रणनिती की माघार? बिहारच्या निवडणकीत ‘काँग्रेस’चं राजकारण ‘आरजेडी’च्या हातात…
Bihar Lok Sabha Election : बिहारमध्ये यंदा टफ फाइट आहे. राज्यातील वातावरण बदललं आहे. तेजस्वी यादव यांच्या मनात नितीश कुमारांच्या राजकारणाचा राग आहे. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील कामगिरी लक्षात आहे. त्यामुळे प्रचाराची धुरा एकट्याच्या हातात ठेऊन काँग्रेसला प्रचारातून दूर ठेवण्याचाही प्लॅन आहे. घडलंही तसचं आहे. पहिल्या चार टप्प्यातील निवडणूक प्रचाराचा ट्रेंड पाहिला तर फक्त तेजस्वी यादवच भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीचा सामना करत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत तेजस्वी यादव पूर्ण राज्यात फिरून प्रचार करत आहेत. पहिल्या चार टप्प्यातील निवडणूक प्रचारात तेजस्वी यादव यांनी अनेक सभा घेतल्या. या सभांतून भाजपवर घणाघाती टीका केली. इतकेच नाही तर निवडणुकीआधी नितीश कुमार यांच्या एनडीएमध्ये वापसी करण्याच्या मुद्द्यालाही हवा दिली. राज्यातील एका मोठ्या वर्गात तेजस्वी यादव लोकप्रिय आहेत. हाच ट्रेंड 2020 मधील विधानसभा निवडणुकीत सुद्धा पहायला मिळाला होता. परंतु यंदा त्यांना मित्र पक्षांकडून पाहिजे तसा सपोर्ट मिळताना दिसत नाही. हीच परिस्थिती इंडिया आघाडीसाठी डोकेदुखी ठरू शकते.
९९ रुपयांची स्कीम, सुट्टीचा दिवस अन् एकच रस्ता; गेम झोनच्या आगीची थरकाप उडवणारी कहाणी..
बिहारमध्ये राजद 26, काँग्रेस 9 आणि डावे पक्ष 5 जागांवर लढत आहेत. काँग्रेस नेते सातत्याने दावा करत आहेत की आघाडी राज्यातील सर्व मतदारसंघात विजयी होईल. परंतु काँग्रेसचा हा दावा कागदावरच राहतो की काय अशी शंका आता उपस्थित होत आहे. यामागे कारणही आहे. प्रचाराच्या सुरुवातीला काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. या यादीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांचे नाव होते. कन्हैया कुमार, मिरा कुमार यांचीही नावे स्टार प्रचारकांत होती. मात्र ही नावे कागदावरच राहिली.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची कमी हजेरी
काँग्रेस नेते राहुल गांधी तेजस्वी यादव यांच्याबरोबर फारसे दिसलेच नाहीत. 40 स्टार प्रचारकांपैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच नेते प्रचारात दिसले. काँग्रेस नेते कन्हैया कुमार बिहारचेच आहेत. काँग्रेसने त्यांना नॉर्थ ईस्ट दिल्ली मतदारसंघातून तिकीट दिले आहे. येथे त्यांचा सामना भाजपाचे दिग्गज नेते मनोज तिवारी यांच्याशी होणार आहे. या निवडणुकीमुळे कन्हैया कुमार यांना बिहारमध्ये प्रचारासाठी येण्यात अडचणी येत आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी यांचा बराचसा वेळ रायबरेली मतदारसंघात प्रचारात गेला. मात्र प्रियांका गांधी यांनी रायबरेलीबरोबरच देशाच्या अन्य राज्ंयात जाऊन जोरदार प्रचार केला हे देखील खरे आहे.
विधानसभेत काँग्रेसची खराब कामगिरी
बिहार मध्ये मागील विधानसभा निवडणुकीत सत्ता मिळाली नाही तरी विरोधी पक्षांनी चांगले प्रदर्शन केले होते. बहुमतापासून थोडेच दूर राहिले होते. याचे क्रेडिट तेजस्वी यादव यांना द्यावे लागेल. दुसरीकडे या पराभवाचे खापर काँग्रेसवर फोडण्यात आले. कारण काँग्रेसला 70 पैकी फक्त 19 जागा जिंकता आल्या होत्या. जिंकण्याची क्षमता नसतानाही काँग्रेसला जास्त जागा दिल्या होत्या.
Naveen Patnaik : राजकारणाने बदलला पोशाख, जीन्स घालणारे ‘पटनायक’ बनले खादीधारी
जुन्या अनुभवाने तेजस्वी झाले हुशार
जर काँग्रेसला कमी जागा दिल्या असत्या तर 110 जागा मिळवणाऱ्या आघाडीला सहज बहुमत मिळाले असते. परंतु काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे विजय मिळवता आला नाही. हा अनुभव पाठीशी असल्याने राजदने यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त 9 जागा दिल्या. आतापर्यंत पाहिले गेले आहे की जेथे काँग्रेस आणि भाजप यांच्यात लढत झाली तेथे भाजपला फायदा झाला आहे.
काँग्रेसला प्रचारापासून दूर ठेवण्याचा RJD प्लॅन ?
काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्याचे भांडवल करत भाजप विरोधकांवर दडपण आणण्यात यशस्वी होतो. परंतु यावेळी असे काही दिसून आले नाही. राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की तेजस्वी यादव यांनाच असं वाटत आहे की राहुल गांधींनी प्रचारात उतरू नये. प्रचाराची धुरा एकट्याने सांभाळणाऱ्या तेजस्वी यादव यांची स्ट्रॅटेजी पाहून असे वाटते की त्यांचा काँग्रेसवर फारसा विश्वास नाही. कारण काँग्रेसमुळेच मागील काही निवडणुकीत संपूर्ण विरोधी पक्षांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते.