातच खा. अमोल कोल्हे यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पवार कुटूंबियांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांचे भावी खासदार म्हणून प्लेक्स लागले. दरम्यान, शिरूरमध्ये लांडे यांनी खा. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या विरोधात दंड थोपटल्याने राष्ट्रवादीला कुणाला खासदारकीची संधी देणार याविषयी चर्चा रंगू लागली. दरम्यान, खा. कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिरूर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना खासदार अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका मांडली. शिरूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारीबाबत तर्कवितर्क लावले जात असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. अनेक लोक मला विचारत आहेत, मीडियामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण या संदर्भात मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की 2019 मध्ये शरद पवारांनी मला संधी दिली. त्यांच्या आशीर्वादाने आणि शिरूरच्या मतदारांच्या पाठिंब्याने मी लोकसभेत प्रतिनिधीत्व करत असताना त्या मतदारसंघात कामं केली. यावेळी त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखाचा मांडला.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे स्थळ ठरले, ‘या’ ठिकाणी होणार सभा
कोल्हे म्हणाले, या मतदारसंघात तीन महत्त्वाचे प्रश्न होते. पहिला प्रश्न पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा. त्यावर उपाय म्हणून पाच बायपास रस्ते मंजूर करून सुरू झाले आहेत. दुसरा म्हणजे, मुळशी ते चांदौली एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे चाकण चौकातील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. हा प्रकल्प ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू होईल. बैलगाडी शर्यतीचा प्रश्नही आपण सोडवला आहे. तिसरा मुद्दा म्हणजे पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पाठपुरावा करून भूसंपादनापर्यंत आणला. आता फक्त मंत्रिमंडळाची परवानगी बाकी आहे. वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या संकुलासाठी निधी मंजूर झाला आहे.
शिरूर लोकसभा उमेदवारीबाबत खासदार अमोल कोल्हे म्हणाले, माझ्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने एखाद्या मतदारसंघावर कोणताही दावा करणे किंवा छातीठोकपणे सांगण तर्कसंगत नाही. या सगळ्या चर्चांवर माझ्याकडे एकच उत्तर आहे. शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, असं कोल्हे म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून खासदार डॉ. अमोल कोल्हे हे NCP च्या व्यासपीठावर ते दिसले नाही. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारातही ते दिसले नव्हते. इतकचं काय तर कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, आज विलास लांडे यांचे भावी खासदार असे बॅनर सगळीकडे लागले. त्यामुळं आता राष्ट्रवादी कोणाला खासदारकीची संधी देणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.