Download App

“माझी पिट्या… माझी पिट्या…” : धनंजय मुंडेंना आले प्रेमाचे भरते! नेमके गुपित काय?

बीड म्हटलं की मुंडे कुटुंब आणि भावाबहिणींमधला राजकीय संघर्ष या दोन गोष्टी प्रामुख्याने चर्चेला येतात. पण “माझी पिट्या… माझी पिट्या” असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी बहिण खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मारलेल्या हाकेची सध्या बीड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे. मागील एक दशक दोघांमधील संघर्ष पाहिल्यानंतर या प्रेमाच्या हाकेमुळे बीडमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Dhananjay Munde reconciled with sister MP Pritam Munde)

मुंडे यांचे बहिणीवरील प्रेमाचे गुणगाण इथेच थांबले नाही. माझ्या बहिणीची जबाबदारी मी आता माझ्या खंद्यावर घेतोय, आगामी लोकसभेला त्या तिसऱ्यांदा खासदार होतील. त्या विक्रमी मतांनी निवडून येतील. त्यांच्या विजयाची नोंद दिल्लीपर्यंत घेतली जाईल, असेही ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात बहीण-भावामधील हे प्रेम बीडवासियांनी कित्येक वर्षांनंतर अनुभवले.

हे दृश्य एका बाजूला असतानाच काही दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी अचानक पंकजा मुंडे यांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी पंकजा यांनी त्यांचे औक्षणही केले होते. बर, त्यांनी ही भेट गुप्तही ठेवली नाही. त्यांनी एक-दोन दिवसांतच या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतरही दोन ते तीन प्रसंगात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी जाहिररीत्या आमच्यातील संघर्ष आता संपले असे म्हंटले आहे.

पण या प्रेमाचे भरते येण्यामागचे नेमके गुपित काय आहे? कौटुंबिक आहे की राजकीय आहे? बहीण-भावाच्या नात्यातील ही दरी केवळ धनंजय मुंडे महायुतीतमध्ये आल्यामुळेच मिटली आहे का? असे अनेक सवाल आता उपस्थित विचारले जाऊ लागले आहेत. याच सगळ्या प्रश्नांचा लेट्सअप मराठीने घेतलेला हा आढावा.

विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारी धनंजय की पंकजा, नेमकी कोणाला द्यायची? यावरून मुंडेंच्या घरात कलह सुरू झाला. पंकजा मुंडेंना उमेदवारी दिल्यानंतर त्याचे पर्यवसान राजकीय संघर्षात झाले. त्यानंतर हा संघर्ष शांत करण्यासाठी धनंजय मुंडे यांना विधानपरिषद देण्यात आली. पण संघर्ष वाढतच गेल्याने साधारण 2011 च्या शेवटी धनंजय मुंडे यांनी भाजपसोबतचा घरोबा संपवून राष्ट्रवादीची वाट धरली. काका गोपीनाथ मुंडेंचा हात सोडून शरद पवार यांचा हात धरला.

त्यानंतर दोन्ही घरांमध्ये राजकीय ठिणगीही पडली. धनंजय मुंडे यांनी परळीच्या नगरपालिकेत गोपीनाथ मुंडे यांना चित केले, तर गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या सह्याने शिरसाळा गटातून पंडितअण्णांना पराभूत केले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत परळीत गोपीनाथ मुंडेंना गेवराई, माजलगाव, केज या मतदारसंघांपेक्षा कमी आघाडी मिळाली. एका अर्थाने परळी मतदारसंघात धनंजय मुंडे यांची सरशी झाली होती. बाजार समितीही त्यांनीच ताब्यात घेतली.

पुढे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पुतण्या विरुद्ध काका असलेल्या संघर्ष भावा-बहिण्याच्या संघर्षात शिफ्ट झाला. वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री यांनी या संघर्षाला हवा दिली. मुंडेंच्या चौदाव्याच्या कार्यक्रमात वंजारी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री आणि पंकजा यांनी, ‘आता तडजोड नाही,’ असे जाहीर करून धनंजय मुंडेंचे यांचे परतीचे दोर कापले.

