Uttam Jankar Big Statement on Ajit pawar : माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ठरली आहे. महायुतीने लाख प्रयत्न केल्यानंतरही उत्तम जानकरांनी महाविकास आघाडीलाच साथ देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीसांची चार्टर्ड प्लेन पॉलिसीही कामी आली नाही. यानंतर आता उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली. मी विचारतोय पण मला अजून तरी पक्षातून काढलेलं नाही. मी पक्षाचा संस्थापक सदस्य आहे. मीच अजितदादांना पक्षातून काढून टाकू शकतो, अशी जोरदार राजकीय फटकेबाजी उत्तम जानकर यांनी केली.
माढा लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर आता महाविकास आघाडीसोबत आले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांचे ते राजकीय विरोधक मानले जातात. परंतु, भाजपाने काही गोष्टी पाळल्या नाहीत म्हणून नाराज होत त्यांनी महाविकास आघाडीला साथ दिली. यानंतर आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महायुती आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.
माढ्यात नवा ट्विस्ट! शेकापमध्ये फूट, पवारांचा डावही उलटणार? युवा नेता अपक्ष लढण्याच्या तयारीत..
जानकर म्हणाले, या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील आणि आम्ही एकत्र आहोत. आगामी काळातील निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची फक्त पाच ते दहा हजार मतं आहेत. त्यापेक्षा जास्त नाहीत. राष्ट्रवादी हे पवार साहेबांनी लावलेलं रोपटं आहे. किल्लेदार म्हणून अजित पवारांना नियुक्त केलं होतं. किल्लेदार फितुर झाला तर किल्ला एकदाच जाऊ शकतो. पण पवार साहेब सावध आहेत. जनताही त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे किल्लेदाराला पवार साहेब खाली सुद्धा येऊ देणार नाहीत.
मी अजितदादांच्या राष्ट्रवादीत आहे. आजही मी तो पक्ष सोडलेला नाही. मी त्या दिवशी जयंत पाटलांना सांगितलं होतं की ज्या दिवशी मी अजितदादांचा पराभव करेन आणि त्या पराभवात माझाही हातभार असेल. त्यावेळेला पराभवानंतर मी पक्ष सोडेन. आज जर अजितदादांनी मला पक्षातून काढलं किंवा असं काही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी जसं शरद पवारांना पक्षातून काढून टाकण्याचं काम केलं तसं मी अजितदादांनाच पक्षातून काढून टाकील. अजितदादांचा पराभव होईपर्यंत मी पक्ष सोडणार नाही.
फडणवीसांच्या ‘चार्टर्ड प्लेन’ पॉलिसीवर भारी पडणार पवारांचा डाव? माळशिरसचा बडा नेता भेटीला
मागील पाच वर्षांपूर्वी भाजपनं विधानसभेची उमेदवारी त्यांना 1 लाख 16 हजारांचं मताधिक्य दिल्यानंतर मला उमेदवारी देणं हे त्यांचं कर्तव्य होतं. पण कुटनिती केली गेली. बीडहून माणूस आणून या ठिकाणी उभा केला गेला आणि इथल्या लोकांच्या उत्साहावर पाणी फेरलं. भाजपने फक्त मलाच फसवलं असं नाही तर मोहिते पाटलांनाही फसवलं. सोलापूर लोकसभेसाठी मी काही स्वतःहून गेलो नाही तर विजयकुमार देशमुख आणि प्रशांत परिचारक घेऊन गेले होते. त्यांच्या कुटनितीची तो भाग होता. मला तर त्यांना तिकीट द्यायचचं नव्हतं. फक्त मोहिते पाटलांना भीती दाखवायची होती. पण मी सुद्धा मागील सहा महिन्यांपासून सावध होतो.