Download App

अजितदादांची हाक अन् तनपुरेंची ‘देवगिरी’वर धाव; दादांनंतर मामांनाही भेटणार

Mla Prajatka Tanpure : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाल्याचं स्पष्ट झालंय. अशातच दोन्ही गटांची आपल्या गटाकडे नेत्यांना खेचण्यासाठी कंबर करण्यात आलीय. अशातच शरद पवारांसोबत असणारे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्याचं समोर आलंय. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झालीय? हे उलघडलं नसून अजित पवारांच्या भेटीनंतर आमदार तनपुरे जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार तनपुरेंनी लेट्सअपशी बोलताना दिलीय.

अजितपवार गटाचे संभाव्य खातेवाटप; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

अजित पवार यांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे हे कोणत्या गटात सहभागी होणार याबाबत तनपुरे यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, माझी जी भूमिका आहे त्यावर मी आजही ठाम आहे. दरम्यान, तनपुरे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबतच असणार असे म्हंटले होते. यामुळे अजित दादांच्या भेटीनंतरही तनपुरे हे शरद पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान अजित दादांच्या भेटीनंतर ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

अजित पवार सत्तेत येताच शिंदेंच्या अडचणी वाढल्या, मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?

अजित पवारांच्या भेटीवर तनपुरेंचे मौन :
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटाकडून आमदारांना आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरु आहे. यातच शरद पवारांच्या बाजूने असलेले आमदार प्राजक्त तनपुरे यांना अजित पवार यांनी फोनकरून देवगिरीवर बोलावले होते. तनपुरे यांनी देखील अजितदादांची भेट घेतली. मात्र या भेटीदरम्यान दोघांमध्ये काय चर्चा झाली यावर तनपुरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन बाळगणे पसंत केले.

शरद पवारांनी साधला गुरूपौर्णिमेचा मुहूर्त; यशवंतराव चव्हाणांचा आशीर्वाद घेत फुंकलं रणशिंग

‘ते’ आमदार आमच्या संपर्कात :
अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार हे पुन्हा शरद पवारांच्या गटात येणार का? यावर बोलताना तनपुरे म्हणाले, अनेक आमदार हे जयंत पाटील यांच्या संपर्कात आहे. त्यांच्याशी बोलणं सुरु आहे. मात्र, हे आमदार नेमके कोण आहेत याबाबत आपल्याला माहिती नाही. मात्र, अजित पवार यांच्या शपथविधीनंतर अनेक आमदार हे जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधत आहे.

सर्व आमदार आमच्याशी बोललेत, त्यांना…; जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत मोठी माहिती

राष्ट्रवादीत दोन गट :
राष्ट्रवादीमधील फुटीनंतर आता पक्षात दोन गट निर्माण झाले आहे. एक गट हा शरद पवार यांचा तर दुसरा अजित पवार यांचा आहे. यावर बोलताना तनपुरे म्हणाले, हे खरं आहे की राष्ट्रवादीत दोन गट पडले. हे आमच्यासाठी दुर्दैवी घटना आहे. आम्ही 54 आमदार सर्वजण सोबत काम करत होतो. विरोधक म्हणून देखील एकजुटीने आंदोलन केली. आमचं एक टीमवर्क होतं मात्र आता ते यापुढे नसणार याची मला खंत वाटतेय. ही घटना आमच्या सर्वांसाठी वेदनादायी आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीमधील फुटीमुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊन या एकजुटीला काही तडे जातील याबाबत तनपुरे म्हणाले, यावर आता काही बोलणे योग्य ठरणार नाही मात्र येत्या काळात हे चित्र देखील स्पष्ट होणार असल्याचं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या मुद्द्यावर जास्त भाष्य करणे टाळले आहे.

Tags

follow us