फक्त लाथ घातली हे चुकलं, गोळ्या घालायला पाहिजे होत्या; चंद्रहार पाटलांचा महाराष्ट्र केसरीवरून वार
Maharashtra Kesari 2025 : डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेत झालेल्या गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, शिवराज राक्षे चुकला. त्याने लाथ घातली. (Kesari 2025 ) त्याने खरतर पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पंचांच्या निर्णयाला मी देखील बळी पडलो होतो, असा आरोपही चंद्रहार पाटील याने केला आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
अहिल्यानगरमध्ये रविवारी रात्री रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्याचा बलदंड ताकदीचा युवा मल्ल पृथ्वीराज मोहोळ ६७ वा महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने सोलापूरच्या धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला. एक-एक गुणाची बरोबरी असताना कुस्तीच्या शेवटच्या चाळीसाव्या सेकंदात पृथ्वीराज मोहोळ याने टाकलेला डाव परतवून लावताना महेंद्र गायकवाड मैदानाबाहेर फेकला गेला. त्यामुळे मोहोळला दोन गुणांची आघाडी मिळाली.
महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादात, पंचांशी हुज्जत घालणं भोवलं; शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर कारवाई
यानंतर महेंद्रने आक्षेप घेतला. मात्र, पंचांनी तो धुडकावून लावल्याने महेंद्र गायकवाडने मैदान सोडले. पंचांनी तांत्रिक गुणांच्या आधारे पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केल्याने पृथ्वीराज मोहोळ २०२५ चा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. दरम्यान, पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्या कुस्तीत राक्षेने पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. त्यामुळे आखाड्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला. पंचांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला मात्र, शिवराज राक्षे याने पंचांशी हुज्जत घातली. पंचांची गचांडी पकडून लाथ मारली. त्याने आणखी गोंधळ झाला.
शिवराज राक्षे याने आलेल्या पाहुण्यांकडे दाद मागितली. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. शेवटी संयोजक व कुस्तीगीर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, असे शिवराज राक्षेला सांगितले. त्यानंतर शिवराज राक्षे याने मैदान सोडले.
‘त्या’ पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आहे. शिवराज राक्षे याच्या कृत्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, शिवराज राक्षे याच्या समर्थनार्थ मैदानात आता डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील उतरला आहे. पैलवान शिवराज राक्षे यांनी खरंतर पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होत्या. आपल्यावर देखील २००९ मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना अन्याय झाला होता, तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज राक्षेवर झाल्याचा आरोप पै. चंद्रहार पाटलांनी केला आहे.
मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती खेळताना पंचांच्या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो. ज्यातून त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, असं देखील चंद्रहार पाटील याने म्हटले आहे. पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही, पंचाचा निर्णय वादग्रस्त आहे, असेही चंद्रहार पाटील म्हणाले. चंद्रहार पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.