Download App

महायुतीला धोक्याची घंटा! लोकसभा निवडणुकीत ‘164’ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मविआची’ सरशी

लोकसभेच्या 48 मतदारसंघांमध्ये येणाऱ्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 164 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले आहे

2014 च्या लोकसभा निवडणूक. महाराष्ट्रातून भाजपचे 23 खासदार… 2014 ची विधानसभा निवडणूक. भाजपचे 122 आमदार… 2019 ची लोकसभा निवडणूक. भाजपचे पुन्हा 23 खासदार… 2019 ची विधानसभा निवडणूक. भाजपचे 105 आमदार… यंदाची लोकसभा निवडणूक… भाजपची 25+ ची घोषणा. तर महायुतीची 45+ ची घोषणा. भाजपचे वारु यंदाही चौफेर उधळणार असेच वाटत होते. पण…

पण यंदा लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. तब्बल 31 जागांवर आघाडीने विजय मिळविला. भाजपची मोठी पिछेहाट झाली. 48 पैकी भाजपला केवळ नऊ जागांवर यश मिळविता आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही केवळ सात जागांवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही केवळ एका जागेवर विजय संपादन करता आला. देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपची सत्ता येणार असली तरीही महाराष्ट्रातील हीच पिछेहाट भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. (Out of 288 assembly constituencies Maha Vikas Aghadi has won votes in as many as 164 constituencies.)

आता याच लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महायुतीला त्यातही भाजपला विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा दिली आहे. कारण लोकसभेच्या 48 मतदारसंघांत येणाऱ्या 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 164 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला घसघशीत मताधिक्य मिळाले आहे. अनेक दिग्गजांची त्यांच्या बालेकिल्ल्यात पिछेहाट झाली आहे. यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री छगन भुजबळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण अशा दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघांचा समावेश आहे.

नेमक्या कोणत्या विभागातील किती आणि कोणाकोणाच्या मतदारसंघात महाविकास आघाडीने मताधिक्य मिळविले आहे, तेच आपण या व्हिडीओमधून पाहू…

मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा डंका :

महाविकास आघाडीने मुंबईतील सहापैकी चार मतदारसंघांमध्ये विजय संपादन केला आहे. तर महायुतीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ येतात. या 36 पैकी 22 जागांवर महायुतीचे आमदार आहेत. यात भाजपचे 16 आणि शिवसेनेचे सहा आमदार आहेत. तर 14 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत. पण तरीही 36 पैकी तब्बल 21 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा डंका वाजला आहे. तर केवळ 15 मतदारसंघांमध्येच महायुतीला प्राबल्य राखता आले आहे.

NDA सरकारमध्ये महाराष्ट्राचे किती मंत्री? अजितदादांच्या राष्ट्रवादीला लॉटरी; पाहा यादी

यामध्ये राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघातून अरविंद सावंत यांना पाच हजारांची आघाडी मिळाली. दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या भायखळा मतदारसंघात देखील नार्वेकर 45 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर राहिले. भाजप आमदार आशिष शेलार अगदीच काठावर पास झाले. त्यांच्या वांद्रे पश्चिममधून उज्ज्वल निकम यांना केवळ चार हजारांचीच आघाडी मिळाली. रविंद्र वायकर यांना त्यांच्याच जोगेश्वरी मतदारसंघातून आघाडी घेता आली नाही. इथून अमोल कीर्तीकर यांनी आघाडी घेतली. शिवसेनेचे चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे आणि कुर्लाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्याही मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी लीड घेतले.

मुंबईमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे हे आप-आपले बालेकिल्ले राखण्यात यशस्वी ठरले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली. उद्धव ठाकरे राहत असलेल्या वांद्रेमधून काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांना 27 हजारांचे मताधिक्य मिळाले. राज ठाकरे यांच्या दादर-माहीम मतदारसंघातून महायुतीला चांगली आघाडी घेता आली.

कोकण पट्ट्यात महाविकास आघाडीला रोखण्यात महायुतीला यश :

मुंबईतील सहा मतदारसंघ वगळून कोकण पट्ट्यात लोकसभेचे सहा मतदारसंघ येतात. यामध्ये विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. याशिवाय मावळ मतदारसंघाला रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत हे तीन मतदारसंघ जोडलेले आहेत. त्यामुळे कोकण पट्ट्यातील एकूण 39 विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास इथे भाजपचे 12, शिवसेनेचे 13, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि मनसेचे एक असे 29 आमदार आहेत. तर सात मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत. याशिवाय बहुजन विकास आघाडीचेही तीन आमदार कार्यरत आहेत.

