Pune Car Accident : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात रविवारी पहाटे (Pune Car Accident) एका आलिशान कारच्या धडकेत दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली. कारण, कार चालवणारा अल्पवयीन होता. तो पार्टी करून घरी परतत असताना बेदरकारपणे कार चालवत होता. कारच्या धडकेत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा दोघे जण मृत्यूमुखी पडले. या घटनेनंतर पोलिसांनी मुलाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून आज पहाटे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलाने चालवलेली कार फक्त विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच रस्त्यावर धावत होती.
Pune Accident : होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो; बिल्डर पुत्राची पोलिसांना कबुली
अपघातातील ही कार बंगळुरू येथून तात्पुरती नोंदणी करून पुण्यात आणली होती. मार्चमध्ये नोंदणीची प्रक्रिया शहरातील आरटीओ कार्यालयात सुरू होती. त्यामुळे इतके दिवस ही कार नोंदणी झालेली नसतानाच रस्त्यावर धावत होती अशी माहिती मिळाली आहे. या निष्काळजीपणामुळे आता प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मागील दोन महिन्यांपासून ही कार रस्त्यांवर धावत आहे तरी पोलिसांच्या कसं लक्षात आलं नाही असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबईतील एका शोरुममधून ही कार बिल्डरने घेतली होती. त्यानंतर नोंदणी करण्यासाठी २० मार्च २०२४ रोजी आरटीओ कार्यालयात अर्ज दिला होता. आरटीओ अधिकाऱ्यांनी कारची पाहणी केली होती. त्यानंतर ४० लाख रुपये कर भरण्यास सांगितले होते. मात्र हा करही कार मालकाने भरला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कारची नोंदणीच पूर्ण झालेली नाही अशी माहिती मिळाली.
नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाची आधी आरटीओ कार्यालयात नोंद केली जाते. यानंतर वाहन संबंधित व्यक्तीच्या नावावर केले जाते. यासाठी वाहनाला एक नंबर दिला जातो. ज्या शोरुममधून वाहन खरेदी केले जाते त्याच शोरुम चालकाची नोंदणी करून देण्याची जबाबदारी असते. जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहन संबंधितांकडे दिले जात नाही.
आरोपीला विशेष वागणूक देणाऱ्या पोलिसांसह आरोपीवर कठोर कारवाई करा; पुणे अपघातप्रकरणी फडणवीसांचे आदेश