मिठाचा खडा पडलाच! महाविकास आघाडीत पहिली बंडखोरी, विशाल पाटलांनी भरला अपक्ष अर्ज

Sangli Lok Sabha :

Vishal Patil : गेली अनेक दिवसांपासून सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदार संघावरून शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसमध्ये धुसफूस सुरु होती. शिवसेना (उबाठा) पक्षाने चंद्रहार पाटील (Chandrhar Patil) यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील कमालीचे नाराज होते. अखेर त्यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दखल करून बंडखोरी केली आहे. ही महाविकास आघाडीतील पाहिली बंडखोरी आहे. तसंच, उद्या ते सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचंही बोललं जात आहे

 

उघड नाराजी व्यक्त केली होती

सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसची जागा होती. त्या जागेबद्दल चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी ही जागा जाहीर केली, असा आरोप विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही केला होता. तसंच, या जागेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, काँग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार वर्षा गायकवाड यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यावर बोलताना, आता निर्णय झाला असून पुढचा विचार करा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती.

 

दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे केली होती चर्चा 

आमदार सतेज पाटील आणि विशाल पाटील यांनी दिल्लीला जाऊन वरिष्ठ नेत्यांकडे सांगली लोकसभेच्या जागेबाबद फेरवीचार करावा अशी विनंती केली होती. तसंच, सांगली लोकसभेच्या राजकीय समीकरणाबाबद माहिती दिली होती. मात्र, त्यानंतरही काही कारवाई झाली नाही. त्याचदरम्यान खासदार संजय राऊत यांनी सांगली जागेसाठी काँग्रेस पंतप्रधान पद सोडणार का अशी प्रतिक्रिया दिली होती. तसंच, काँग्रेस नेत्यांनी नौटंकी बंद करावी अशीही थेट टीका राऊत यांनी केली होती. त्यावरून प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले आणि राऊत यांच्यात चांगलीच खाडाजंगी झाली होती.

कोण आहेत विशाल पाटील? 

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे विशाल पाटील हे नातू आहेत. माजी खासदार प्रकाशबापू पाटील आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव, तर माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत. विशाल पाटील यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले. त्यांच्या पत्नीचे नाव पूजा असून त्यांना ईहिता व अरित्रा या दोन मुली आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात विशाल पाटील यांचे दादा घराणे महत्त्वाचे मानले जाते.

भाजपलाही मोठा धक्का

पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित सांगली लोकसभेत भाजपांतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा उमेदवारी दिल्याने जतचे भाजपचे माजी आमदार विलास जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेस पाठोपाठ भाजपलाही मोठा धक्का बसला आहे.

follow us