Download App

ऑस्ट्रेलियाचा ‘पाणी’दार विजय! वॉर्नर-कमिन्स चमकले, पराभवाने बांग्लादेशची वाट बिकट

टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील सामन्यात आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला अक्षरशः पाणी पाजलं.

Australia Beat Bangladesh : टी 20 विश्वचषकातील सुपर 8 फेरीतील सामन्यात आज गतविजेतत्या ऑस्ट्रेलियाने (Australia Beat Bangladesh) बांग्लादेशला अक्षरशः पाणी पाजलं. बांग्लादेशने दिलेल्या 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग (AUS vs BAN) करत ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना जिंकला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलकडे दमदार वाटचाल केली आहे तर पराभवामुळे बांग्लादेशची वाटचाल कठीण झाली आहे. या सामन्यात पॅट कमिन्सने (Pat Cummins) धारदार गोलंदाजी करत बांग्लादेशच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. एकाच ओव्हरमध्ये हॅट्ट्रीक घेतली. पावसाच्या व्यत्ययामुळे दोनवेळा सामना थांबवावा लागला. सुरुवातीचे सहा ओव्हर झाल्यानंतर पावसामुळे सामना थांबवावा लागला. डकवर्थ लुईस नियमानुसार यावेळी बरोबरीचा स्कोअर 35 असा होता. पाऊस जर कायम राहिला असता तर ऑस्ट्रेलिया तेव्हाच जिंकला असता.

सूर्याचं वादळ अन् बुमराहचा कहर.. टीम इंडियाकडून अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. त्यामुळे बांग्लादेशचे फलंदाज सुरुवातीपासूनच अडखळत होते. कर्णधार नजमुल हुसैनने सर्वाधिक 41 धावा केल्या. त्याच्यानंतर बांग्लादेशचा एकही फलंदाज खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकला नाही. सामन्यातील अठराव्या ओव्हरमध्ये पॅट कमिन्सने घातक गोलंदाजी केली.

या ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर दोन विकेट घेतल्या. त्यानंतर विसाव्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर तौहीद हृदयोयला तंबूत पाठवत हॅट्ट्रीक पूर्ण केली. बांग्लादेशने कशातरी 140 धावा केल्या. मागील काही सामन्यात कमिन्स संघाबाहेर होता. परंतु, सुपर 8 मधील सामन्यांसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्यात त्याने धारदार गोलंदाजी करत तीन विकेट घेतल्या. अॅडम झाम्पाने दोन तर मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

बांग्लादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी केली. सुरुवातीच्या सहा ओव्हरनंतर पाऊस सुरू झाल्याने सामना काही काळ थांबवावा लागला होता. यानंतर सामना सुरू झाल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. रिशाद हुसेननच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेड बाद झाला. हेडने 31 धावा केल्या.

T20 World Cup 2024: भारीच, फ्रीमध्ये पाहता येणार टी20 वर्ल्ड कप सामने; जाणून घ्या कसं

पहिल्या सात ओव्हर्समध्येच संघाच्या एक बाद 65 धावा झाल्या होत्या. यानंतर नवव्या ओव्हरमध्ये मिचेल मार्शची दुसरी विकेट पडली. 11.2 ओव्हर टाकून झाल्यानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या दोन बाद 100 धावा झाल्या होत्या. डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलिया 28 धावांनी पुढे होता. यावेळी मात्र पाऊस कायम राहिला त्यामुळे या नियमानुसार ऑस्ट्रेलियाला 28 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 53 धावा केल्या.

 

follow us