Download App

Ajit Pawar : “दोघंही चांगलं बोलत अन् हसत होते, घडलेली घटना अतिशय”.. अजितदादांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar on Abhishek Ghosalkar Case : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या (Abhishek Ghosalkar) झाडून हत्या करण्यात आली. आरोपी मॉरिसने त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या नंतर स्वतःही आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. विरोधकांनी राज्य सरकारवर प्रचंड टीकेची झोड उठविली आहे. या प्रकरणानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. राज्यात अशा घटना घडू नयेत, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार आज पुण्यात होते. प्रसारमाध्यमांनी त्यांना अभिषेक घोसाळकर प्रकरणी प्रतिक्रिया विचारली. त्यावर अजित पवार म्हणाले, दोघांचे संभाषण स्पष्ट झाले. त्यांचे मित्रत्वाचे संबंध चांगले दिसले. या प्रकरणाचा नीट तपास झाला पाहिजे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. आरोपी गोळीबार करणार असं चेहऱ्यावरून वाटत नव्हतं. म्हणजे आरोपीच्या चेहऱ्यावर एक आणि मनात वेगळंच होतं. आता या घटनेचा नीट तपास व्हायला हवा खरं कारण समोर आलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : ‘मला फुकटचे सल्ले देऊ नका’ CM शिंदेंच्या अभिनंदनाच्या ‘गुगली’वर अजितदादा चिडलेच

या घटनेवरून विरोधक सरकारची बदनामी करत आहेत. गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. विरोधकांना आता निमित्तच मिळालं आहे. मी परत एकदा सांगतो घडलेली घटना चुकीचीच आहे. परंतु, या घटनेमागची पार्श्वभुमी सुद्धा लक्षात घ्यायला हवी. दोघेही एकमेकांशी इतकं चांगलं बोलत असताना, हसत असताना नेमकं काय घडलं हे पाहायला हवं.

घडलेली घटना चुकीचीच आहे. पोलीस यंत्रणा बाहेर असली तरी दोघे आत बसले आहेत आणि काहीतरी बोलत आहेत. त्यातील एकजण तर हाफचड्डीवरच दिसतोय. दोघांचे संभाषण होताना दिसत आहे. त्यानंतर त्याने हे कृत्य केले असे अजित पवार म्हणाले. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी दोघे ताब्यात; मुंबई पोलिसांची कारवाई

नेमकं काय घडलं?

अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत होते. दोघांमध्ये एक वर्षांपूर्वी वादही झाला होता. दोघांमध्ये वैयक्तिक स्वरुपाचे वादही होते. दोघांमधील वाद मिटल्यानंतर आज दोघेही मॉरिसच्या ऑफिसमध्ये एकत्र आले होते. मॉरिसने स्वतःच्या कार्यालयात त्याने अभिषेक घोसाळकर यांना बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांबद्दल कौतुकाचं शब्द वापरल्याचं दिसून येतं आहे.

follow us