Download App

Sangli Lok Sabha : …तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार; चंद्रहार पाटलांचे मोठे विधान

  • Written By: Last Updated:

Chandrahar Patil On Sangli Lok Sabha : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. त्यांनी या मतदारसंघातून चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, त्यानंतर आता चंद्रहार पाटील यांनी मोठं विधान केलं.

आज सांगलीत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करतांना चंद्रहार पाटील म्हणाले, केवळ शेतकऱ्यांचा मुलगा खासदार व्हायला नको, हे कॉंग्रेसे उघडपणे सांगावं. मान्य आहे की, माझा कोणताही कारखाना नाही, मी माजी मुख्यमंत्र्यांचा नातू नाही… माझी आणि माझ्या उमेदवारीची अडचण होत असेल तर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी जयंत पाटील, शिवसेना नेते नितीन बानगुडे-पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला असता उद्धव ठाकरेंनी माझी उमेदवारी जाहीर केली. मिरजेत उद्धव ठाकरे यांची मोठी सभा झाली, त्यात त्यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. तिसऱ्यांदा पक्षाने पत्राद्वारे माझी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली. चौथ्यांदा महाविकास आघाडीच्या पत्रकात माझी उमेदवारी जाहीर झाली. चार वेळा उमेदवार जाहीर करूनही आमचे मित्रपक्ष आपल्यापासून दूर आहेत, असं चंद्रहार पाटील म्हणाले.

ते म्हणाले, नेमकं त्याचं दुखणं काय आहे, हे मला अजूनही समजले नाही. शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतोय, ही तुमचं दुखणं का? की इथे शिवसेना पक्षाची ताकद कमी आहे याचे दु:ख आहे? महाविकास आघाडी केवळ सांगलीपुरती नाही. महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असून इंडिया आघाडीही देशात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांचं नेमकं काय दुखणं आहे, हे मला कळलं नाही.

विशाल पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडीने शिवसेनेसाठी सोडली आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांनी सांगली लोकसभेसाठी अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल केला.

follow us