“सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं काम केलं नाही”; पवारांनंतर राऊतांचाही आघाडीत मिठाचा खडा!
Sanjay Raut on Sangli Lok Sabha Election : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघ गाजला (Sangli Lok Sabha) तो इथल्या कुरघोड्यांनी. मतदारसंघावर दावेदारी पक्की असतानाही विशाल पाटलांना डावलण्यात आलं. लाख प्रयत्न करुनही काँग्रेसला हा मतदारसंघ आपल्याकडे घेता आला नाही. ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांना तिकीट दिलं. मग विशाल पाटलांनीही शड्डू ठोकत अपक्ष उडी घेतली आणि निवडणूक जिंकली. त्यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीतील खटपट शांत होईल असे वाटत होते. परंतु, तशी चिन्हे दिसत नसल्याची प्रचिती ठाकरे गटाचे खासदार संंजय राऊत यांच्या वक्तव्यावरून आली. सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही असा आरोप राऊत यांनी केला.
पाटील-कदम जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात.. सांगलीतील सत्काराआधीच ‘रोडमॅप’ क्लिअर
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करून नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. स्ट्राईक रेटही चांगला राहिला. आम्ही जास्त जागा लढवायला पाहिजे होत्या. मात्र आघाडीत बिघाडी होऊ नये यासाठी आम्ही दोन पावले मागे आलो असे शरद पवार म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिले.
राऊत म्हणाले, शरद पवारांचा स्ट्राईक रेट जास्त आहे हे खरे आहे. पण सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काम केले नाही. दुसरीकडे केंद्र सरकारनेही आमच्यावरच सर्वात जास्त निशाणा साधला. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवारांना बसला. आता विधानसभा निवडणुकीत जास्त म्हणजे शरद पवार नेमक्या किती जागा घेणार, असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
यानंतर राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. शिंदे म्हणतात त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. पण, त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे त्यांच्याकडे बॅगा आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे. त्यांचा पैशांचा स्ट्राईक रेट चांगला आहे. मुंबईला भरपूर लुटलं असा आरोप राऊतांनी केला.
नाची, डान्सर, बबलीशी ही लढाई नाही; नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप कसं राहणार यावर राऊत म्हणाले, जागावाटपाबाबत अजून काही निश्चित नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र दिल्लीत काँग्रेसची एक बैठक होती. त्यामुळे जागावाटपाबाबत चर्चेची बैठक होऊ शकली नाही. आता लवकरच नव्या बैठकीची तारीख निश्चित केली जाईल असे राऊत म्हणाले.