“सगळा रोष पत्करून लोकसभेला पंकजा मुंडे यांचं इमानदारीनं काम केलं. मग त्या माझ्या विरोधात कसं काय काम करू शकतात? त्यांनी असं का केलं? मला पाडण्यासाठी पंकजा मुंडे यांनी अनेक कार्यकर्त्यांना फोन करून विरोधी उमेदवाराला मदत करण्यासं का सांगितलं?”
23 तारखेला एका बाजूला विधानसभेचे निकाल जाहीर होत होते आणि दुसऱ्या बाजूला बीडमध्ये सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आग लावली होती. ही आग होती ओबीसी विरुद्ध मराठा वादाची, ही आग होती मुंडे विरुद्ध इतर या वादाची. सुरेश धस यांनी अक्षरशः आग ओकत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर आरोप केले. त्यांच्या या आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा बीडकडे केंद्रित झालं. आता धस यांचे आरोप कितपत खरे कितपत खोटे हे त्यांनाच माहिती. पण या वादाने बीड जिल्ह्याचं राजकारण पुन्हा नव्या वळवणावर आलं हे निश्चित आहे. या वळणावर मुंडे विरोधी गट पुन्हा जिवंत झाला आहे. याच गटाच्या नेतृत्वासाठी सुरेश धस यांचा आटापीटा चालला असल्याची चर्चा आहे… (Suresh Dhas is trying to stand as a leader against Pankaja Munde and Dhananjay Munde)
दोन वर्षापूर्वीपर्यंत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हेच एकमेकांचे राजकीय विरोधक. हे दोघेही भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांचे जिल्ह्यातील नेतृत्व करत होते. पण मागच्या वर्षी नवी महायुती जन्माला आली अन् मुंडे बंधूंमध्येही व्यक्तिगत समेट झाला. तेव्हापासून दोघेही सत्तेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात विरोधी नेतृत्वाची एक पोकळीच निर्माण झाली. विरोधी पक्षात आणि जिल्ह्यात मुंडे विरोधी सक्षम नेतृत्वही नव्हते. मात्र, विधानसभा निकालात सुरेश धस यांनी आष्टीतून विजय मिळविला आणि विजयी सभेत परळीकडे तोफांचा मारा केला. यातून मुंडे विरोधी नेतृत्वाची पोकळी भरून काढून या नेतृत्वाचे केंद्र आष्टीकडे ओढण्याची त्यांची ही खेळी मानली जाते.
धस यांच्या या विरोधाची सुरुवात झाली ती लोकसभा निवडणुकीनंतर. लोकसभा निवडणुकीत मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं अन् बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. भाजपच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. मात्र त्यातही पंकजा मुंडे यांना लोकसभेला आष्टी मतदारसंघातून तब्बल 32 हजारांचं लीड मिळालं. त्यामध्ये सुरेश धस यांचाही सिंहाचा वाटा असल्याचं बोललं गेलं. पण पंकजा मुंडे या आघाडीवर खूश नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली. आणखी थोड लीड मिळालं असतं तर आपण विजयी झालो असतो असं त्यांचं मत आलं.
यंदा विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून लढण्यासाठी महायुतीतून तिघेजण इच्छुक होते. यात भाजपकडून सुरेश धस आणि भिमराव धोंडे तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे यांचा समावेश होता. निवडणूक जाहीर झाली तेव्हा या तिघांपैकी कुणाला एकाला तिकीट मिळेल आणि दोघांना माघार घ्यावी लागेल अशी परिस्थिती होती. मात्र, कुणीच माघार घेणार नाही असं एकंदरीत वातावरण होतं. त्याच वातावरणाचा अंदाज घेत सुरेश धस यांनी पक्षाने कुणालाच तिकीट देऊ नये. सरळ खेळ होऊ द्या अशी घोषणा केली. त्यानुसार आष्टीमध्ये मैत्रीपूर्ण लढत खेळवली गेली. यात भाजपकडून धस यांना आणि राष्ट्रवादीकडून आजबे यांना तिकीट देण्यात आले. तर भिमराव धोंडे अपक्ष मैदानात ठाकले.
थोडक्यात महायुतीमध्येच तिरंगी लढत झाली. या लढतीत सुरेश धस यांनी तब्बल 78 हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला. मात्र हा विजय मिळवताच त्यांनी मुंडे भगिनींवर गंभीर आरोप केले. मला पाडण्यासाठी प्रयत्न केले, विरोधी उमेदवाराला बळ दिले, कार्यकर्त्यांना फोन करुन विरोधी उमेदवाराचे काम करण्यास सांगितले, असा आरोप सुरेश धस यांनी केला. धस यांचा सरळ सरळ रोख ओबीसी असलेल्या भिमराव धोंडे यांच्यावर होता. पंकजा मुंडे त्यांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या, असा धस यांचा दावा होता.
लोकसभेत एकवटलेला संपूर्ण ओबीसी समाज आणि सुरेश धस यांच्यावर नाराज असलेला मराठा समाज असे मतदान धोंडे यांच्या बाजूने वळविण्यासाठी मुंडे यांनी फिल्डिंग लावली, असा धस यांच्या आरोपांचा अर्थ होता. पण निकालाअंती धस जवळपास 78 हजार मतांनी आमदार झाले. यानंतर धस यांनी विजयी सभेत पंकजा मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यांचे आरोप म्हणजे फडणवीसांच्या गुड बुकमध्ये एंट्री आणि दुसरीकडे मुंडे विरोधी निर्माण झालेल्या नेतृत्व पोकळी भरून काढण्यासाठीचे पाऊल मानले जाते. धसांच्या भाषणाचे तीव्र पडसाद उमटत असले तरी त्यांना याची जाणीवही नक्कीच असणार. मात्र, या भूमिकेशिवाय जिल्हाभरातील समाजावर घट्ट पकड आणि मुंडेंना विरोध करू शकतो हे दाखविण्याची धमक त्यांना दाखवून द्यायची होती.
मुंडे बंधू एक झाले असले तरी त्यांना आपण विरोधही करू शकतो, हे दाखवून देण्यात धस यशस्वी ठरले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या वक्तव्याबाबत भ्रमणध्वनीवरून विचारणा करणाऱ्यांना उत्तर देतानाही धसांचा जोर कायमच आहे. मात्र यामुळे 2017 पासून एकत्र असलेल्या धस आणि मुंडे यांच्यात दुरावा आला हे नक्की आहे.