Download App

“मंत्रिपदात रस नाही, मी राज्यात पक्षविस्तार करणार”; श्रीकांत शिदेंनी स्पष्टच सांगितलं

खासदार श्रीकांत शिंदे यांनी केंद्रातील मंत्रिपदात रस नसल्याचे स्पष्ट करत राज्यातच पक्ष विस्तार करणार असल्याचे सांगितले. 

Shrikant Shinde on Minister Post : लोकसभा निवडणुकीत राज्यात शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी तिसऱ्यांदा खासदारकी मिळवली. यानंतर राज्यातील महायुतीच्या खासदारांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. नवी दिल्लीत नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात काही खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील काही खासदार असतील असे सांगितले जात आहे. या पार्श्वभुमीवर शिंदे गटातील नेत्यांनी श्रीकांत शिंदेंना मंत्रिपद मिळावं अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले होते. या घडामोडींनंतर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून केंद्रातील मंत्रिपदात रस नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

ठाकरेंचे दोन खासदार मोदींना पाठिंबा देणार? CM शिंदेंच्या खासदाराच्या दाव्याने खळबळ!

श्रीकांत शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी केंद्रातील मंत्रिपद आणि कार्यकर्त्यांच्या मागणीबाबत विचारलं. त्यावर शिंदे म्हणाले,
कालपासून मला भरपूर फोन आले. मला मंत्रिपद द्या असं लोक म्हणत आहेत. पक्ष संघटना वाढवण्यात मला जास्त रस आहे. आमच्या पक्षात मेरिटप्रमाणे मंत्री बनेल. शिंदे साहेब सांगतील तो मंत्री बनेल. मला घराघरात पक्ष पोहोचवायचा आहे. मी येथेच खूप समाधानी आहे. तिसऱ्यांदा खासदार झालो आहे. कुणाला मंत्रिपद द्यायचं हा निर्णय शिंदे साहेबांचा असेल. मला विचारलं तर मी सरळ सांगणार की मला यात रस नाही. राज्यात राहून पक्ष वाढवायचा आहे.

केंद्रात भाजपला बहुमत नसल्यानं टीडीपी आणि जेडीयूच्या मदतीने एनडीए सरकार स्थापन करावं लागत आहे. मात्र हे सरकार फार काळ टिकणार नाही असा दावा ठाकरे गटाचे नेते करत आहेत. यावर उत्तर देताना श्रीकांत शिंदे म्हणाले, मागच्या अडीच वर्षात आमचं महायुतीचं सरकार पडणार अशी स्वप्न यांना पडत होती. पण तसं झालं नाही. त्यांना मुंगेरीलालचे हसीन सपने पडत होते. त्यांना स्वप्न पडू देत त्यात काही गैर नाही. मुळात यांना मराठी माणसांनी मुंबईकरांनी नाकारलं आहे. केवळ साडेचार टक्के मतदान यांना मिळालं. मतांमध्ये जिंकून आलेत ज्यांच्या मतांवर ते जिंकून आलेत ती तात्पुरती मतं आहेत. मात्र मराठी मुंबईकर हा आमच्या सोबत असल्याचे श्रीकांत शिंदेंनी ठणकावून सांगितले.

एकनाथ शिंदेंसाठी अच्छे दिन! मोदींच्या मंत्रिमंडळात ‘इतक्या’ खासदारांना मिळणार मंत्रिपद

follow us

वेब स्टोरीज