महापालिकेच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. (Pune) असं असताना पिंपरी चिंचवड महापालिकेतील उमेदवारीवरून मोठी बातमी समोर आली आहे. येथील दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचा गृहकलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे आमदार शंकर जगतापांनी दिलेला उमेदवार हा ‘नमकहरामी’ आहे असं स्टेटस भाजपच्या माजी आमदार आणि शंकर जगतापांच्या वहिनी अश्विनी जगतापांनी ठेवलं आहे. त्यांच्या या स्टेटसने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
लक्ष्मण भाऊंच्या छत्रछायेखाली तू तयार झालास, तेव्हा तू भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास? अशी अतिशय खोचक पोस्ट करत अश्विनी जगतापांनी केली. माऊली जगताप भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होता? असा प्रश्न वहिनींनी दिर शंकर जगतापांच्या निमित्ताने उपस्थित केलाय का? कारण लक्ष्मण जगतापांनी भविष्यात त्यांची राजकीय धुरा शंकर जगतापांकडे देणार, हे अनेकांना बोलून दाखवली होती. त्यामुळं वहिनींनी यानिमित्ताने दिरावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय का? अशी चर्चा शहरभर रंगलेली आहे.
माऊली जगतापांच्या उमेदवारीने वाद?
माऊली जगतापांना प्रभाग 31 मधून शंकर जगतापांनी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे यानिमित्ताने जगताप दीर-वहिनीतील वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. माऊली जगतापला उमेदवारी दिल्यानंतर त्याने गुलालात माखलेला एक फोटो आणि त्यासोबत ‘पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरलं!’ अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यावरून अश्विनी जगतापांनी शंकर जगतापांनी ‘नमकहरामी’ला उमेदवारी दिल्याची पोस्ट केली. मतदानाच्या काही तास आधी अश्विनी जगतापांनी हा संदेश देऊन, दिवंगत लक्ष्मण जगताप समर्थकांच्या काळजात हात घातलाय. यावर शंकर जगताप आणि माऊली जगतापांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.
Video : पुण्याची वाहतूक व्यवस्था कुणामुळं बिघडली?, मुरलीधर मोहळांनी सांगितला नवा प्लॅन
शंकर जगतापांनी माऊली जगतापांना प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी दिली. मुळात माऊली हे प्रभाग क्रमांक 29 मध्ये रहायला आहेत. त्यामुळं माऊलीने प्रभाग 31मध्ये अतिक्रमण केलं, अशी चर्चा भाजपचे स्थानिक सुरुवातीपासूनचं करत होते. मात्र माऊली प्रभाग 31चे उमेदवार असतील याची शंकर जगतापांनी शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाच खबर लागू दिली नाही. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोगाने यादी जाहीर केली, तेव्हा प्रभाग 31 मधील भाजपला हा धक्का सहन करावा लागला. त्यानंतर स्थानिकांनी आयात उमेदवार नको, अशी मोहीम राबवली. अशातच माऊली जगतापांनी सोशल मीडियावर गुलालात माखलेल्या स्वतःच्या फोटोसह एक पोस्ट केली.
’15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न, शपथ प्रत्यक्षात साकार झाले. साथ असावी आयुष्यभराची हीच माझी आशा…. कारण तुमच्याच आशीर्वादाने मिळाली लढण्याची दिशा… आपल्या प्रेमाचं ऋण या जन्मात तरी फिटणार नाही…. तुमच्या सगळ्यांचे आभार. दरम्यान, माऊली जगतापांच्या या आशयात अश्विनी जगतापांनी बरंच काही हेरलं अन माऊली जगतापांनी बरंच काही पेरलं अशी शंका उपस्थित केली. मतदानाला अवघे काही तास उरले असताना त्यांनी एक स्टेटस ठेवलं. माऊली जगतापांनी टाकलेला फोटो आणि तो आशय याचा स्क्रिनशॉट ही सोबत जोडला. त्यात
निष्ठा की विश्वासघात?
15 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झालं,” असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप हे स्वप्न पाहताना तुला तुझीच लाज कशी वाटली नाही? जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आपल्या कर्तृत्वाने राजकारण गाजवत होते, तेव्हा तू त्यांच्याच सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास? याचा अर्थ असा की, तू 15 वर्षे भाऊ बरोबर नव्हता, तर त्यांच्या ‘शेवटाची’ वाट पाहत होतात. ज्या भाऊंनी तुला ओळख दिली, त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्षे मनात विष पेरून ठेवले? हे स्वप्न नाही, तर ही ‘नमकहरामी’ आहे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप.
विजयाचा गुलाल उधळताना भान विसरलास, पण लक्षात ठेव ते तुझ स्वप्न नाही तर तुझा सडक्या वृत्तीचे आणि बुद्धीचे प्रदर्शन आहे! अशी अतिशय खोचक पोस्ट करत अश्विनी जगतापांनी संताप व्यक्त केला. या स्टेट्समधून त्यांनी केवळ माऊली जगतापांची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला नाही तर भाऊंशी ‘नमकहरामी’ केलेल्यास उमेदवारी दिली असं म्हणत दीर शंकर जगतापांवरही अप्रत्यक्षपणे तोंडसुख घेतलं.
माऊली जगताप भाऊंच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होता? असा प्रश्न वहिनींनी दीर शंकर जगतापांच्या निमित्ताने उपस्थित केलाय का? कारण लक्ष्मण जगतापांनी भविष्यात त्यांची राजकीय धुरा शंकर जगतापांकडे देणार, हे अनेकांना बोलून दाखवली होती. चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुक असो की 2024ची विधानसभा निवडणूक असो यावेळी सुद्धा जगताप दीर-वहिनीत राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. दिवंगत लक्ष्मण जगतापांचा राजकीय वारसदार कोण? यावरून दीर-वहिणींमध्ये राजकीय वैमनस्य पहायला मिळालं होतं.
शंकर जगताप आमदार झाले तेव्हापासून दीर-वहिनीचं आता मिटलंय, असं काहीसं चित्र सर्वांनी अनुभवलं. मात्र आता यानिमित्ताने वहिनींनी दिरावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय का? अशी चर्चा शहरभर रंगलेली आहे. मतदानाच्या काही तास आधी अश्विनी जगतापांनी ‘निष्ठा की विश्वासघात?’ असा प्रश्न उपस्थित केलाय. भाऊंच्या ‘शेवटाची’ वाट पाहणाऱ्या, मनात विष पेरून पेरलेल्या माउलीला उमेदवारी दिल्यानं हा अश्विनी जगतापांनी अशी खदखद व्यक्त केली. हा संदेश देऊन अश्विनी जगतापांनी दिवंगत लक्ष्मण जगताप समर्थकांच्या काळजात हात घातलाय. आता याचे सावट उद्याच्या मतदानावर पडण्याची शक्यता आहे. म्हणूनचं शंकर जगताप आणि माऊली जगतापांनी यावर प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे.
