Download App

काका-पुतण्यात गोडवा; राष्ट्रवादीत काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का ?

Sharad Pawar यांनी निर्माण केलेला पक्ष आज सत्तेत आहे, फक्त नेतृत्व बदलले आहे. याचा शरद पवारांना आनंदच होत असेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

  • Written By: Last Updated:


प्रशांत गोडसे, मुंबई, प्रतिनिधी

Sharad Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) 2023 मध्ये फूट पडली असली, तरी दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात जोर धरलाय. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे दोन्ही गट एकाच विचारधारेवर चालत असल्याचे दिसतंय. शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच मानवतावादाला प्राधान्य देत, जातीपातीच्या पलीकडे जाऊन ऐक्याचा संदेश दिला. हाच विचार अजित पवार यांचा गटही पुढे नेत आहे. मग विचार आणि ध्येय एकच असताना हे दोन्ही गट किती काळ वेगळे राहू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोहिते पाटलांना रिझर्व बँकेचा दणका! शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द


विचारधारा आणि ध्येय एकच

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करताना शरद पवार यांनी जनतेच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवले. सामाजिक न्याय, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे हित यांना प्राधान्य देणारी ही विचारधारा आजही दोन्ही गटांमध्ये दिसून येते. अजित पवार यांचा गट सत्तेत असला, तरी शरद पवार यांच्या गटानेही आपली सामाजिक बांधिलकी आणि जनतेच्या प्रश्नांवरील लढा कायम ठेवला आहे. राष्ट्रवादीचा झेंडा सत्तेत असो वा नसो, तो नेहमी फडकत राहिला आहे. शरद पवारांनी निर्माण केलेला पक्ष आज सत्तेत आहे, फक्त नेतृत्व बदलले आहे. याचा शरद पवारांना आनंदच होत असेल, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही; गोगावले अन् शिवसेनेच्या अनुपस्थितीवर तटकरे नाराज


सत्तेची गरज आणि कार्यकर्त्यांचे मनोबल

सत्तेशिवाय पक्ष टिकवणे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे कठीण असते, असे राजकीय वास्तव आहे. आगामी पाच वर्षे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका नाहीत. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या गटातील कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर आहे. दुसरीकडे, अजित पवार यांचा गट सत्तेत असल्याने त्यांना कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे तुलनेने सोपे आहे. यामुळे दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याच्या शक्यतांवर विचार होत असल्याची चर्चा आहे.

कौटुंबिक ऐक्य आणि राजकीय तणाव

राष्ट्रवादीच्या फुटीमुळे पक्षातच नव्हे, तर पवार कुटुंबातही दरी निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र, कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचे कुटुंब एकत्र दिसते. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा दोन दिवसांपूर्वी पार पडला. त्यावेळी शरद पवार यांनी उपस्थित राहून नातवाला आशीर्वादही दिला. अजित पवार यांनी अनेकदा जाहीरपणे शरद पवार यांना आपले “दैवत” संबोधले आहे. शरद पवार यांच्या गटाविरोधात कोणतीही आक्रमक भूमिका घेण्यास अजित पवार गट धजावत नाही. याउलट, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील वैयक्तिक टीका काही प्रसंगी दिसून येते, पण शरद पवार यांच्याविषयी दोघेही सावध भूमिका घेतात.


अंतर्गत नाराजी आणि शांतता

शरद पवार गटातील जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्या नाराजीच्या चर्चा अधूनमधून समोर येतात. मात्र, इतर मुद्द्यांवर दोन्ही गटांमध्ये शांतता आहे. एकमेकांवर लक्ष ठेवण्याऐवजी प्रत्येकजण आपापल्या मार्गाने पुढे जात आहे. दोन्ही गटांमध्ये विचारधारा आणि ध्येय एकच आहे. मग फूट किती काळ टिकेल?” असा सवाल राजकीय विश्लेषक उपस्थित करतात.

एकत्र येण्याची शक्यता?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात आक्रमकता कमी केल्याचे दिसते. शरद पवार यांच्या हयातीत पक्षाला पुन्हा एकत्र आणण्याचा विचार होऊ शकतो, असे काही जाणकारांचे मत आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट सत्तेत आहे, तर शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात प्रभावी भूमिका बजावत आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये संवादाची काही पातळी कायम आहे, आणि कौटुंबिक बंधही त्याला पूरक ठरत आहेत.

राष्ट्रवादीचा आत्मा एकच आहे. शरद पवारांनी दिलेली शिकवण दोन्ही गट पाळत आहेत. भविष्यात राजकीय समीकरणे आणि कार्यकर्त्यांचे हित लक्षात घेऊन एकत्र येण्याचा निर्णय होऊ शकतो, असे एका पक्षनेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, सध्यातरी याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विचारधारा आणि ध्येय एकच असले, तरी राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्तेची समीकरणे यामुळे फूट कायम आहे. तरीही, कौटुंबिक एेक्य आणि परस्परांबद्दलचा आदर यामुळे एकत्र येण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा झेंडा सत्तेत असो वा नसो, फडकत राहील, यात शंका नाही. भविष्यातील राजकीय घडामोडी आणि दोन्ही गटांमधील संवाद यावर पक्षाच्या एकीकरणाचे भवितव्य अवलंबून आहे.

follow us