त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही आपली ताकद दाखविण्यासाठी जीवाचे रान करण्यास सुरुवात केली. पण विधानसभेला त्यांचा पराभव झाला. गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे तयार झालेल्या सहानुभुतीच्या लाटेवर स्वार होत जवळपास 25 हजारांच्या मताधिक्याने पंकजा मुंडे विजयी झाल्या. मी भावाच्या विरोधात उभी नाही, पण भाऊ माझ्या विरोधात उभा आहे, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांना खलनायकाच्या भुमिकेत टाकले. पण पवार यांनी धनंजय मुंडे यांना ताकद दिली.

धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिले. मुंडेंनीही या संधीचा उपयोग करुन घेतला. भाषणांनी सभागृह गाजवली. राज्यात सभा गाजवल्या. फडणवीस सरकारला अडचणीत आणण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न केले. पंकजा मुंडे यांच्यावर झालेल्या चिक्की घोटाळ्याच्या आरोपांनंतर तर त्यांनी पंकजा यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवले होते. धनंजय मुंडे राजकारणातील एक एक पायरी वर चढत होते. ते राज्याचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.

पुढे नगरपालिका, जिल्हा परिषद, साखर कारखाना, बँक अशा प्रत्येक निवडणुकीत हा संघर्ष कायम राहिला. परळीत 2019 मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव करत धनंजय मुंडे यांनी वर्चस्ववादात आणखी सरशी घेतली. ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना धनंजय मुंडेंच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आले. त्यात दोघी बहिणींनी त्यांच्यावर टीका करत या वादळात हात धुवून घेतले.

त्यानंतरही धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था, माफिया राज अशा अनेक प्रश्नी त्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. अगदी अलिकडेपर्यंत या दोन्ही बहिणी एका बाजूला आणि धनंजय मुंडे यांनी एका बाजूला असे चित्र होते. ज्या धनंजय मुंडेंनी आता प्रीतम मुंडेंना तिसऱ्या खासदार करण्याची जबाबदारी घेतली आहे, त्याच प्रीतम मुंडे यांच्या कार्यक्षमेतवर त्यांनी जुलै 2022 मध्ये प्रश्न उपस्थित केला होता. “छत्तीसगडमधील वैद्यनाथ मंदिराला केंद्र सरकार 1600 कोटी रुपये देते, त्यावेळी आपल्या भागातील प्रतिनिधी काय करतात? अस प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

पण अलिकडील काही दिवसांमध्ये या भावा बहिणींमधील संघर्ष निवळला आहे. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांना राजकाराणाव्यतिरीक्त एका प्रकरणातून सावरण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मदत केल्याची चर्चा आहे. तिथेच दोघांमधील कौटुंबिक दरी मिटली. त्यानंतर धनंजय मुंडे महायुतीत आल्याने अपरिहार्यता म्हणून राजकाराणातील दरी मिटवून घ्यावी लागली आहे. ही दरी मिटविण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोठी मदत केल्याची चर्चा आहे. परळी धनंजय मुंडेंसाठी सोडणे, लोकसभेला प्रीतम मुंडेंना सेफ करणे आणि पंकजा मुंडेंचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्वासन अशा गोष्टी फडणवीस यांनी केल्याचे बोलले जाते.

सुषमा अंधारे कल्याणमध्येच शिंदेंची कोंडी करणार ? स्थानिक पदाधिकाऱ्यानेच आखला ‘प्लॅन’

येत्या जुलै महिन्यात विधान परिषदेच्या अकरा जागा रिक्त होत आहेत. यात भाजपच्या चार, राष्ट्रवादीची एक, काँग्रेसच्या दोन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक, शिवसेना एक, शेकाप एक आणि रासप एक अशा जागांचा समावेश आहे. आताच्या घडीला संख्याबळ पाहता भाजपच्या पाच, राष्ट्रवादीची दोन, शिवसेनेची दोन, काँग्रेसच्या दोन अशा जागा निवडून येऊ शकतात. सोबतच धाराशिव-लातूर-बीड इथली स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरेश धस यांचीही जागा जून महिन्यातच रिक्त होत आहे. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

एकूणच काय तर तिन्ही मुंडे भावा-बहिणींचे कौटुंबिक संघर्ष मिटले, राजकारण फडणवीस यांनी सेट करुन दिले. त्यामुळेच सध्या प्रेमाचे भरते आले आहे, सगळे गोड गोड वाटत आहे, असेच म्हणावे लागेल. हेच पुढील काही दिवस चित्र तरी कायम राहणार असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

follow us