मोदींसोबत संवाद नाही, ते नजर मिळवणंही टाळतात…सोनिया गांधींच्या पुस्तकातील 5 खुलासे…
Sonia Gandhi यांच्या पुस्तकातील काही खुलासे धक्कादायक, काही जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देणारे , तर काही आजच्या राजकारणाशी थेट जोडलेले आहेत.
Sonia Gandhi Book Five Big Startling Revelation : 2004 साल… लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव झाला आणि देशात सत्तांतराची चाहूल लागली. काँग्रेसच्या विजयाचं श्रेय सोनिया गांधींना दिलं जात होतं. त्यामुळे देशाच्या पुढच्या पंतप्रधान म्हणून त्यांच्याच नावाची चर्चा सुरू झाली होती. पण अचानक एक निर्णय झाला… सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्यास नकार दिला आणि देशाच्या पंतप्रधानपदी डॉ. मनमोहन सिंग यांची निवड झाली. हा निर्णय नेमका कसा झाला? सोनिया गांधींनी स्वतः पंतप्रधान होण्याऐवजी मनमोहन सिंग यांनाच ही जबाबदारी का दिली? काँग्रेसमधीलच एका दिग्गज नेत्याला पंतप्रधान होण्याची इच्छा होती का? आणि आणीबाणीपासून ते नरेंद्र मोदींसोबतच्या संबंधांबाबत सोनिया गांधींनी त्यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या त्यांच्या पुस्तकात 5 खुलासे केले आहेत. काही खुलासे धक्कादायक आहेत, काही जुन्या राजकीय आठवणींना उजाळा देणारे आहेत, तर काही खुलासे आजच्या राजकारणाशी थेट जोडलेले आहेत.
गांधी कुटुंबाने याआधी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या पाहिल्या होत्या. त्यामुळे सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारल्यास त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती राहुल आणि प्रियंका यांना वाटत होती. त्यामुळे सोनिया गांधींनी पंतप्रधान होऊ नये, असा आग्रह राहुल आणि प्रियंका या दोघांचा होता. अखेर सोनिया गांधींनीही पंतप्रधानपद स्वीकारायचं नाही, असा निर्णय घेतला. सोनिया गांधी यांच्या नकारानंतर आता प्रश्न होता, देशाचं नेतृत्व कोण करणार? त्याचवेळी सोनिया गांधींच्या नजरेसमोर आले डॉ. मनमोहन सिंग यांचे. मनमोहन सिंग हे केवळ अर्थतज्ज्ञ नव्हते, तर देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. त्यांची स्वच्छ प्रतिमा, प्रशासकीय अनुभव आणि अर्थव्यवस्थेवरील पकड ही त्यांची जमेची बाजू होती.
शिवाय, डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार चालवायचं असेल, तर आर्थिक धोरणांबाबत विश्वास निर्माण करणारा चेहरा आवश्यक होता. त्यामुळे मनमोहन सिंग हे या जबाबदारीसाठी योग्य ठरू शकतात, असा सोनिया गांधींचा विचार होता. सुरुवातीला मनमोहन सिंग यांनीही या जबाबदारीबाबत संकोच व्यक्त केला. मात्र, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा आणि समजूत काढल्यानंतर त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास होकार दिला.
इटालियन नागरिकत्व सोडण्याची प्रक्रिया इटालियन राजदूतांच्या निवासस्थानी पार पडली. या प्रसंगाचं वर्णन करताना सोनिया गांधी लिहितात की, संबंधित कागदपत्रं वाचून दाखवली जात असताना आणि आपण घेतलेला निर्णय अंतिम असल्याची जाणीव होताना प्रचंड अस्वस्थ वाटत होतं. हृदय जोरात धडधडत होतं आणि घसा कोरडा पडला होता असा अनुभव सोनिया यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय.
सोनिया गांधींनी लिहिलंय की कोर ग्रुपचे सदस्य म्हणून आम्ही नेहमी भेटायचो संसदेत कोणते मुद्दे उपस्थित करायचे त्यावर चर्चा करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती पण सोनिया गांधींचा दावा आहे की प्रणब मुखर्जी यांचे तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याशी गंभीर मतभेद होते सोनिया गांधींनी आपल्या पुस्तकात लिहिलय की 2010 मध्ये प्रणबदा आपली निराशा व्यक्त करताना मला म्हणाले होते की, आता कदाचित उच्चस्तरावर बदलाची वेळ आली आहे त्यांच्या वक्तव्याने मला धक्का बसला. ‘कदाचित त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा होती असं सोनिया गांधींनी लिहिल आहे. पण, मी लगेच हा विषय बदलला यामुळे ते कदाचित निराशही झाले असतील पण मुखर्जी यांनी कधीच याबाबत आपली नाराजी व्यक्त केली नसल्याचे सोनिया गांधींनी लिहिलं आहे. पुढे 2012 मध्ये काँग्रेसने प्रणब मुखर्जी यांना यूपीए कडून राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उभं केलं आणि ते निवडूनही आले. प्रणब मुखर्जी 2012 ते 2017 दरम्यान देशाचे राष्ट्रपती होते.
पंतप्रधान मोदी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल जे काही बोलतात ते त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून मिळालेल्या संस्कारांच फळ आहे. पण माझी जडणघडण महात्मा गांधींनी मांडलेल्या अहिंसेच्या आणि धर्माच्या संकल्पनेच्या आधारे झाली आहे. यामुळेच आमच्या दोघांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा असल्याचा उल्लेख सोनिया गांधींनी पुस्तकात केलाय.