महाराष्ट्र काॅंग्रेसमध्ये ‘रेवंत रेड्डी’ कोण ठरणार?
Mahrashtra Congress : महाराष्ट्रातील काॅंग्रेसची (Congress) स्थिती कशी आहे, या प्रश्नावर तुमच उत्तर काय असेल? बहुतांश नेतेमंडळी बडा घर, पोकळ वासा, असे उत्तर देतील. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काॅंग्रेसला जुन्या पण भग्न झालेल्या वाड्याची उपमा दिली होती. हा वाडा दुरूस्त होणार का नाही, हाच प्रश्न आहे. शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंत रेड्डी (Revanth reddy) हे के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात पोटतिडकीने लढतात आणि मुख्यमंत्रीही होतात. महाराष्ट्रातील काॅंग्रेस नेत्यांत अशी क्षमता नाही का? चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालात तीन राज्यांत भाजपने सत्ता आणली. तेलंगणा काॅंग्रेसने राखले. भाजपच्या जोरदार यशानंतर महाराष्ट्रातील काॅंग्रेसही फुटणार, अशी चर्चा सुरू झाली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात सक्षमपणे २०२४ उभा राहणारा काॅंग्रेसचा नेता कोण, असा प्रश्नही कोणी विचारू शकला नाही.
महाराष्ट्राला सर्वाधिक मुख्यमंत्री देणाऱ्या काॅंग्रेसचा जनाधार सातत्याने घटत आहे. परंतु दुसरीकडे पक्षाची व्होट बॅंक काही टापूत अजूनही सुरक्षित आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन पक्षांची शकले झालीत. फडणवीस यांनी हे दोन्ही पक्ष फोडली. परंतु फुटीची सर्वाधिक चर्चा असलेल्या काॅंग्रेस पक्षातील सर्वच आमदार अजून तरी एकनिष्ठ आहेत. निवडणुका जवळ येतील तशी गळती सुरू होईल, असे बोलले जाते. इतर दोन पक्षांची शकले उडत असताना काॅंग्रेस एकसंघ राहिली, हे मोठेच यश मानायला हवे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटापेक्षा विरोधी पक्ष म्हणून काॅंग्रेसची ताकद निश्चितपणे जास्त आहे. या ताकदीचा आणि योग्य त्या रणनीतीचा वापर करून पक्षाला चांगले दिवस आणणारा नेता कोणी आहे का, याचा शोध या निमित्ताने घेतला तर त्यात प्रामुख्याने पाच नावे पुढे आली. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मंत्री अमित देशमुख, सतेज पाटील यांची नावे नजरेसमोर येतात. या नेत्यांच्या व्यक्तिमत्वाचा लेखाजोखा या निमित्ताने आपण पाहणार आहोत.
नाना पटोले – काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून पटोले हे गेली दोन वर्षे काम पाहत आहेत. ओबीसी चेहरा म्हणून पक्षाने त्यांना पुढे केले. आक्रमक नाना हे तेव्हाच्या एकत्रित राष्ट्रवादीच्या दादागिरीला थोपवतील, असाही त्यांच्या नियुक्तीमागे विचार होता. विधानसभा अध्यक्षपद सोडून नानाही हिरीरीने मैदानात उतरले. पण त्यानंतर पक्षाला ठोस कार्यक्रम देण्यात ते अयशस्वी ठरले. त्यांच्या काळात महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यशस्वीपणे पार पडली, ही विशेष बाब ठरली. पण त्यांचे थोरात आणि अशोक चव्हाण यांच्याशी ताणलेले संबंध राहिले आहेत. त्याचाही फटका त्यांना बसतो. सत्यजित तांबे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यावरून जो घोळ झाला, यातून ते सारे स्पष्ट झाले. नाविन्यपूर्ण आंदोलने, सरकारच्या कारभाराविरोधात मुद्देसुद मांडणी, उजव्या विचाररणीला विरोध असणाऱ्या बुद्धिवंतांशी संवाद, त्यांना आपल्याकडे वळविणे, असे नाना पटोले करू शकतात. पण गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांना ते जमले नाही. कसबा पोटनिडणुकीत रवींद्र धंगेकर यांच्या रुपाने काॅंग्रेसला विजय मिळाला, ही पटोले यांची मोठी कामगिरी राहिली.
