शिक्षण हे परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे. (Pune) गरीब लोकच राष्ट्राचे नेतृत्व करू शकतात. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी वृत्तपत्र वाटून, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विकून देशाचे नेतृत्व केले. गरीब लोक संघर्षातून पुढे गेलेले असतात, असे मत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन डॉ. सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, नऱ्हे येथे करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नॅकचे माजी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते. तसेच इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. शार्दूल जाधवर लिखित ‘यशाचे शिल्पकार’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.
Video : पुणेकरांना मेट्रो, बस प्रवास मोफत मिळणार; NCP च्या जाहीरनाम्यात दादांची गेमचेंजर आश्वासनं
कार्यक्रमात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे यांना शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, ‘डॉक्टर फॉर बेगर्स’ म्हणून ओळख असलेले डॉ. अभिजीत सोनवणे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी, महेश सहकारी बँकेचे अध्यक्ष जुगल किशोर पुंगलिया यांना सहकार क्षेत्रातील योगदानासाठी, तसेच प्रवीण मसालेवालेचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांच्यासोबतच्या संवादातून त्यांनी आपला जीवनप्रवास, संघर्ष आणि आजपर्यंत केलेले कार्य थोडक्यात मांडले. जाधवर ग्रुपने या भागात एक नामवंत विद्यापीठ उभारावे, हे अॅड. शार्दूल जाधवर यांचे स्वप्न आहे. पुणे आणि नऱ्हे यांमधील सीमारेषा आता पुसट झाल्या असून जग एक छोटे खेडे बनले आहे. जिथे हा प्रकल्प साकारेल, तिथे निश्चितच उत्तुंग यश मिळेल. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची मी खात्री देतो.
