मोदींसोबत संवाद नाही, ते नजर मिळवणंही टाळतात…सोनिया गांधींच्या पुस्तकातील 5 खुलासे…

Sonia Gandhi यांच्या पुस्तकातील काही खुलासे धक्कादायक, काही जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देणारे , तर काही आजच्या राजकारणाशी थेट जोडलेले आहेत. 

Sonia Gandhi Book

Sonia Gandhi Book

Sonia Gandhi Book Five Big Startling Revelation : 2004 साल… लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव झाला आणि देशात सत्तांतराची चाहूल लागली. काँग्रेसच्या विजयाचं श्रेय सोनिया गांधींना दिलं जात होतं. त्यामुळे देशाच्या पुढच्या पंतप्रधान म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा सुरू झाली होती. पण अचानक एक निर्णय झाला… सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्यास नकार दिला आणि देशाच्या पंतप्रधानपदी डॉ. मनमोहन सिंग यांची निवड झाली. हा निर्णय नेमका कसा झाला? सोनिया गांधींनी स्वतः पंतप्रधान होण्याऐवजी मनमोहन सिंग यांनाच ही जबाबदारी का दिली? काँग्रेसमधीलच एका दिग्गज नेत्याला पंतप्रधान होण्याची इच्छा होती का? आणि आणीबाणीपासून ते नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांबाबत  सोनिया गांधींनी त्यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या त्यांच्या पुस्तकात 5 खुलासे केले आहेत. काही खुलासे धक्कादायक आहेत, काही जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देणारे आहेत, तर काही खुलासे आजच्या राजकारणाशी थेट जोडलेले आहेत.

2004 मध्ये काँग्रेसच्या विजयानंतर देशाच्या राजकारणात एकच प्रश्न चर्चेत होता… सोनिया गांधी पंतप्रधान होणार का? कारण, काँग्रेसच्या विजयामागे सोनियांची महत्त्वाची भूमिका होती. यूपीएतील घटक पक्षांचाही त्यांना पाठिंबा होता. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी त्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण सोनिया गांधींच्या पुस्तकातील उल्लेखानुसार, त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या निर्णयाला घरातूनच विरोध होता आणि हा विरोध होता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा. या विरोधामागचं कारणही अत्यंत गंभीर होतं. Sonia Gandhi Book Five Big Startling Revelation

गांधी कुटुंबाने याआधी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या पाहिल्या होत्या. त्यामुळे सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारल्यास त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती राहुल आणि प्रियंका यांना वाटत होती. त्यामुळे सोनिया गांधींनी पंतप्रधान होऊ नये, असा आग्रह राहुल आणि प्रियंका या दोघांचा होता. अखेर सोनिया गांधींनीही पंतप्रधानपद स्वीकारायचं नाही, असा निर्णय घेतला. सोनिया गांधी यांच्या नकारानंतर आता प्रश्न होता, देशाचं नेतृत्व कोण करणार? त्याचवेळी सोनिया गांधींच्या नजरेसमोर आले डॉ. मनमोहन सिंग यांचे. मनमोहन सिंग हे केवळ अर्थतज्ज्ञ नव्हते, तर देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांची स्वच्छ प्रतिमा, प्रशासकीय अनुभव आणि अर्थव्यवस्थेवरील पकड ही त्यांची जमेची बाजू होती.

शिवाय, डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार चालवायचं असेल, तर आर्थिक धोरणांबाबत विश्वास निर्माण करणारा चेहरा आवश्यक होता. त्यामुळे मनमोहन सिंग हे या जबाबदारीसाठी योग्य ठरू शकतात, असा सोनिया गांधींचा विचार होता. सुरुवातीला मनमोहन सिंग यांनीही या जबाबदारीबाबत संकोच व्यक्त केला. मात्र, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा आणि समजूत काढल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास होकार दिला.

पुस्तकात सोनिया गांधींच्या आयुष्यातील दुसरा खुलासा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. आज सोनिया गांधी भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचं नाव आहेत. पण त्यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता. 1968 मध्ये राजीव गांधी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या भारतात आल्या. मात्र, भारतात आल्यानंतर लगेचच त्यांनी इटलीचं नागरिकत्व सोडलं नव्हतं. तर, तब्बल 15 वर्षांनंतर, म्हणजे 1983 मध्ये त्यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं. पण इतकी वर्षं त्यांनी इटालियन नागरिकत्व का कायम ठेवलं होतं? याबाबत पुस्तकातील उल्लेखानुसार, इटलीमध्ये राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी मायदेशी जाणं सोपं व्हावं, यासाठी सोनियांनी इटालियन पासपोर्ट अनेक वर्षे स्वतःकडे ठेवल्याचा उल्लेख आहे. मात्र, पुढे राजीव गांधी राजकारणात सक्रिय झाले आणि सोनिया गांधींनी भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. पण या निर्णयाची अधिकृत प्रक्रिया पूर्ण करताना त्यांना आलेला अनुभव विशेष आहे.

इटालियन नागरिकत्व सोडण्याची प्रक्रिया इटालियन राजदूतांच्या निवासस्थानी पार पडली. या प्रसंगाचं वर्णन करताना सोनिया गांधी लिहितात की, संबंधित कागदपत्रं वाचून दाखवली जात असताना आणि आपण घेतलेला निर्णय अंतिम असल्याची जाणीव होताना प्रचंड अस्वस्थ वाटत होतं. हृदय जोरात धडधडत होतं आणि घसा कोरडा पडला होता असा अनुभव सोनिया यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय.

आता येऊया पुस्तकातील तिसऱ्या अशा खुलाशाकडे, ज्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते. हा खुलासा आहे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आणि देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याबद्दल. सोनिया गांधींनी अधिकृतपणे पुष्टी केली आहे की, प्रणब मुखर्जी यांची पंतप्रधान होण्याची इच्छा होती त्यांनी आपल्या आत्मचरित्रात 2010 सालच्या एका संभाषणाचा उल्लेख केलाय.  ज्यामध्ये प्रणब मुखर्जी यांनी असं म्हणलं होतं आता सर्वोच्च स्तरावर बदल करण्याची वेळ आली आहे.  सोनिया गांधींच्या म्हणण्यानुसार पक्ष आणि सरकार यांच्यातल्या अधिकाऱ्यांच्या विभागणीसाठी काँग्रेसचा कोर ग्रुप दर आठवड्याला पंतप्रधानांशी चर्चा करायचा या गटात प्रणव मुखर्जी यांचा समावेश होता ज्यांनी 1970 च्या दशकात इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणूनही काम केलेलं. याशिवाय या गटात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंग केरळचे माजी मुख्यमंत्री ए के अँटोनी आणि अहमद पटेल
यांच्यासारख्या मोठा राजकीय अनुभव असलेल्या व्यक्तींचाही समावेश होता.
Letsupp दिवाळी अंक २०२६ महाराष्ट्रात कुठेही मागवण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

सोनिया गांधींनी लिहिलंय की कोर ग्रुपचे सदस्य म्हणून आम्ही नेहमी भेटायचो संसदेत कोणते मुद्दे उपस्थित करायचे त्यावर चर्चा
करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती पण सोनिया गांधींचा दावा आहे की प्रणब मुखर्जी यांचे तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याशी गंभीर मतभेद होते सोनिया गांधींनी आपल्या पुस्तकात लिहिलय की 2010 मध्ये प्रणबदा आपली निराशा व्यक्त करताना मला म्हणाले होते की, आता कदाचित उच्चस्तरावर बदलाची वेळ आली आहे त्यांच्या वक्तव्याने मला धक्का बसला. ‘कदाचित त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा होती असं सोनिया गांधींनी लिहिल आहे. पण,  मी लगेच हा विषय बदलला यामुळे ते कदाचित निराशही झाले असतील पण मुखर्जी यांनी कधीच याबाबत आपली नाराजी व्यक्त केली नसल्याचे सोनिया गांधींनी लिहिलं आहे. पुढे 2012 मध्ये काँग्रेसने प्रणब मुखर्जी यांना यूपीए कडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उभं केलं आणि ते निवडूनही आले.  प्रणब मुखर्जी 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती होते.
सोनिया गांधींनी पुस्तकात केलेला चौथा मोठा खुलासा आहे इंदिरा गांधी आणि आणीबाणीच्या संदर्भातला. भारतीय राजकारणातील सर्वाधिक वादग्रस्त घटनांपैकी एक म्हणजे 1975 ची आणीबाणी! या आणीबाणीसाठी संजय गांधी हे एकटेच जबाबदार नव्हते, तर इंदिरा गांधी यांच्या काही वरिष्ठ सहकाऱ्यांकडूनही त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. राजीव गांधी यांच्यासारखे मोजकेच लोक इंदिराजींच्या आजूबाजूला वेगळे विचार मांडत होते. शेवटी आपल्या पद्धतीने परिस्थिती हाताळून इंदिराजींनी निर्णय घेतला. सोनिया गांधींनी अलीकडेच एका मुलाखतीत आणीबाणीत लोकशाही अधिकार मर्यादित झाल्याबद्दल खेद व्यक्त केला होता, पण इंदिराजींना पूर्णपणे दोष देता येणार नाही, असा सूर त्यांनी आपल्या पुस्तकातून लावला आहे.
आता येऊया सर्वाधिक चर्चेत राहू शकणाऱ्या पुस्तकातील पाचव्या खुलाशाकडे. तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांच्यातील संबंधाबाबत. भारतीय राजकारणात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी हे या दोन पक्षांच्या राजकारणातील महत्त्वाचे चेहरे आहेत. मात्र, संसद किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली, तर त्यांच्यात नेमकं काय घडतं? याबाबत सोनिया गांधी यांनी पुस्तकात वैयक्तिक निरीक्षण नोंदवलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आजपर्यंत त्यांच्यात कधीही विशेष संवाद झालेला नाही. कधी सार्वजनिक ठिकाणी भेट झालीच तर, फक्त आम्ही औपचारिकपणे एकमेकांना नमस्कार करतो. मात्र, त्यापलीकडे आमच्यात फारसा संवाद होत नाही. इतकंच नाही, तर मोदी आपल्याशी नजर मिळवणंही टाळतात, असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल जे काही बोलतात ते त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून मिळालेल्या संस्कारांच फळ आहे. पण माझी जडणघडण महात्मा गांधींनी मांडलेल्या अहिंसेच्या आणि धर्माच्या संकल्पनेच्या आधारे झाली आहे. यामुळेच आमच्या दोघांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असल्याचा उल्लेख सोनिया गांधींनी पुस्तकात केलाय.

 

Exit mobile version