विजय वडेट्टीवार– विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून वडेट्टीवार यांचा प्रभाव पडायचा आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना ठाकरे सरकारला मुद्यांवर कोंडी पकडत होते. तशी मांडणी वडेट्टीवार यांची दिसत नाही. आपण ओबीसींचे नेते व्हायचे की महाराष्ट्राचे, याचाही पेच त्यांच्यासमोर आहे. छगन भुजबळ यांच्याप्रमाणे ते ओबीसीसाठी रिंगणात उतरलेले नाहीत. याबाबत काॅंग्रेस पक्षाचाच गोंधळ असल्याने वडेट्टीवार यांनाही ठोस निर्णय घेता आला नसावा. वडेट्टीवार यांना अद्याप मास अपील मिळालेले नाही. त्यांच्या भागात ते लोकप्रिय असतील पण इतर भागांत त्यांना अद्याप छाप पाडायची आहे. विरोधी पक्षनेत्याच्या रुपाने त्यांना चांगली संधी मिळाली आहे. शिंदे सरकारला ते कशा पद्धतीने नामोहरम करणार, यावरच त्यांची क्षमता सिद्ध होईल. नाना पटोले यांच्यासारखे वरवरचे आरोप न करता थेट अभ्यासू पद्धतीने शिंदे सरकारमधील एक-दोन मंत्र्यांची विकेट त्यांनी घेतली तर ते त्यांच्यासाठी अधिक महत्वाचे ठरेल.
सोनिया गांधींचे 77 व्या वर्षात पदार्पण : PM मोदींनी दिल्या आरोग्यपूर्ण अन् दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा
अशोक चव्हाण– आपण भाजपमध्ये जाणार नाही, हे सांगण्यातच चव्हाण यांचा बराचसा वेळ जातो. शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी चव्हाण हे अनुपस्थित राहिले. त्यामुळे हा संशय आणखी वाढला. चव्हाण यांच्यामागे काही आमदारांचे बळ निश्चितपणे आहे. पण त्याचा वापर करून ते सरकारच्या विरोधात तुटून पडले असे होत नाही. काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांची हीच पंचायत आहे. त्यात आदर्श गैरव्यवहाराचे भूत त्यांच्यामागे आहे, ही त्यांच्यासाठी मोठी अडचण आहे. रस्त्यावर उतरून संघर्ष कसा करायचा, याचा विसर चव्हाण यांच्यासह काॅंग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना पडला आहे. त्यात आपण संघर्ष करायला लागलो तर चौकश्यांचे सत्र सुरू होण्याचा धोकाही या नेत्यांना वाटतो. त्यामुळेच चव्हाण हे थेट जनतेत जाऊन सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यापेक्षा विधीमंडळात भूमिका मांडतात. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रभर असा करिश्मा होऊ शकला. चव्हाण हे मराठवाड्यात विशेषत: नांदेडमध्ये चव्हाण हे पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतात.
उद्वव ठाकरे गटाने केली शिंदेंच्या २३ आमदारांची कोंडी!
बाळासाहेब थोरात- थोरात हे सहकारातील नेते म्हणून परिचित आहेत. विधानसभेत आठ वेळा निवडून येणारे ते ज्येष्ठ सदस्य आहेत. जुन्या पद्धतीचे राजकारण करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांच्यापुरते यश त्यांनी सातत्याने मिळवले आहे. पण नगर जिल्हा सोडून ते फारसे लक्ष घालत नाहीत. प्रभावी वकृत्त्व नसले तरी माणसे जोडण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. बाळासाहेब हे मितभाषी आहेत. ते केव्हातरीच आक्रमक होतात. पण निवडणुका जिंकण्यातील त्यांचे कौशल्य वादातीत आहे. ज्याच्या सभा ऐकायला गर्दी होईल, असा एकही नेता काॅंग्रेसकडे नाही. बाळासाहेबांकडे ही कला अजिबात नाही. वाढते वय त्यांच्यासाठीचा मुद्दा आहे. तरुणांमध्ये त्याती शहरी तरुणांत अजिबातच क्रेझ नसणे हे त्यांच्यासाठी अडचणीचे आहे. त्यांचे भाचे सत्यजित तांबे यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून बराच वाद झाला. तांबे यांना भाजपने पाठिंबा दिला. ते आमदार झाले. या प्रकारात बाळासाहेब हे मौनच राहिले. तसे होऊनही राहुल गांधी यांच्या ते गुडबुकमध्ये आहेत, ही जमेची बाब आहे.
