Bhiwandi Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या आधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस बदलापुरात आले. निमित्त होतं मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि महायुतीची जाहीर सभा. कार्यालयाच्या उद्घाटनात कपिल पाटील, किसन कथोरे एकत्र दिसले. नंतर सभेत फडणवीसांनी मुरबाडमधून कपिल पाटलांना लीड मिळवून देण्याची जबाबदारी किसन कथोरेंना देऊन टाकली. पुढे निवडणुका झाल्या. किसन कथोरे कपिल पाटील यांच्या प्रचारातही दिसले. कपिल पाटील यांचा प्रचार केल्याचा दावाही कथोरेंनी केला. या घटना महायुतीत सर्व काही फिलगुड असल्याच्याच द्योतक होत्या पण, थांबा यानंतरची दुसरी बाजू महायुतीचे भिवंडी मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील यांच्याच वक्तव्यातून समोर आली आहे.
“ज्या माणसाने आपल्याविरोधात काम केलं. त्या माणसाचा आपल्या मताधिक्यात काय संबंध?” असा सवाल करत “४ जूननंतर काहींचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल” असं वक्तव्य केलं. कपिल पाटील यांनी नाव घेतलं नाही मात्र, त्यांचा रोख किसन कथोरे यांच्याकडेच होता हे लपून राहत नाही. खरंतर निवडणुकीच्या जागावाटपात महायुतीत अनेक वेळा वाद झाल्याचे दिसून आले होते. परंतु, संघटन कौशल्यात अतिशय बळकट असणाऱ्या भाजपमध्येही अंतर्गत वाद या निमित्ताने समोर आला. भिवंडीचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी भाजपा आमदार किसन कथोरे यांना उघडपणे इशारा दिला. भाजपमध्ये अशा गोष्टी घडणं हे आश्चर्यकारक मानलं जातं. परंतु, हा प्रकार घडला.
रणनिती की माघार? बिहारच्या निवडणकीत ‘काँग्रेस’चं राजकारण ‘आरजेडी’च्या हातात…
पाटील यांच्या वक्तव्यातून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली ती म्हणजे वाद आहेच आणि याला जुन्या घटनांची किनार आहे. मधल्या काळात दोघांतील वादात भाजप नेत्यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला होता. पण अंतर्गत धग कायम होती. दोघांतील वाद तसा जुनाच आहे. या वादाचा इतिहास पहायचा म्हटलं तर थोडं इतिहासात जावं लागेल. ठाणे जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील आणि पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत किसन कथोरे भाजपात आले.
यानंतर जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काहीच दिवसांत भाजपने कपिल पाटील यांना केंद्रात राज्यमंत्री पद दिलं. ठाण्यातील राष्ट्रवादीचं वर्चस्व कमी करण्याची खेळी म्हणून या निर्णयाकडं पाहिलं गेलं. यामुळे पाटील यांचं स्थानिक राजकारणातील वजन वाढलं. हीच गोष्ट किसन कथोरेंना अस्वस्थ करत होती. कथोरे आधी अंबरनाथचे आमदार होते. हा मतदारसंघ आरक्षित झाल्याने त्यांनी मुरबाड मतदारसंघातून विजय मिळवला.
लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? प्रशांत किशोरनंतर योगेंद्र यादवांचं मोठं भाकित…
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत महत्वाची पदे भूषवणाऱ्या किसन कथोरेंचा शहापूर, मुरबाड,अंबरनाथ , कल्याण ग्रामीण आणि भिवंडी तालुक्यात चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे दोघांतील राजकीय वर्चस्वाच्या लढाईनं मधल्या काळात वादाचं रुप घेतलं. पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवार देण्यावरून हा वाद टोकाला गेला होता. एकमेकांचे उट्टे काढायचे म्हणून काही ठिकाणी एकमेकांच्या उमेदवारांविरुद्ध अपक्षांना रसद पुरवली. निवडणुकीचे निकाल आले तेव्हा मुरबाड नगरपरिषद कथोरेंनी राखली होती. शहापूर राखण्यात मात्र कपिल पाटील अपयशी झाले. नंतर हा संघर्ष वाढतच गेला.
मागील दोन वर्षांपासून कपील पाटील यांनी भिवंडी मतदारसंघ आणि ठाणे जिल्हा भाजप कार्यकारिणीतून कथोरे समर्थकांना डावलण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे कथोरे समर्थक नाराज होते. कथोरे निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे पाटील यांचा राग अनावर झाला होता. तेव्हापासून ते कथोरेंना पाण्यात पाहत होते. हा वाद निवडणुकीत घातक ठरेल याची जाणीव झाल्याने भाजप नेत्यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला होता.
नंतर ऑक्टोबर 2023 मध्ये किसन कथोरे यांच्या राजकीय कारकिर्दीला 42 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात चक्क कपिल पाटलांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात पाटील बराच वेळ थांबले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाल्याचे अर्थ काढले गेले. यानंतर लोकसभा निवडणुकीत महायुतीने कपिल पाटील यांना तिकीट दिलं. निवडणुकीत मतभेद बाजूला ठेऊन त्यांचा प्रचार केल्याचा दावा कथोरेंनी केला होता. परंतु, कपिल पाटील यांनी वेगळंच सत्य मांडलंय त्यांच्या वक्तव्याने या दोन्ही नेत्यांतील वादाला नव्याने फोडणी मिळाली आहे. आता कपिल पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार
मुरबाडमध्ये भाजपाचे किसन कथोरे आमदार आहेत.
भिवंडी पश्चिममध्ये भाजपाचे महेश चौघुले आमदार आहेत.
शहापूरमध्येय अजित पवार गटाचे दौलत दरोडा आमदार.
भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाचे रईस शेख आमदार.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर आमदार आहेत.
भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे गटाचे शांताराम मोरे आमदार आहेत.