इथल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, कल्याण, ठाणे, पालघर या सहापैकी पाच जागा जिंकण्यात महायुतीला यश आलेले आहे. तर केवळ भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना यश आले आहे. इथल्या 39 पैकी 27 मतदारसंघांमध्ये महायुतीचा बोलबाला राहिला. तर 12 मतदारसंघांमध्येच महाविकास आघाडीला मताधिक्य घेण्यात यश मिळाले. यात प्रामुख्याने मंत्री उदय सामंत रत्नागिरी आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या चिपळूण मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांनी आघाडी घेतली. शिवाय शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या कर्जत आणि महेश बालदी यांच्या उरण मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मताधिक्य घेतले.

याशिवाय भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले, राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा यांच्याही मतदारसंघातून भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्यामामा म्हात्रे यांनी आघाडी घेतली. कोकण पट्ट्यात एकनाथ शिंदे यांनी बालेकिल्ला राखला. शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के यांना 44 हजार 338 मतांची आघाडी मिळवून दिली. ठाणेही शिंदे यांनी राखले. आमदार विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे. भाजप आमदार किसन कथोरे हेही आपल्या-आपल्या मतदारसंघात यशस्वी ठरले. कल्याण मतदारसंघातील महायुतीचे आमदारही श्रीकांत शिंदेंना आघाडी मिळवून देण्यात सफल झाले.

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच बोलबाला :

पश्चिम महाराष्ट्रात एकूण दहा लोकसभा मतदारसंघ येतात. यात यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहा आणि महायुतीचे चार खासदार निवडून आले आहेत. या मावळला जोडलेले रायगडचे तीन विधानसभा मतदारसंघ सोडून या दहा लोकसभा मतदारसंघांमध्ये 57 विधानसभा मतदारसंघ येतात. या 57 मतदारसंघांचा विचार केल्यास 41 मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. तर 16 महाविकास आघाडीचे आमदार आहेत.  मात्र त्यानंतरही 34 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. तर 23 मतदारसंघांमध्ये महायुतीने वर्चस्व राखले आहे.

पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीने सगळ्यात मोठे यश मिळविले ते बारामतीमध्ये. अजित पवार यांच्या बारामतीमधून त्यांच्या पत्नी आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या 48 हजार मतांनी पिछाडीवर राहिल्या. सांगली आणि मिरज मतदारसंघात भाजप आमदार आहेत. मिरजमध्ये तर मंत्री सुरेश खाडे आमदार आहेत. असे असूनही इथून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजयी आघाडी घेतली. तिकडे चंदगडमध्ये राष्ट्रवादीचे राजेश पाटील, राधानगरीमध्ये शिवसेनेचे प्रकाश आबिटकर, वाईमध्ये राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातून, माढ्यातून बबन शिंदे, करमाळ्यातून संजय शिंदे, माळशिरसमध्ये राम सातपुते, मोहोळमध्ये यशवंत माने, पंढरपूरमध्ये समाधान आवताडे हे आमदार असतानाही इथून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मोठे मताधिक्य घेतले.

पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील यांनी आपला गड कायम राखला. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजीत पाटील सरुडकर यांच्यासाठी वाळवा आणि शिराळा या दोन्ही मतदारसंघातून मोठी आघाडी मिळवून दिली. कागलच्या हसन मुश्रीफ यांनीही मतदारसंघावर वर्चस्व ठेवले. कोल्हापूरमधील पाचही मतदारसंघातून आघाडी घेतली असताना हसन मुश्रीफ यांच्या कागलमधून शाहू महाराज छत्रपती यांना आघाडी घेता आली नाही.

उत्तर महाराष्ट्रातील महायुतीचे वर्चस्व पण लोकसभेला मविआची सरशी :

उत्तर महाराष्ट्रात एकूण आठ लोकसभा मतदारसंघ येतात. यापैकी सहा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. या मतदारसंघांत एकूण 48 विधानसभा मतदारसंघ येतात. मात्र रावेर मतदारसंघाला विदर्भाच्या सीमेवरील मलकापूर मतदारसंघ जोडला गेला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील 47 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 34 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. तर महाविकास आघाडीचे 11 आणि एमआयएमचे दोन आमदार आहेत. त्यानंतरही महाविकास आघाडीने 20 मतदारसंघांमध्ये सरशी मारली. लोकसभेच्या सहा जागा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

उत्तर महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का कुठे बसला असेल तर तो नंदुरबार आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात. दिंडोरीमध्ये चांदवड आणि नांदगाव वगळता भाजपच्या उमेदवार भारती पवार यांना आघाडी घेता आली नाही. अगदी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे भास्कर भगरे यांनी 13 हजारांचे घसघशीत मताधिक्य घेतले. शिवाय इतर तीन राष्ट्रवादीच्या मतदारसंघातही भगरे यांनी आघाडी घेतली. जळगाव आणि रावेरमधील मात्र सर्वच्या 11 विधानसभा मतदारसंघांसह 27 मतदारसंघांमध्ये महायुतीने वर्चस्व राखले आहे.

