Satara Loksabha : लोकसभा निवडणूक मतमोजणीमध्ये राज्याचा पहिला निकाल हाती आलायं. सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Loksabha) महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांनी महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी चीतपट केलंय. उदयनराजे भोसले यांचा मागील निवडणुकीत पराभव झाला होता, या पराभवाचा वचपा यंदाच्या निवडणुकीत उदयनराजेंनी काढलायं. उदयनराजे यांचा विजय होताच ते भावूक झाल्याचे दिसून आले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार उदयनराजे भोसले यांना 3 लाख 42 हजार 268 मताधिक्य मिळालंय, तर महाविकास आघाडीचे उमदेवार शशिकांत शिंदे यांना 3 लाख 37 हजार 186 मते मिळाल्याचं समोर आलंय. अद्याप निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी समोर आली नसून उदयनराजे भोसले यांचा विजय झाल्याचं निश्चित झालंय.
2009 च्या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांचा 3 लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर 2014 ला पुन्हा त्यांनी जाधव यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये पुन्हा एकदा उदयनराजेंनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांना पाणी पाजून विजय मिळवला होता. अशा पद्धतीने उदयनराजेंनी सलग तीनवेळा विजय मिळवला. मात्र, राष्ट्रवादीच्या खासदाराकीचा राजीनामा देत त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर विधानसभा आणि लोकसभेची पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत शरद पवार यांनी भर पावसात सभा घेतल्याने राज्यातील राजकीय वातावरणच बदललं होतं. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेच्या श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या उदयनराजेंचा तब्बल 87 हजार मतांनी पराभव केला होता.