Lok Sabha Election : देशात आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास (Lok Sabha Election) सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांच्या जागावाटपाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत. कोणती जागा कुणाला द्यायची याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही मात्र नेते मंडळींकडून दबावाचे पॉलिटिक्स सुरू आहे. या लोकांनी कितीही दबाव आणला तरीही संबंधित उमेदवाराच्या विजयाचे गणित पाहूनच तिकीट फायनल होणार आहे. अशा परिस्थितीत पुढील काही दिवसांत सगळ्याच पक्षात इनकमिंग सुरू झालेली दिसेल. फक्त राजकारणीच नाहीतर मोठी सेलिब्रिटी मंडळी आणि चित्रपटांतील अभिनेते सुद्धा राजकारणात एन्ट्री घेताना दिसतील. निवडणुकीत अभिनेत्यांना तिकीट देऊन त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचा ट्रेंड भारतीय राजकारणात आहे.
अभिनेते राजकारणात येतात आमदार खासदार होतात काहींना तर मंत्रिपदाची लॉटरी सुद्धा लागते. पण काही असेही अनलकी असतात ज्यांना राजकारण जमतच नाही. आताच एक माहिती हाती आली आहे. सतराव्या लोकसभेत (Lok Sabha) अनेक वेळा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या चर्चांमध्ये खासदारांनी सहभाग घेऊन मते मांडली. पण यामध्ये असे काही खासदार होते ज्यांच्या तोंडाला कायम कुलूप राहिले. या मौनी खासदारांमध्ये भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) आणि टीएमसी खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांचा समावेश आहे. एका अर्थाने ते राजकारणात फ्लॉप ठरले. पण फक्त सनी देओल आणि शत्रुघ्न सिन्हाच नाही तर असे अनेक राजकारणी अभिनेते आहेत जे राजकारणात झिरो ठरले तर काही जण प्रचंड यशस्वी ठरले आहेत.
अभिनयात हिरो पण, राजकारणात झिरो; सनी देओल, शत्रुघ्न सिन्हा लोकसभेत ‘गपगार’
धर्मेंद्र
हिंदी चित्रपटांतील ही मॅन म्हणून धर्मेंद्र ओळखले (Dharmendra) जातात. शांत स्वभावाच्या धर्मेंद्र यांनी चित्रपट सृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले. सन 2004 च्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानातील बिकानेर मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. पण राजकारणात त्यांचं मन रमलं नाही. अधिवेशन सोडून धर्मेंद्र अभिनय आणि शेती मध्येच व्यस्त राहिले.
जया बच्चन
हिंदी चित्रपटांतील गुणी अभिनेत्री म्हणून जया बच्चन यांची (Jaya Bachchan) ओळख आहे. फक्त अभिनेत्रीच नाही तर यशस्वी राजकारणी म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचे पती अमिताभ बच्चन राजकारणात सपशेल अपयशी ठरले. पण जया बच्चन यांनी मात्र राजकारण गाजवले. त्या समाजवादी पार्टीच्या खासदार आहेत. आताही 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. जया बच्चन यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तसेच राज्यसभेतील सर्वोत्कृष्ट महिला खासदार म्हणून त्यांना अलीकडेच सन्मानित करण्यात आले होते.
अमिताभ बच्चन
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या आग्रहानंतर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) राजकारणात आले. त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांच्या विरोधात इलाहाबाद लोकसभा निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. परंतु पुढे बोफोर्स घोटाळा समोर आल्यानंतर व्यथित होऊन अमिताभ यांनी खासदारकी सोडली आणि राजकारणालाही सोडचिठ्ठी दिली ती कायमचीच.
‘फाइटर’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; 20 दिवसात 199 कोटींचा टप्पा केला पार
जया प्रदा
बॉलीवूडमधील आणखी एक यशस्वी अभिनेत्री म्हणजे जयाप्रदा. सन 1994 मध्ये त्यांनी तेलुगू देसम पक्षात प्रवेश घेत राजकारणाची सुरुवात केली. पुढे पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांच्या बरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. समाजवादी पार्टीत प्रवेश केला. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत रामपुर मतदारसंघातून विजयी झाल्या. पुढील 2009 मधील निवडणुकीत सुद्धा विजय मिळवला.
राज बब्बर
राज बब्बर यांनीही अभिनयाला रामराम करत राजकारणात एन्ट्री घेतली. 1989 मध्ये जनता दलापासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. 1994 ते 1999 या काळात बब्बर राज्यसभेचे खासदार होते. त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. पुढे काही कारणांमुळे सन 2006 मध्ये त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. 2008 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले. 2014 च्या निवडणुकीत मात्र व्ही. के. सिंह यांनी त्यांचा पराभव केला.
गोविंदा
1990 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे गोविंदा. या काळात गोविंदाचे चित्रपट तुफान चालत असत. त्याच्या लोकप्रियतेच्या आसपासही दुसरा कोणता अभिनेता नव्हता. हाच गोविंदा पुढे राजकारणात आला. काँग्रेस पक्षात प्रवेश करत 2004 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला. खासदार म्हणून गोविंदाची कामगिरी मात्र शून्य राहिली. 2005 मध्ये मुंबईत पुर आला. या संकट काळीही लोकांना त्याची काहीच मदत झाली नाही. त्यामुळे त्याला मोठी टीका सहन करावी लागली. राजकारण हा आपला प्रांत नाही हे लक्षात आल्यानंतर 2009 मध्ये गोविंदाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.
उर्मिला मातोंडकर
एकेकाळी उर्मिला मातोंडकर बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री होती. उर्मिलाने 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत तिचा पराभव झाला. पुढे ऊर्मिलाने काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात प्रवेशासाठी तिने प्रयत्न केले होते. मात्र शिंदे गटातील नेत्यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या संभाव्य प्रवेशाला कडाडून विरोध केला. त्यामुळे हा प्रवेश झाला नाही अशी चर्चा आहे.
हेमा मालिनी
सन 2003 ते 2009 या काळात अभिनेत्री हेमा मालिनी राज्यसभेच्या खासदार होत्या. तत्कालीन राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांची नियुक्ती केली होती. सन 2004 मध्ये हेमा मालिनी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुरुवातीला त्यांना भाजप महासचिव पद देण्यात आले. 2014 च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना मथुरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी यांचा पराभव केला.