Maharashtra Education News : निवडणुकीच्या धामधुमीत चोऱ्या होणे ही काही नवी गोष्ट नाही. पण, चोरी कुणाच्या पैशांची तर सरकारच्या पैशांची. त्यातही शिक्षणाच्या माध्यमातून चांगले नागरिक घडविण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षण खात्याची पैशांची. तब्बल 47 लाख 60 हजार रुपयांची चोरी झाली ती मंत्रालयातील शिक्षण विभागाच्या बँक खात्यातून. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्याच चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे, थोड्याच दिवसांपूर्वी पर्यटन खात्याच्या बँक खात्यातून मोठ्या रकमेची चोरी झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.
या घटनेत आरोपींनी शिक्षण विभागाचे बनावट धनादेश, बनावट स्टॅम्प आणि सह्यांद्वारे चार टप्प्यात तब्बल 47 लाख 60 हजार रुपये बँक खात्यातून काढले. याआधीही असाच प्रकार घडला होता. पर्यटन विभागाच्या बँक खात्यातून 67 लाख रुपये चोरीला गेले होते. या चोरीचा तपासही पोलीस करत आहेत. महिन्याभरातच ही दुसरी घटना घडली. याचा अर्थ सरकारने पहिल्या चोरीतून काहीच धडा घेतला नाही असाच होतो.
मंत्रालयातील बँकेच्या खात्यातून हातचलाखीने पैसे काढून घेण्यात आल्याची माहिती आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अगदी चोख आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकाची अतिशय काटेकोर पद्धतीने तपासणी केली जाते. परंतु, तरीही चोरी झाली. चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनीही या प्रकरणात तत्परतेने गुन्हा दाखल करत तपासाला गती दिली.