Download App

दिलीप मोहितेंच्या साम्राज्याला हादरा; खेड-आळंदीमधील धक्कादायक समीकरणं

लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. समरजीत घाटगे (Samarjeet Ghatage), हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) असे बडे नेते पवारांकडे आले. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe), राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) असे नेते परत येण्याच्या वाटेवर आहेत. थोडक्यात विधान सभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक नेते चलबिचल झाले आहेत. याला अपवाद आहे तो खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा. अजित पवार यांच्यासोबत पहिल्या दिवसांपासून असलेले आणि आताही अजितदादांसोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतलेले दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite) यांची ही पाचवी निवडणूक असणार आहे. यात तीनवेळा त्यांचा विजय झाला, तर दोनवेळा पराभव झाला.

लोकसभा निवडणुकीत खेड-आळंदी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना मोठे मताधिक्य आहे. त्यामुळे दिलीप मोहिते यांना यंदाची विधानसभा निवडणूक अवघड असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी भाजपचा मोठा नेता फोडत मोहिते पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मोहितेंना विजयाचा फुल कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे दरवर्षी काहीशी एकतर्फी होणारी निवडणूक यंदा चुरशीची होणार हे निश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर पाहुया, शरद पवार यांनी कोणाच्या रुपाने मोहितेंसमोर आव्हान उभे केले आहे? हे मोहिते यांच्यासाठी खरंच आव्हान आहे का? आणि मोहिते यांना विजयाचा का आत्मविश्वास आहे?(Will Atul Deshmukh of NCP Sharad Chandra Pawar be the candidate against NCP’s Dilip Mohite Patil in Khel Alandi Assembly Constituency?)

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहुया, लेट्सअप मराठीच्या ग्राऊंड झिरो या निवडणूक स्पेशल सिरीजमध्ये…

खेड आळंदी मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेसच्या विचारांना मानणारा राहिला आहे. 1985 मध्ये हा मतदारसंघ नारायण पवार यांच्या ताब्यात गेला. नारायण पवार म्हणजे शरद पवार यांचे निकटवर्तीय. शरद पवार यांच्यासोबत नारायण पवार समाजवादी काँग्रेसमध्ये, नंतर काँग्रेसमध्ये आणि त्यानंतर राष्ट्रवादीमध्येही गेले. त्यानंतरही ते निवडून येत राहिले. 1985, 1990, 1995 आणि 1999 असे चारही निवडणुकीत नारायण पवार निवडून येत राहिले. नव्या शतकाच्या उंबरठ्यावर संघर्षमय वातावरणात शिवसेनेच्या दिलीप मोहिते यांनी तालुक्याच्या राजकारणात ‘एन्ट्री’ केली. 1999 ची विधानसभा निवडणूक ते लढले. पण त्यांचा पराभव झाला.त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. वीस वर्षे आमदार असलेल्या नारायण पवार यांचा तब्बल 14 हजारांहून अधिक मतांनी पराभव करुन आमदार झाले. तेव्हापासून 2014 मधील पराभव वगळता दिलीप मोहिते यांचेच एकहाती वर्चस्व राहिले आहे. 2004, 2009 आणि 2019 या तिन्ही निवडणुकीमध्ये मोहिते यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत खेड-आळंदी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार देवदत्त निकम यांना मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा होती. पण शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मताधिक्य घेतले आणि विजयही खेचून आणला होता. पाटील यांच्या विजयाने आत्मविश्वास दुणावलेल्या शिवसेनेने लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दुसरा दणका दिला. शिवसेनेच्या सुरेश गोरे यांनी राष्ट्रवादीच्या मोहितेंचा दारुण पराभव केला. सुरेश गोरे यांनी तब्बल एक लाख 3 हजार 207 मते घेतली. पण 2019 मध्ये पुन्हा एकदा दिलीप मोहिते यांनी आपलेच वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांचा गट तटस्थ राहिला. त्याचवेळी अपक्ष अतुल देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेली बंडाळी गोरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती.

Ground Zero : आंबेगावात शरद पवारांची जादू चालणार? वळसेंसाठी धोक्याची घंटा

यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आमदार दिलीप मोहिते पहिल्या दिवसापासून अजित पवार यांच्यासोबत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबतच्या अनेक आमदारांची चलबिचल सुरू आहे. पण मोहिते पाटील मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. तालुक्यातील बहुतेक सर्व नेते, कार्यकर्ते देखील त्यांच्याच सोबत आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार, हे नक्की आहे. मोहिते पाटील यांच्यासह राष्ट्रवादीकडूनच माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा राक्षे देखील इच्छुक आहेत. याशिवाय गतवेळी बंडखोरी केलेले आणि भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे, शिवसेनेकडून गटाकडून अक्षय जाधव, नितीन गोरे, भगवान पोखरकर हेही इच्छुक आहेत.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा या मतदारसंघावर भक्कम दावा आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांना खेड-आळंदी मतदारसंघातून 46 हजारांचे तगडे मताधिक्य मिळाले आहे. दिलीप मोहिते सोबत नसूनही महाविकास आघाडीला मिळालेले बहुमत विधानसभा निवडणुकीसाठीही आशेचा किरण आहे. यंदा भाजपमधून आलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि 2019 मध्ये आमदारकी लढविलेले अतुल देशमुख प्रमुख दावेदार मानले जातात. अतुल देशमुख यांचा आळंदी शहरात चांगला प्रभाव आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली 2016 मध्ये आळंदी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आली. गतवेळी मतमोजणीत 19 व्या फेरीपर्यंत देशमुख यांनी पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर राहत गोरे आणि मोहितेंना घाम फोडला होता. यामुळे अतुल देशमुख उमेदवार राहिल्यास मोहिते पाटील यांच्यासाठी आव्हान ठरु शकते.

