Mumbai North East LokSabha Constituency: प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)-काही लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election 2024) कायमच वेगळा निकाल लागतो. प्रचंड अनिश्चतेता असलेला मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ म्हणजे ईशान्य मुंबई (Mumbai North East LokSabha Constituency) मतदारसंघ आहे. लाट असो नसो प्रत्येक निवडणुकीत विद्यमान खासदाराला (Members of Parliament) घरी पाठवणारा हा मतदारसंघ आहे. खरंतर भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congresss) अशी सरळ-सरळ लढाई या मतदारसंघात होते. पण २००९ ला मनसेची एंट्री झाली आणि या मतदारसंघात तिरंगी लढत सुरु झाली. मनसेच्या मतविभाजनाचा कधी भाजप-सेना युतीला फायदा झाला तर कधी तोटा झाला. पण यंदा २०२४ ला इथे तिरंगी लढत अपेक्षित तर आहेच पण विद्यमान खासदाराला हा मतदारसंघाची जनता घरी बसवेल का ? असा प्रश्न आहे. या मतदारसंघाबाबत जाणून घेऊया…
मोठी बातमी! रोहित पवारांना ईडीची नोटीस, 24 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश
ईशान्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात विक्रोळी, भांडुप, मुलुंड , घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द-शिवाजीनगर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी विक्रोळीमध्ये शिवसेनेचे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आमदार आहेत. भांडूपमध्ये शिवसेनेचे गजानन कारेगावकर हे आमदार आहेत. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे अबू आझमी आमदार आहेत. घाटकोपर पश्चिम भाजपचे राम कदम , घाटकोपर पूर्व पराग शहा आणि मुलुंडमध्ये भाजपचे मिहीर कोटेचा आमदार आहेत. भाजपचे तीन , शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्ष एक असे आमदार आहेत.
जातीच्या गणितानुसार या मतदारसंघामध्ये मराठी, गुजराथी, उत्तर भारतीय हिंदी भाषिक, मुस्लिम दलित आणि दक्षिण भारतीय असा संमिश्र मतदार आहे. भांडुप आणि विक्रोळी, टागोरनगर, कन्नमवार नगर हा मराठी बहुल भाग आहे. भांडुप आणि घाटकोपर पश्चिम हा गुजराथी बहुल भाग आहे. घाटकोपर पश्चिम तसेच मानखुर्द शिवाजीनगर हे झोपडपट्टीचे अधिक प्रमाण असलेले मतदारसंघ आहेत. यात मराठी, मुस्लिम दलित आणि दक्षिण भारतीय मतदार यांचा प्रभाव मोठा आहे.
या मतदारसंघाने प्रत्येक वेळी विद्यमान खासदारला घरी बसवले. या मतदारसंघाचा आपण इतिहास पाहिला तर 1980 पासून ते आजतागायत प्रत्येक निवडणुकीत विद्यमान खासदार पराभूत झाला आहे. 1980 ला भाजपचे सुब्रमण्यम स्वामी, १९८४ काँग्रेसचे गुरुदास कामत, १९८९ भाजपच्या जयवंती बेन मेहता, १९९१ गुरुदास कामत, १९९६ ला भाजपचे प्रमोद महाजन, १९९८ला काँग्रेस गुरुदास कामत, १९९९ भाजपचे किरीट सोमय्या, २००४ ला गुरुदास कामत, २००९ला राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील , २०१४ला किरीट सोमय्या आणि २०१९ ला भाजपचे मनोज कोटक हे विजयी झाले आहेत. सतत दुरंगी लढत असणाऱ्या मतदारसंघात २००९ पासून तिरंगी लढत होत आहे. तर १९८० पासून या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस हीच लढाई झाली आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचा हा मतदारसंघ होता. तर भाजपने प्रत्येक वेळी नवा उमेदवार दिला आहे. २००९ मध्ये हा मतदारसंघ महाविकास आघाडी जागावाटपात राष्ट्रवादीकडे गेला. तर युतीत तो भाजपकडेच राहिला. २००९ ला मनसेचा उदय झाल्यांनतर मनसेला सर्वाधिक मतदार आणि आमदार याच मतदार संघाने दिले. २००९ ला या लोकसभा मतदारसंघात मनसेचे मंगेश सांगळे, शिशिर शिंदे, राम कदम असे तीन आमदार निवडून आले होते. २००९ च्या लोकसभेला अतिशय अटितटीच्या लढतीत मनसेच्या शिशीर शिंदे यांना १ लाख ९० हजार मते मिळाली होती. भाजपचे किरीट सोमय्या २ लाख १० हजार तर राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांना २ लाख १३ हजार मते मिळाली होती. संजय दिना पाटील केवळ तीन हजार मतांनी विजयी झाले. पण २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप अशीच लढत राहिली. पण संजय दिना पाटील आणि भाजप उमेदवारामधील अंतर जवळपास २ लाख मतांचे राहिले. या दोन्ही निवडणुकीत भाजप विजयी झाले.
आता जागा कुणाला आणि उमेदवार कोण?
२०२४ च्या निवडणुकीत ही जागा शिवसेना (एकनाथ शिंदे)-भाजप महायुतीत जागावाटपात भाजपला जाईल. मनोज कोटक भाजपचे उमेदवार असू शकतात. किरीट सोमय्या देखील दावेदार आहेत. महाआघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाईल. राष्ट्रवादीचे नेते संजय दिना पाटील हे ठाकरे गटात गेले आहेत. ते या ठिकाणी उमेदवार असतील. एकेकाळी ताकदवार असलेले मनसेचे मनिष सांगळे भाजपत आहेत. तर शिशिर शिंदे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात आहे. तर राम कदम भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे मनसेची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे मनसेने उमेदवार उभा केला तरी लढाई महायुती विरोधात महाआघाडी अशीच राहणार आहे.
महाआघाडीकडे- खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत, आमदार गजानन कारेगावकर , आमदार अबू आझमी , माजी खासदार संजय दिना पाटील हे नेते आहेत. तर मराठा , दलित मुस्लिम आणि उत्तर भारतीय अशी मतदारांची ताकद आहे.महायुतीकडे अमित शाह यांचे विश्वासू खासदार मनोज कोटक , माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार राम कदम, आमदार मिहिर कोटेचा, आमदार पराग शाह असे मोठे नेते आहेत. हा मतदारसंघ महाआघाडी आणि महायुती दोघांनाही समसमान आहे. देशात असलेले लाट पाहता या मतदारसंघात विद्यमान खासदाराला घरी बसवण्याची परंपरा खंडित होणार का? हे निवडणुकीनंतरसमोर येईल.