Download App

Ground Zero : आंबेगावात शरद पवारांची जादू चालणार? वळसेंसाठी धोक्याची घंटा

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम उमेदवार असू शकतात.

राष्ट्रवादीतील बंडानंतर पुतण्या फुटल्याची सल तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मनात आहेच. त्यापेक्षा जास्त सल आहे मानस पुत्र मानलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी साथ सोडल्याची. त्यामुळेच तब्बल 35 वर्षे आमदार, 25 वर्षे मंत्री विधानसभा अध्यक्ष राहिलेल्या वळसे पाटील यांना धडा शिकविण्याची भाषा अनेकदा शरद पवारांनी थेट आंबेगाव मतदारसंघात जाऊन केलीय. (In Ambegaon assembly constituency NCP’s Sharad Chandra Pawar’s Devdatt Nikam may be the candidate against NCP’s Dilip Valse Patil)

दिलीप वळसे हे संधीसाधू असून, त्यांनी येथील जनतेला न्याय दिलेला नाही. आता त्यांना उत्तर शोधावे लागेल. त्यांना आम्ही खूप काही दिले. विधानसभेचे अध्यक्ष, मंत्रिपदे दिली, देशाच्या साखर उद्योगाचे अध्यक्षपद दिले. एवढे दिल्यानंतर दत्तात्रय पाटील यांच्या ठायी जी निष्ठा होती, त्यातील पाच टक्के निष्ठासुद्धा दिलीप वळसे यांच्यात नाही, अशी थेट टीका शरद पवारांनी केली. त्याला वळसे यांनीही जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यंदा आंबेगाव मतदारसंघाची निवडणूक ही काँटे की टक्कर असणार आहे. पण आता या संघर्षात वळसे पाटील स्वतः उभे राहणार की राजकारणातून निवृत्ती घेत मुलीला संधी देणार, शरद पवार गटाकडून ताकदवान उमेदवार कोण असेल?

पाहुया लेट्सअपच्या ग्राऊंड झिरो या सिरिजमधून.

पूर्वीचा मंचर आणि आताच्या आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील 1990 पासून निवडून येत आहेत. आतापर्यंत त्यांनी विधानसभा अध्यक्षपद ते गृहमंत्रीपदापर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आताच्या महायुती सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत. 1990 पासूनच वळसे पाटील सहज निवडून येतात. अगदी 2009 पासूनच्या निवडणुकीचा त्यांचा आलेख पाहिला तर ते समजून येते.

2009 मध्ये दिलीप वळसे हे 99 हजार 851 मते घेऊन विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात कट्टर राजकीय शत्रू, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील या शिवसेनेतून रिंगणात होत्या. त्या 62 हजार 502 मतेच घेऊ शकल्या. 2014 ला राष्ट्रवादीला दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे अरुण गिरे यांच्यात लढत झाली. या लढतीत वळसे पाटील हे 1 लाख 20 हजार 235 मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या विरोधक उमेदवाराला 62 हजारच मते मिळू शकली होती. दुप्पट मताधिक्याने वळसे पाटील हे निवडून आले. 2019 मध्ये दिलीप वळसे विरुद्ध शिवसेनचे राजाराम बाणखेले यांच्यात लढत झाली. त्यात वळसे पाटील विरोधी उमेदवारापेक्षा दुप्पट मतांनी निवडून आले. दिलीप वळसे यांना 1 लाख 26 हजार 120 मते तर बाणखेले यांना 59 हजार 345 मते मिळाली होती.

Ground Zero : जे. पी. गावितांसाठी लढाई सोपी; पवारांच्या घरातून आमदारकीही जाणार?

