चंद्रहार पाटलांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’; हिंमत असेल तर, पक्षप्रवेश थांबवा, शिरसाटांचं थेट चॅलेंज

चंद्रहार पाटलांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’; हिंमत असेल तर, पक्षप्रवेश थांबवा, शिरसाटांचं थेट चॅलेंज

Sanjay Shirsat on Chandrahar Patil Joining the Party : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सांगली लोकसभा निवडणूक लढलेले चंद्रहार पाटील हे पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी चंद्रहार पाटील (Patil) हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसंच, हा प्रवेश थांबवून दाखवा, असं आव्हान मंत्री शिरसाट यांनी दिलं आहे.

विशाल पाटलांनी धूळ चारली

सांगली लोकसभा निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेने अचानक चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांची कोंडी झाली. विशाल पाटील, विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती करण्यात आली. मात्र, खासदार संजय राऊत हे चंद्रहार पाटील यांच्यासाठी आग्रही राहिले आणि विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंड केलं. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आणि चंद्रहार पारटाला धूळ चारली.

..आम्ही खोलात गेलो, तर मुश्किल होईल; नीलम गोऱ्हेंवर राऊतांनी केलेल्या पलटवारावर शिरसाठांचा वार

सांगलीत तिरंगी लढत झालेली पाहायला मिळाली. विशाल पाटील, चंद्रहार पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय पाटील, अशी लढत झाली. यात विशाल पाटील यांचा विजय झाला. एव्हढेच नाहीतर चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिटही जप्त झालं. चंद्रहार पाटील यांना 60,860 मते मिळाली. पण, ज्या चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काँग्रेससोबत वितुष्ट घेतलं त्यांनीच पक्षाला राम राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रहार पाटील हे सोमवारी अर्थात ९ जूनला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हिंमत असेल तर थांबवून दाखवा, असं आव्हान मंत्री संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला दिलं आहे.

एकनाथ शिंदे यांची भेट

चंद्रहार पाटील यांनी 26 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे भेट घेतली होती. मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने ही भेट झाल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत पाठीमागे उभे असलेल्या चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेला सोडतील हे याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती. भेटीनंतर त्यांनी मी पक्षासोबत आहेत, काही कामानिमित्त मी त्यांना भेटलो असल्याचं देखील चंद्रहार पाटील यांनी सांगितलं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube