मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला धक्का, मविआला गुडन्यूज; अंदाज काय?

Maharashtra Exit Poll : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर चांगलाच चर्चेत होता. निवडणुकीत याचा परिणामही दिसला. मराठवाड्यात भाजप आणि महायुतीचा सुपडाच साफ झाला होता. त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. बुधवारी राज्यभरात मतदान झालं त्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या पोल्समध्येही जरांगे फॅक्टरची हवा कायम असल्याचं अधोरेखित करण्यात आलंय. मराठवाड्यात लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडी मुसंडी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मराठवाड्यातील लढाई महायुतीसाठी आव्हानात्मकच राहणार आहेत.
पुण्यात कोण बाजी मारणार? महायुती की महाविकास आघाडी? वाचा, एक्झिट पोलचा कल
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर भाजप महायुतीला पराभव पत्करावा लागला होता. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिंदे गटाचे सांदिपान भुमरे एकटेच विजयी झाले होते. बाकीच्या सात मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले होते. केंद्रीय मंत्री अन् दिग्गज नेत्यांनाही जरांगे फॅक्टरचा चांगलाच दणका बसला होता. उमेदवारांनीच तशी कबुली दिली होती. आता विधानसभेलाही मराठवाड्यात भाजप महायुतीला फटका बसेल अशी स्थिती पोलमध्ये वर्तवली आहे. त्यामुळे महायुतीचं टेन्शन नक्कीच वाढणार आहे.
मराठवाड्यात महायुतीला 17 ते 18 जागा…
SAS ग्रुप हैदराबादच्या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीला 125 ते 135 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी 147 ते 155 जागा जिंकू शकते. मराठवाड्यातील 46 जागांपैकी भाजप-महायुतीला 17 ते 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. येथे महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचं दिसून येतं, मविआला मराठवाड्यात 27 ते 28 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात भाजप-महायुतीला फटका बसेल, असा अंदाज या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भात मविआला फटका, महायुती मारणार मुसंडी, एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?
मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार, असा अंदाज Zeenia AI Exit Poll ने व्यक्त केलाय. मराठवाड्यात मविआला 24 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. दरम्यान, याआधी आयएनएस आणि मॅट्रीजच्या प्री पोल सर्वेक्षणात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये मराठवाड्यात भाजप महायुतीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
चाणक्यचा पोल सांगतोय महायुतीचं सरकार
चाणक्य स्ट्रॅटेजीनेही महाराष्ट्र निवडणुकीचे अंदाज दिले आहेत. यानुसार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असा अंदाज चाणक्यने व्यक्त केला आहे. सहा ते आठ जागा अपक्षांना आणि अन्य पक्षांना मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.