मराठवाड्यात भाजपला सर्वाधिक फटका :

मराठवाड्यातील आठपैकी सात मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने झेंडा फडकविला आहे. यात आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये 48 विधानसभा मतदारसंघ येतात. यातील हिंगोली लोकसभेला यवतमाळमधील उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ जोडला आहे. त्यामुळे 47 विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास तब्बल 33 मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत. यात भाजप 18, शिवसेना 9, राष्ट्रवादी काँग्रेस 5, रासप 1 असे आमदार आहेत. तर 14 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार आहेत.

मात्र त्यानंतरही तब्बल 34 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा डंका वाजला आहे. यातही जालना, धाराशिवमधील सर्वच्या सर्व, परभणी, लातूर, हिंगोलीमधील प्रत्येकी पाच, नांदेडमधील चार आणि बीडमधील तीन मतदारसंघांवर महाविकास आघाडीने अक्षरशः वर्चस्व गाजवले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या भूम-परांडा मतदारसंघात तर शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार ओम राजेनिंबाळकर यांना तब्बल 81 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. लातूरमधील निलंग्यात माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डॉ. शिवाजीराव कळगे यांना मोठे मताधिक्य घेतले.

कंगनाला कानशिलात लावणारी CISF महिला कॉन्स्टेबलने सांगितले सत्य; म्हणाली, ‘माझी आई आंदोलनाला…’

जालन्यात मागच्या पाच टर्मपासून भाजपचे रावसाहेब दानवे खासदार आहेत. पण तिथे काँग्रेसच्या कल्याणराव काळे यांनी सर्वच्या सर्व सहा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली. अगदी दानवे यांचा मुलगा आमदार असलेल्या भोकरदनमध्येही काळे यांनाच आघाडी मिळाली. संभाजीनगर मध्य आणि पूर्व या मतदारसंघांमधून एमआयएमला आघाडी मिळाली. केवळ 11 मतदारसंघांमध्ये महायुतीला आपले वर्चस्व राखता आले. पण या 11 पैकीही पाच मतदारसंघांमधील आघाडी अगदीच किरकोळ आहे.

परभणीमधील गंगाखेमध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना केवळ सहा हजारांचे मताधिक्य आहे. नांदेडमधील भोकरमधून भाजपचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांना केवळ 841 मतांची आघाडी मिळाली. तर मुखेडमधूनही त्यांना अवघी चार हजार मतांची आघाडी मिळविता आली. बीडमधील माजलगावमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना अगदीच किरकोळ म्हणजे 935 मतांची आघाडी मिळाली. याशिवाय लातूरमधील उदगीरमध्येही भाजप उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना केवळ 4 हजार 800 मतांची आघाडी मिळविता आली. केवळ बीडमधील आष्टी, परळी, संभाजीनगरमघील कन्नड, संभाजीनगर पश्चिम, गंगापूर, वैजापूर या सहा मतदारसंघांमध्येच महायुतीने एकहाती वर्चस्व राखले.

विदर्भात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी :

विदर्भामध्ये लोकसभेचे दहा मतदारसंघ येतात. यापैकी सात लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाले आहे. केवळ नागपूर, अकोला आणि बुलढाणा या तीनच मतदारसंघांमध्ये महायुतीला यश मिळाले आहे. या दहा लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 60 विधानसभा मतदारसंघ येतात. याशिवाय बुलढाण्याती मलकापूर हा उत्तर महाराष्ट्रातील रावेर लोकसभा मतदारसंघाला आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मतदार संघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आला आहे.

त्यामुळे या 62 मतदारसंघांचा विचार केल्यास भाजपचे 29, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेनेच तीन, प्रहार जनशक्ती पक्षाचे दोन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक आणि अपक्ष पाच असे तब्बल 44 आमदार आहेत. तर महाविकास आघाडीचे केवळ 18 आमदार आहेत. मात्र त्यानंतरही इथल्या तब्बल 43 मतदारसंघांत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. केवळ 19 मतदारसंघांमध्ये महायुतीला वर्चस्व राखण्यात यश आले आहे.

रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे वर्चस्व असूनही इथल्या सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. चंद्रपूरमध्ये तर सुधीर मुनगंटीवार यांना स्वतःच्या मतदारसंघातही स्वतःला आघाडी मिळवता आली नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्राबल्य असलेल्या कामठी मतदारसंघात काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी मताधिक्य घेतले.  याशिवाय भंडारा-गोंदियातील चार, अमरावतीमधील चार, यवतमाळ-वाशिममधील पाच अशा मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे.

केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच स्वतःचा बालेकिल्ला राखता आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपच्या नितीन गडकरी यांना 33 हजारांचे लीड मिळाले.  एकूणच महाविकास आघाडीसाठी विधानसभेला हे गणित फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. तर भाजप आणि महायुतीसाठी प्रचंड चिंतेची बाब आहे हे नक्की.

follow us