Yuzvendra Chahal Big Decision : भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. आधी तो घटस्फोमुळे चर्चेत आला होता. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलच्या दिवशी एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला होता. (Chahal) पण आता २०२३ पासून भारतासाठी सामना न खेळलेल्या युझवेंद्र चहलने एक मोठा निर्णय घेतला आहे. चहलने पुन्हा काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
मागील हंगामातही चहल नॉर्थम्प्टनशायर संघाचा भाग होता. ज्यामध्ये त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. वन-डे कपमध्ये पदार्पणाच्या सामन्यात केन्टविरूद्ध खेळताना त्याने फायफर (५ विकेट्स) पूर्ण केला होता. त्याने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डर्बीशायरविरुद्ध (९-९९) ही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डर्बीशायर आणि लिस्टरशायरलाविरुद्धच्या कामगिरीमुळे चहलने नॉर्थम्प्टनशायरला सलग दोन विजय मिळवून दिले. त्याने हंगामात फक्त चार प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २१ च्या सरासरीने १९ विकेट्स घेतल्या. जरी चहल २०२४ चा पुरुष टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. तरी त्याला २०२३ पासून भारतासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही. नॉर्थम्प्टनशायरचे नवे मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन, चहलचे क्लबमध्ये पुन्हा स्वागत करण्यासाठी उत्सुक होते.
“जगातील सर्वोत्तम लेग स्पिनर्सपैकी एक असणारा युझवेंद्र चहल या हंगामात नॉर्थम्प्टनशायरला परतत आहे. याबद्दल मला खूप आनंद होत आहे. तो अमूल्य अनुभव घेऊन येतो आणि तो खेळावर प्रेम करणारा एक परिपूर्ण सज्जन आहे. जूनच्या मध्यापासून हंगामाच्या शेवटपर्यंत तो उपलब्ध असणे आमच्यासाठी विलक्षण असेल.” मुख्य प्रशिक्षक डॅरेन लेहमन म्हणाले.