मात्र राष्ट्रवादीतील बंडानंतर आणि शरद पवारांना मिळालेल्या सहानुभूतीच्या वातावरणानंतर या मतदारसंघातील समीकरणे बदलले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांनाच 11 हजार मतांचे लीड मिळाले आहे. डॉ. कोल्हेंना 93 हजार 387 मते, तर आढळरावांना 82 हजार 19 मते मिळाली. आढळराव हे आंबेगाव मतदारसंघातील आहेत. त्यांना वळसेंचा साथ होती. तरीही यंदा ते येथून पिछाडीवर राहिले आहेत. त्यामुळे यंदा द्रिपोळसे पाटील यांच्यासाठी आंबेगाव ची लढाई सोपी नसल्याचे बोलले जाते.

ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा या सूत्रानुसार महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाच जाईल. मात्र तब्येतीच्या कारणाने मंत्री दिलीप वळसे पाटील हे या मतदारसंघातून यंदा निवडणूक लढविणार नाही, असे बोलले जात आहे. त्यांच्याऐवडी त्यांच्या कन्या अॅड. पूर्वा वळसे पाटील यांचा या मतदारसंघात वावर वाढला आहे. मध्यंतरी शरद पवार गटात जाऊन त्या निवडणूक लढतील, असे बोलले जात होते. परंतु खुद्द शरद पवारांनी हे खोडून काढले आहे. त्यामुळे ही शक्यता कमी आहे. या परिस्थिती त्या अजित पवार गटाकडून रिंगणात उतरतील.

तर महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ हा शरद पवार गटाकडे जाईल. पण ही जागा ठाकरे गटाला हवी आहे. या जागेवर शिवसेना लढत असून, शिवसेनेला ही जागा मिळावी, अशी मागणी येथील शिवसैनिक आता करू लागले आहेत. शिवसेना दावा करत असले तरी वळसेंना फाइट देण्यासाठी ही जागा शरद पवार आपल्याकडे घेतील आणि तगडा पहिलवान रिंगणात उतरवतील. वळसे यांच्याविरोधात शरद पवार यांच्याकडून देवदत्त निकम यांना मैदानात उतरविले जाऊ शकते. तसे पाहिले तर देवदत्त निकम हे वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक होते. परंतु निकम हे आता शरद पवार गटात आहे. त्यामुळे तेच येथून प्रबळ दावेदार आहेत. निकम हेही स्थानिक मोठे नेते आहेत. वळसे पाटील यांच्या भीमाशंकर सहकारी कारखान्याचे ते तब्बल दहा वर्षे अध्यक्ष होते.

Ground Zero : अकोलेमध्ये पिचड-लहामटेंचे काय होणार? शरद पवारांनी शोधलाय तगडा पर्याय!

निकम हे 2014 मध्ये आढळराव पाटील यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढले होते. वळसे पाटील यांनीच त्यांनी तिकीट मिळवून दिले होते. परंतु ते तीन लाख मतांनी पराभूत झाले. मंचर बाजार समितीचे ते सभापतीही होते. गेल्या वर्षी देवदत्त निकम यांना वळसे पाटील यांनी उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी त्यांनी वळसे यांच्या विरोधात संघर्ष करत ते निवडणुकीत उभे राहिले आणि अपक्ष म्हणून संचालकही झाले. त्यामुळे निकम हे वळसे यांना फाइट देऊ शकतात.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही भूमिका इथे महत्वाची असणाद आहे. ते लोकसभा लढण्यासाठी अजित पवार गटाकडे गेले होते. पण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच आहे. त्यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचे पुर्नवसन करण्यात आलेले आहे. या मतदारसंघात त्यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. आता खरंच राजकीय बदला घ्यायचा असेल तर शरद पवार हे येथून निकमसारखा तगडा उमेदवार देतील आणि निवडून आणण्याचा प्रयत्न करतील. परंतु वळसे हे मध्यंतरी हॉस्पिटलला होते. तेव्हा पवार हे त्यांना भेटले होते. या परिस्थितीत वळसे यांनी माघार घेत मुलीला उभे केल्यास पवार यांची भूमिका बदलेल का ही महत्त्वाचे ठरेल

follow us