Cm Devendra Fadanvis : राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन (Santosh Deshmukh) वातावरण तापलंय. या प्रकरणावरुन अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांसह भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. तसेच कृषिमंत्री असताना मुंडे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही केला जातोयं. या संपूर्ण प्रकरणानंतर सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीवरुन धस टीकेचे धनी होत आहेत. अखेर धस-मुंडे भेटीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडलं असून एखादा आमदार मंत्र्यांना भेटला तर कुठलाही फरक पडत नसल्याचं स्पष्ट मत फडणवीस यांनी मांडलंय.
लाडक्या बहिणींंनंतर आता लाडक्या भावांचीही पडताळणी; शासकीयऐवजी खासगी उद्योगांमध्येच प्रशिक्षण
धस-मुंडे भेटीबाबत पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकशाहीमध्ये संवाद सुरु राहिला पाहिजे. आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या प्रकारे खंबीरपणे भूमिका घेतली, ही भूमिका आपण सर्वांनी बघितली. ही भूमिका घेत असताना संवाद तोडून टाकायचा, असं करण्याची आवश्यकता नाही. मुंडे हे राज्याचे मंत्री आहेत. एखादा आमदार मंत्र्याला भेटला तर त्याने कुठलाही फरक पडत नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस कमालीचे आक्रमक राहिले. सर्वात प्रथम सुरेश धस यांनी नागपूर अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरला. सुरेश धस यांनी विधानसभेत आक्रमक शैलीमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनाचे वर्णन करून सांगितले. त्यानंतर संतोष देशमुख हत्याकांडाचे गांभीर्य राज्याचे समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते. तसेच एसआयटी गठीत केली. त्यानंतर एक-एक साखळी जोडली गेल्याने आरोपींना अटक झाली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडही सीआयडीसमोर हजर झाला.
वाल्मिक कराडचा उल्लेख सुरेश धस आका असा करतात. तर धनंजय मुंडे यांना आकाचा आका म्हणतात. त्यानुसार आकाचे आकाही सापडू शकतात, असे ते जाहीरपणे सांगत तेव्हा त्यांचा रोख हा धनंजय मुंडे यांच्याकडे असतो. त्यांनी मुंडेंना बीडचे पालकमंत्री त्यांनी होऊ दिले नाहीत. थेट मंत्रीपदावरून हकालपट्टीची भाषा सुरेश धसांची होती. पण सुरेश धसांची आक्रमकपणाची हवा शुक्रवारी एका बातमीने निघून गेली. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने धसांवर टीकेची तोफ डागण्यात येत आहे.