Rohit Pawar : कर्जत एमआयडीसीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. या एमआयडीसीसाठी रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा सुरू होता. मात्र राम शिंदे यांनी वजन वापरत हा प्रस्तावच हाणून पाडला आणि एमआयडीसीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. आता यानंतर रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. अजित पवार यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना राम शिंदे सांगतील त्याच पद्धतीने तो मुद्दा सुटेल असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच विधानावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. राम शिंदे सांगतील त्याप्रमाणे व्हावं पण, निर्णय चुकला तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
रोहित पवार म्हणाले, अजितदादांनी राम शिंदे म्हणतील तसंच करावं पण एक हजारपेक्षा कमी जागेत एमआयडीसी नको असं माझं मत आहे. एमआयडीसीची निर्मिती करताना अन्य प्रश्न देखील मार्गी लागतील याचीही काळजी घ्यावी. एमआयडीसीसाठी आम्ही जी जागा सुचवली होती ती वनविभाग आणि अन्य गोष्टींपासून दूर आहे. या ठिकाणी मोठे उद्योग उभे राहू शकतात. नुसतेच गोडाऊन उभे केले आणि कारखाने जर दुसऱ्या बाजूला असतील तर जास्त लोकांना रोजगार देता येणार नाही असे स्पष्ट करत अजित पवार यात लक्ष घालतील. पण, जर सरकारचा निर्णय चुकला तर आम्ही मात्र शांत बसणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत रोहित पवार यांनी इशारा दिला.
नेमका वाद काय?
मागील अधिवेशनापासून आमदार रोहित पवार कर्जतच्या एमआयडीसीसाठी सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलन करत आहेत. यासाठी त्यांनी उद्योगमंत्र्यांची भेट घेतली होती. पण आमदार राम शिंदे यांचा या एमआयडीसीला विरोध होता. त्यामुळे ह्या प्रकल्पाला मंजूरी मिळाली नव्हती. एमआयडीसीत निरव मोदीच्या जमीनीवरुन कर्जत-जामखेडमध्ये राजकारण तापले होते. आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द केल्याने पुन्हा एकदा राजकारण तापले आहे.
त्यानंतर राम शिंदे यांनी एमआयडीसीसाठी नव्याने प्रयत्न केले. कर्जत तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी उद्योगधंदे आले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कर्जत तालुक्यातील एमआयडीसीसाठी लागणारी जमीनीचा प्रस्ताव 15 दिवसांच्या आत तयार करून शासनाला सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले, अशी माहिती राम शिंदे यांनी दिली होती.
राम शिंदेंचा रोहित पवारांना मोठा धक्का, कर्जत एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द