Ground Zero : अशोक पवार पुण्याचे पालकमंत्री होणार की माजी आमदार?

शिरुरचे आमदार अमोल कोल्हे हेही अतुल देशमुख यांच्याच उमेदवारीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मात्र देशमुख यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतील अन्य नेत्यांचा विरोध आहे. 2019 मध्ये देशमुख यांना पडलेली 54 हजार मते ही केवळ त्यांचीच नव्हती. तर त्यात भाजपचीही 35 ते 40 हजार मते होती. आता ही मते देशमुख यांच्यासोबत नाहीत. भाजप-शिवसेनेची छुपी मदतही देशमुख यांना मिळण्याची शक्यता कमीच आहे. आज खेड-आळंदीमधून निवडून येण्यासाठी किमान सव्वा लाख मते आवश्यक आहेत. मग केवळ 15 ते 20 हजार मतांचा गठ्ठा असलेल्या नेत्याला उमेदवारी देण्यास पक्षातूनच विरोध असल्याचे समजते. जर सर्व संमतीचा उमेदवार दिल्यास दिलीप मोहितेंच्या विरोधातील मतेही आपल्याकडे खेचता येतील असा उमेदवार द्यावा, असा सूर पक्षातून आहे. यातूनच शरदचंद्र पवार पक्षाकडून निष्ठावंत अशी ओळख असलेल्या सुधीर मुंगसे यांचे नाव पुढे येत आहे. दरम्यान, ऐनवेळी दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे यांचेही नाव पुढे येऊ शकते. सुप्रिया सुळे यांनी त्यांना याबाबत विचारणा केली असल्याचीही माहिती आहे.

खेड-आळंदी मतदारसंघात सध्या सर्वाधिक फरपट सुरु आहे ती दोन्ही शिवसेनेची. या मतदारसंघात सुरुवातीपासून निष्ठावान शिवसैनिकांचा एक मोठा गट सक्रिय आहे. तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणारा हा गट आहे. यामुळेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे गेल्या पाच वर्षांपासून आमदारकीची तयारी करत आहेत. त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे काळेंना तिकीट मिळाल्यास चांगली लढत होऊ शकते, असा अंदाज स्थानिक पत्रकार व्यक्त करत आहेत. पण काळे यांना भगवान पोखरकर यांचा विरोध आहे. त्यामुळे मतदारसंघ ठाकरेंना सुटल्यास आणि काळे यांना उमेदवारी दिल्यास पोखरकर बंडखोरी करुन अक्षय जाधव यांना पुढे करु शकतात. त्यामुळे शिवसेनेच्या मतांची विभागणी होऊन दिलीप मोहिते यांचा फायदा होऊ शकतो. याशिवाय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी सभापती अमोल पवारही छातीला माती लावून मैदानात उतरले आहेत. पण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खेड-आळंदी मतदारसंघ सुटण्याची शक्यता फारच कमी आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची देवाची आळंदी, निमगाव-दावडीचा खंडोबा, कन्हेरसरची देवी अशी तीर्थक्षेत्र या भागात आहेत. भुईकोट, भोरगिरी आणि देव-तोरणे किल्ला असा ऐतिहासिक वारसाही याच खेढ-आळंदी मतदारसंघात आहेत. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या हा मतदारसंघ महत्वाचा आहे. देशात प्रसिद्ध असलेली उद्योगनगरी चाकणही याच मतदारसंघात आहे. चाकणच्या औद्योगिक वसाहतीत देशी-विदेशी छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या संख्येने राज्य-परराज्यातून मोठ्या संख्येने नोकरदार स्थायिक झाला आहे. यातील बहुतांश इथले मतदारही झाले आहेत. त्यामुळे तरंगता मतदार कोणाकडे झुकतो हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. निमशहरी भाग असल्याने या भागात शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील ऐतिहासिक वाहतूक कोंडीही याच मतदारसंघाला लाभली आहे. एकूणच वारकरी, उद्योग, शेती अशा सर्वसमावेश प्रश्नांची जाण असणाऱ्या उमेदवाराला मतदारांचे प्राधान्य असणार आहे. यात आता कोण बाजी मारणार? आणि कोणाच्या पदरी निराशा पडणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us