Balasaheb Ajabe : संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh murder) प्रकरणात आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मंत्री धनंजय मुंडेसह (Dhananjay Munde) त्यांचा निकटवर्तीय वाल्मिकी कराडला पुरतं घेरलं. दरम्यान, गेले काही महिने आक्रमक पवित्रा घेणाऱ्या धसांवर माजी आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajabe) यांनी आरोप केला. धस यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर मतदारसंघातील विविध ठिकाणच्या देवस्थानच्या जमिनी करण्यात आल्या आहेत, असा आरोप आजबेंनी केला.
तसेच महायुतीमध्ये एकत्र असून धसांकडून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय, त्यांची बिले अडवली जात आहेत. याची दखल न घेतल्यास स्वतंत्र निर्णय घेऊ, असं आजबे म्हणाले.
बाळासाहेब आजबे यांनी रविवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, महायुतीमध्ये असताना बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आमची काम अडवण्यात आली. कार्यकर्त्यांची बिले अडवली, महायुतीमध्ये एकत्र असून धस यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्याना त्रास दिला जातोय, यासंदर्भात तक्रार करूनही महायुतीत दखल घेतली जात नाही. यापुढं दखल न घेतल्यास आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ, भलेही एमआयएमध्ये जावे लागले तरी तिथं जाऊ, असा इशाराच आजबेंनी दिला.
कृषिमंत्र्यांना पदावरून हटवण्याची तत्परता कधी दाखवणार?, दानवेंचा महायुती सरकारला सवाल
तसेच आजबे यांनी देवस्थानच्या जमिनी बळकावल्याबाबत धस यांच्यावर गंभीर आरोपही केला. धस यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर मतदारसंघातील विविध ठिकाणच्या देवस्थानच्या जमिनी करण्यात आल्या आहेत, असा आरोप आजबेंनी केला.
आजबे म्हणाले, मी अन्याय सहन करणारा माणूस नाही. माझ्या पार्टीने माझी दखल घेतली नाही, तर एमआयएमध्ये जायची पाळी आली तर माझी तयारी आहे. माझ्या कुटुंबाला अटक करण्यासाठी खोटे पत्र देण्यात आले आहे. जिथे उजाडेल, तिथं उजाडेल, आता मी तुमचे प्रकरणे काढतो आणि तुम्ही माझे प्रकरण काढा… मात्र, सुरेश धस यांना आता कुठेही सुट्टी देणार नाही. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत कळवले आहे. अजितदादांनाही सांगितलं आहे. आम्हाला जर महायुतीमध्ये असताना जर काम चालू करणं आणि बिल कऱण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर तसाही निर्णय घेऊ, असा इशारा आजबेंनी दिला.