Download App

आपल्याच जाळ्यात अडकला बांग्लादेश, न्यूझीलंडने मिळवला थरारक विजय

  • Written By: Last Updated:

BAN vs NZ : बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडने (New Zealand vs Bangladesh) शानदार पुनरागमन केले. दुस-या सामन्यात किवी संघाने बांग्लादेशवर (BAN vs NZ) 4 गडी राखून थरारक विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी किवी संघ अडचणीत असताना हा विजय मिळवला. किवी संघाच्या या विजयात ग्लेन फिलिप्स आणि एजाज पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात बांग्लादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांटोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर सुरुवातीपासूनच फिरकीपटूंना मदत मिळाली आणि बांग्लादेशच्या विकेट ठराविक अंतराने पडत राहिल्या. पहिल्या सत्रात 15 षटकांत बांग्लादेश संघाने 47 धावांत आघाडीचे चारही फलंदाज गमावले होते.

येथून मुशफिकुर रहीम (35) आणि शहादत हुसेन (31) यांनी 57 धावांची भागीदारी करत बांग्लादेश संघाला 100 च्या पुढे नेले. या धावसंख्येवर मुशफिकुरला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याबद्दल आऊट देण्यात आले. यानंतर बांग्लादेशचा संपूर्ण संघ 172 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्सने 3-3, एजाज पटेलने 2 आणि टीम सौदीने एक विकेट घेतली.

न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या या अप्रतिम कामगिरीनंतर बांग्लादेशच्या फिरकीपटूंनी धुमाकूळ घातला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांग्लादेशच्या फिरकीपटूंनी किवी संघाला 55 धावांत 5 गडी बाद केले होते. तैजुल इस्लामने 3 आणि मेहदी हसन मिराजने 2 बळी घेतले. अशाप्रकारे किवी संघ सामन्याच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे बॅकफूटवर होता.

खासदार दानिश अलींची बसपामधून हकालपट्टी; राहुल गांधींना साथ दिल्याने मायावतींची कारवाई?

ग्लेन फिलिप्सने डाव सावरला
खराब हवामान आणि पावसामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही आणि तिसऱ्या दिवशीही मर्यादित षटके टाकता आली. येथे ग्लेन फिलिप्सने किवींचा डाव सांभाळला. त्याने 72 चेंडूत 87 धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या आधारे न्यूझीलंडला 8 धावांची आघाडी मिळवून दिली. न्यूझीलंडने पहिल्या डावात 180 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने बांग्लादेशच्याही दोन विकेट्स काढल्या होत्या.

न्यूझीलंडच्या एजाज पटेलचा कहर
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला बांग्लादेश संघाने 2 गडी गमावून 38 धावा केल्या. सलामीवीर झाकीर हसनने 59 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. पण दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळाली नाही. येथे बांग्लादेशचा दुसरा डाव अवघ्या 144 धावांत आटोपला. किवी फिरकी गोलंदाज एजाज पटेलने 57 धावा आणि 6 विकेट्स घेत बांग्लादेशचा पूर्णपणे धुव्वा उडवला. मिचेल सँटनरनेही तीन बळी घेतले. त्यामुळे आता न्यूझीलंडसमोर विजयासाठी केवळ 137 धावांचे लक्ष्य होते.

PM मोदींच्या होमग्राऊंडमधूनच नितीश कुमारांचा शड्डू : वाराणसीतून फोडणार प्रचाराचा नारळ

फिलिप्सने पुन्हा एकदा डाव सावरला
फिरकीच्या ट्रॅकवरही हे लक्ष्य सोपे नव्हते. न्यूझीलंड संघाने केवळ 69 धावांत 6 विकेट गमावल्या होत्या. मेहदी हसन मिराझने तीन विकेट्स आणि तैजुल इस्लामच्या दोन विकेट्सने न्यूझीलंडला पुन्हा एकदा बॅकफूटवर आणले. मात्र येथून पुन्हा एकदा ग्लेन फिलिप्सने झटपट 40 धावा केल्या. त्याच्यासोबत मिचेल सँटनरनेही 35 धावांची खेळी केली. दोघांमध्ये नाबाद 70 धावांची भागीदारी झाली आणि न्यूझीलंडने हा सामना 4 गडी राखून जिंकला.

Tags

follow us