Download App

पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल

या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्यात कोणत्या आघाडीा किती जागा मिळू शकतात याचा अंदाज जाणून घेऊ या..

Maharashtra Elections Exit Polls 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झालं. राज्यभरात जवळपास 64 टक्के मतदान झालं. आता सर्वांनाच मतमोजणीचे वेध लागले आहेत. मात्र त्याआधीच एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात कोण बाजी मारणार, महायुती की महाविकास आघाडी कोण गुलाल उधळणार याचा अंदाज बांधण्यात आला आहे. पुण्यात नेमकं काय होणार याचाही ढोबळ अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुण्यातील २१ मतदारसंघातील लढतींचे एक्झिट पोल्सने काय अंदाज वर्तवले आहेत याची माहिती घेऊ या..

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. विविध संस्थांच्या या एक्झिट पोलमध्ये राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही संस्थांनी राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या एक्झिट पोलनुसार पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीचं पारडं महायुतीपेक्षा किंचित जड राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Exit Polls 2024 : ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? एक्झिट पोलचा अंदाज काय..

पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहेत. सध्याच्या परस्थितीत जिल्ह्यात अजित पवार गटाचे सर्वाधिक 10 आमदार आहेत. तर भाजप 8 आणि काँग्रेसचे तीन आमदार आहेत. आता जे एक्झिट पोल आले आहेत त्यानुसार पुणे शहरातील 8 पैकी 4 मतदारसंघात महायुतीला यश मिळेल अशी शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यातील एकूण 21 जागांपैकी 11 जागा महाविकास आघाडीला तर 10 जागा महायुतीला मिळण्याचा अंदाज बहुतेक एक्झिट पोल्सने व्यक्त केला आहे.

बारामती मतदारसंघातील लढत राज्यभरात चर्चेत आहे. या मतदारसंघात अजित पवार स्वतः रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाने अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी तिकीट दिलं. आता मतदान झालं आहे. तेव्हा बारामतीकरांचा मूड काय असेल याचा अंदाज समोर आला आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या मतदारसंघात अजित पवार गुलाल उधळणार असल्याचा अंदाज बहुतेक एक्झिट पोल्समध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता. या पराभवाची खंत त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती. आता विधानसभा निवडणुकीत मात्र बारामतीची जागा महायुती जिंकणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बारामतीप्रमाणेच पुणे जिल्ह्यात अन्य नऊ मतदारसंघात महायुती बाजी मारणार असल्याचे चित्र एक्झिट पोल्समधून समोर येत आहे.

कोणत्या मतदारसंघात कोण जिंकू शकतो

महायुती

शिरुर, बारामती, मावळ, चिंचवड, पिंपरी, भोसरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार जिंकतील अशी शक्यता आहे.

महाविकास आघाडी

जुन्नर, आंबेगाव, खेड आळंदी, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोर, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कँटोन्मेंट आणि कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील अशी शक्यता आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा ?

पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार ठाकरे गटाला 16 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे.

इलेक्टोरल एजनुसार ठाकरे गटाला 44 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

चाणक्य स्ट्रॅटेजी संस्थेच्या एक्झिट पोलनुसार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 35 उमेदवार निवडून येण्याची शक्यता दिसत आहे.

लोकशाही रुद्र एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला किमान 20 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काही एक्झिट पोल्सने शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाला जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात मविआचं पारडं जड! महायुतीला केवळ 17 ते 18 जागा, एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी

follow us