सतेज पाटील- कोल्हापुरात काॅंग्रेसचा झेंडा राखण्यात सतेज पाटील यांना यश आले आहे. भाजपने आणि राष्ट्रवादीने ताकद लावूनही येथील काॅंग्रेस टिकली याचे सारे श्रेय सतेज पाटील यांचे आहे. पटोले, चव्हाण, थोरात यांच्यापेक्षा सतेज पाटील हे तरुण आहेत, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. स्थानिक राजकारणात भाजपशी प्रसंगी दोन हात करण्याचीही त्यांची तयारी असते. पक्षाने अद्याप त्यांचा हवा तसा वापर करून घेतलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा चेहरा पक्षाला उपयोगी पडू शकतो. पण त्यांनीही अद्याप कोल्हापूर वगळता आपला प्रभाव इतरत्र कोठे सिद्ध केलेला नाही. कोरी पाटी म्हणून ते भाजपच्या विरोधात आक्रमकपणे रिंगणात उतरू शकतात. पण ज्येष्ठांना पुढे करण्याचा निर्णय झाला तर सतेज पाटील पुन्हा कोल्हापूर पुरतेच मर्यादित राहतील.
अमित देशमुख : स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा वसा आणि वारसा अमित देशमुख यांच्याकडे आला आहे. वडिलांप्रमाणे त्यांचे वक्तृत्वही प्रभावी आहे. पण त्यांची आरामदायी संस्कृती लातुरात चर्चेत असते. त्यांना संधी असूनही ते पूर्णवेळ राजकारण करत नाहीत, असा त्यांच्यावर आक्षेप असतो. अमित देशमुख यांच्याही भाजप प्रवेशाच्या वावड्या उडत असतात. पण त्यात तथ्य नसल्याचे त्यांनी त्यांच्या कृतीतूनच दाखवून दिले आहे.
याशिवाय इतरही अनेक नेते स्पर्धेत असू शकतात. पण सध्या तरी या सहा नावांची चर्चा या ठिकाणी केलेली आहे.
विश्लेषक काय म्हणतात ?
रवीकिरण देशमुख (ज्येष्ठ विश्लेषक) : महाराष्ट्रात आघाड्यांचे राजकरण सुरु झाले. ९१९४ पासून पुन्हा १९९९ मध्ये ते अधिक घट्ट झाले. त्यांनतर एक हाती नेतृत्वाने राज्य जिंकणे अशक्य आहे. ही संधी मोदींच्या रूपाने देवेंद्र फडणवीस याना मिळाली होती. पण त्यात यश आले नाही अखेर शिवसेनेला सोबत घ्यावे लागले. आता तर काँग्रेसमध्ये असंख्य शकले पडली आहेत. मराठवाडा , विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई अशी सारी विभागणी आहे. या सर्वांना सोबत घेईल, असा नेता होण्याची क्षमता काॅंग्रेसमध्ये कोणाचीही नाही.
किरण तारे (जेष्ठ पत्रकार)- रेड्डी हे मुळात काँग्रेसचे नाहीत. ते ABVP सारख्या चळवळीतून पुढे आले. काँग्रेसमध्ये मुळात तरुणांना संधी मिळते कुठे? काँग्रेसमध्ये नेतृत्व उदय व्हायला वेळ लागतो. जे तरुण नेते आहेत ते संस्थानिक आहेत. काँग्रेसकडे सतेज पाटील, विश्वजीत कदम, सत्तजित तांबे यासारखे लिडर आहेत पण काँग्रेस त्याना संधी कधी देते? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रात तसा एकहाती नेता काँग्रेसला घडवावा लागेल.
चंदन शिरवळे (जेष्ठ पत्रकार व माजी अध्यक्ष विधिमंडळ वार्ताहर संघ)– राज्यात काँग्रेसमध्ये प्रशासन आणि पक्ष अशी पकड असलेला , सर्वांना सोबत घेणारा व्यक्ती सध्या तरी कोणी नाही. अशोक चव्हाण यांच्याकडे ती ताकद आहे पण ते अनेकदा पुढे येत नाहीत. त्यांनी पुढाकार घेतला तर ते एकसंघ नेतृत्व काँग्रेसला देवू शकतात.
धर्मेंद्र झोरे (ज्येष्ठ पत्रकार) : राज्यात आज पाच मोठे पक्ष आहेत. अशा परिस्थितीत कोणी एक नेता, एक पक्ष एक राज्य ही संकल्पना आणेल अस नेतृत्व नाही. देशात इतर राज्य आणि महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती वेगळी आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर महारष्ट्र काँग्रेसमध्ये लोकनेते ही संकल्पना संपली. प्रत्येकाला इथे मित्रपक्ष घेऊनच राजकारण करावे लागेल. काँग्रेसचा विचार केला तर अशोक चव्हाण हे एकमेव नेते आहेत जे एकहाती नेतृत्व करू शकतात.