Bajrang Sonawane Emotional Post for Sharad Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार काल थंडावला. या दिवशी शरद पवार यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचारसभा घेतल्या. दुपारचं कडाक्याचं उन, शरीराला आलेला थकवा आणि बसलेला आवाज या कशाचाही विचार न करता कालचा दिवस शरद पवारांनी गाजवला. परंतु, नंतर मात्र शरद पवार यांच्या प्रकृतीमुळे आजचे नियोजित दौरे रद्द करण्यात आल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले. यानंतर बीडमधील आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली आहे. साहेब, आता आम्ही खिंड लढवतो तुम्ही फक्त तब्बेतीला जपा असे गहिवरून टाकणारे उद्गार सोनववणे यांनी काढले आहेत.
“होय, मी बारामतीची लेक, तुमच्यापेक्षा येथे जास्त राहते”; सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ठणकावलं!
सोनवणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की साहेब, तब्बेतीला जपा! प्रकृतीच्या कारणामुळे उद्या आपण आष्टीतील सभेला येणार नसल्याचं समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबवू शकला नाहीत आणि पाऊसही तुम्हाला थांबवू शकला नाही. मागील पाच -सहा दशके अशा कित्येक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील. तुमच्या नावावर या निवडणुका झाल्या. पण, साहेब आता आमचं ऐका. आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्बेतीला जपा.
विपरीत परिस्थितीत कसं लढायचं हे तुम्ही देशाला दाखवून दिलंत. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो. आता पुढील जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या. साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त तब्बेतीला जपा असे बजरंग सोनवणे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘बारामतीला कोणीही धक्का लावू शकत नाही’, शरद पवारांनी भरसभेत ललकारले
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवारांनी राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या. काल बारामतीच्या सभेत सांगितले की राज्यात मी ठिकठिकाणी ४० सभा घेतल्या. या सततच्या दगदगीचा परिणाम तब्बेतीवर होत असतो. या सगळ्याचा परिणाम गळ्यावरही झाला. त्यामुळे आज मी या स्थितीत आलो आहे असे शरद पवार म्हणाले होते.